मविआचे जागावाटप ठरले; हिंगोलीत ठाकरे गट तर जालन्यात काँग्रेस लढणार
X
महाविकास आघाडीने मराठवाड्यात लोकसभेच्या जागांसाठी मतदारसंघांचे वाटप निश्चित केले आहे. आत्तापर्यंत हिंगोली, जालन्यावरून जागावाटपाचे घोडे अडले होते. मात्र अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तो तिढा सुटला असून हिंगोलीसाठीचा आग्रह काँग्रेसने सोडून दिला तर ठाकरे गटाने जालन्याची जागा काँग्रेसला देऊ केली. आता मराठवाड्यात ठाकरे गट ४, काँग्रेस ३ तर राष्ट्रवादी शरद पवार गट १ जागा लढवणार असल्याचे जवळवास अंतिम झाले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसोबत झालेल्या नांदेड लोकसभा बैठकीत नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी नायगावचे माजी आमदार वसंत चव्हाण यांच्या नावाची शिफारस केली आहे. शेकाप महिला आघाडीच्या नेत्या, भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या भगिनी आशाताई शिंदेही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. नांदेड भाजपमधील स्पर्धा पाहता तिकीट न मिळालेला कुणी काँग्रेसमध्ये येऊ शकतो का? याचीही पाहणी होत आहे. जालन्यातून कल्याण काळे उमेदवारीच्या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर आहेत. परभणीत संजच जाधव, धाराशिवला ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी कायम राहणार असून छत्रपती संभाजीनगरात माजी खा. चंद्रकांत खैरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे स्पर्धेत आहेत.