Home > Max Political > अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीची अनाथांना मदतीचा हात देणारी 'राष्ट्रवादी जीवलग' योजना

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीची अनाथांना मदतीचा हात देणारी 'राष्ट्रवादी जीवलग' योजना

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीची अनाथांना मदतीचा हात देणारी राष्ट्रवादी जीवलग योजना
X

कोरोना काळात अनेक मुलांनी आई आणि वडिल दोघांचंही छत्र हरपलं. अशा मुलांना राज्यसरकार सह केंद्र सरकारने ही मदतीची घोषणा केली आहे. आता या मुलांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष देखील मदतीचा हात देणार आहे. या संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी घोषणा केली आहे.

22 जुलै अजित पवार यांचा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या काळात आई वडिलांचं छत्र हरपलेल्या 450 अनाथ मुलांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे. यासाठी 'राष्ट्रवादी जीवलग' ही योजना सुरू करण्यात येत असल्याची घोषणा राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज दिल्ली येथे फेसबुक लाईव्ह द्वारे केली आहे.

काय आहे 'राष्ट्रवादी जीवलग' योजना?

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट यांच्या माध्यमातून राज्यात अनाथ झालेल्या ४५० मुलांसाठी प्रेमाचा आधार म्हणून 'राष्ट्रवादी जीवलग' ही योजना सुरू करण्यात येत आहे. याचा पहिला टप्पा हा एक वर्षाचा असून यासाठी पक्षातील एक सहकारी असे ४५० जण या ४५० कुटुंबांशी म्हणजे त्या मुलांशी जोडले जाणार आहेत.

यासाठी राष्ट्रवादीने 'राष्ट्रवादी दूत' निर्माण केला असून यामध्ये मुलींसाठी पक्षातील महिला, युवती तर मुलांसाठी युवक किंवा पुरुष कार्यकर्ता जोडला जाणार आहे असे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले.

'राष्ट्रवादी दूत' ची जबाबदारी काय?

'राष्ट्रवादी दूत' या ४५० अनाथ मुलांच्या घरात जाईल. त्यांना काय गरज आहे, त्यांची अडचण समजून घेऊन ती माहिती पक्षाकडे देणार आहे. शिवाय या अनाथ मुलांची माहिती प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे तो डाटाही जमा केला जाईल आणि यातून एक व्यापक कार्यक्रम व पारदर्शक कारभार केला जाणार आहे. शिवाय यांची इत्यंभूत माहिती पक्षाच्या वेबसाईटवर व स्वतः माझ्या पेजवर उपलब्ध राहिल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

या अनाथ मुलांच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी भरून काढण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या 'राष्ट्रवादी जीवलग' या योजनेतून केले जाणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून या योजनेला सुरुवात होणार आहे.

Updated : 21 July 2021 2:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top