अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या आनंदात विरजण, शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये राडा...
अहमदनगर मध्ये महाविकास आघाडीमुळे शिवसेनेचा महापौर तर झाला मात्र, याचा आनंद शिवसैनिकांना घेता आला नाही...
Xcourtesy social media
अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे आणि उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन उमेदवारांच्या विरोधात कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे बुधवारी (30 जून) या दोन्ही पदांसाठी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत शेंडगे व भोसले यांच्या नावाच्या अधिकृत घोषणेची औपचारिकता राहिली आहे.
मात्र, या निवडणुकीपुर्वीच शिवसेनेच्या दोन गटातील वाद चव्हाट्यावर आला. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील एका हॉटेलमध्ये चांगलाच राडा झाला आहे. त्यानंतर शिवसेनेचे निलेश भाकरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मला शिवीगाळ, मारहाण केली असल्याचा आरोप निलेश भाकरे यांनी केला आहे.
पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी झाल्याने शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचा उपमहापौर होणार आहे. तशी अधिकृत घोषणा बाकी आहे. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी मंगळवारी रात्री एका हॉटेलमध्ये जमले होते. त्याठिकाणी दोन पदाधिकाऱ्यांत सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली आणि त्यातून पुढे मोठा राडा झाल्याची चर्चा आहे.
हा वाद नंतर थेट कोतवाली पोलीस ठाण्यात गेला असून भाकरे यांनी तक्रार अर्ज दिला आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. मला शिवीगाळ, मारहाण केली असल्याचे त्यात त्यांनी म्हटले आहे. एकीकडे शिवसेनेला महापौर पद पदरात पडल्याचा आनंद असतांना दुसरीकडे मात्र शिवसेनेत राडा झाल्याने आगामी काळात मोठा संघर्ष महापालिकेत पहावयास मिळणार आहे.