News Update
Home > मॅक्स मार्केट > अपात्रतेबाबत मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्राची फसवणूक

अपात्रतेबाबत मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्राची फसवणूक

अपात्रतेबाबत मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्राची फसवणूक
X

अहमदनगर महानगर पालिकेतील उपमहापौरपदी असताना भाजपाचा नगरसेवक श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अनुद्गार काढले होते. त्यावेळी महाराष्ट्रभर उमटलेल्या संतापजनक प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छिंदम याच्याविरोधात कठोर कारवाईची घोषणा केली होती. प्रत्यक्षात त्याला पाठीशी घालण्याची भूमिका भाजपा व शिवसेना - भाजपा सरकारने घेतल्याचे दिसून येत आहे.

फेब्रुवारी, २०१८ मध्ये शिवजयंतीच्या दोनतीन दिवस आधीच ही घटना घडली होती. एका सफाई कामगाराला फोन करून छिंदम याने सफाईचे काम सांगितले होते. शिवजयंती झाली की करून देतो असे त्या कामगाराने छिंदमला सांगितले. त्यावर छिंदम याने शिवजयंती आणि शिवरायांबद्दल अत्यंत शिवराळ भाषेत अनुद्गार काढले होते. त्याचा ऑडीओसुद्धा व्हायरल झाला होता. त्यानंतर छिंदमच्या तसेच नगरमधील भाजपाच्या कार्यालयावर लोकांनी हल्ला चढवला होता. दगडफेक केली होती. ठिकठिकाणी छिंदमचे पुतळे जाळले होते. त्याच्या फोटोवर चपला मारण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र विधीमंडळातही त्याचे पडसाद उमटले होते. श्रीपाद छिंदम याच्याविरोधात पोलिसांनी रीतसर गुन्हाही दाखल झाला होता. त्याला न्यायालयीन कोठडीत जावे लागले होते. एकंदरीत तापते वातावरण बघून भाजपाने छिंदमचा उपमहापौर पदाचा राजीनामा घेऊन प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला होता. पण ह्या सगळ्या गोष्टी तात्कालिक असतात, याची पुरेपूर जाणीव असलेल्या कायद्याने वागा लोकचळवळीने छिंदम याच्या नगरसेवक पदावरून अपत्रातेची मागणी राज्य सरकारकडे केली होती.

१९ फेब्रुवारी, २०१८ या शिवजयंती दिनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून राज्य सरकारने आपल्या अधिकारात छिंदम याला अपात्र ठरवावे, अशी लेखी मागणी कायद्याने वागा लोकचळवळीने केली होती. त्यावर आपले प्रकरण अहमदनगर महानगर पालिकेकडे पाठवले आहे, आपण त्यांच्याशी संपर्क करावा, असे उत्तर आले. पण सदर बाब आपल्या अखत्यारीतील असून महानगरपालिकेकडे प्रकरण पाठवणे अतार्किक आहे, असे उलट उत्तर आपले सरकार या पोर्टलवर देऊन कारवाईबाबत असमाधान व्यक्त केले असूनही सदर तक्रार क्लोज्ड करण्यात आली.

कायद्याने वागा लोकचळवळीने मुख्यमंत्र्यांनी ईमेलवर संपर्क साधून तक्रार केली. अहमदनगर महापालिकेतील नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अनुद्गार तर काढलेच, पण त्यांची क्लिप ऐकता त्यांचे एकूणच वर्तन पालिका सदस्य म्हणून अशोभनीय आहे. त्यांची ही कृती महानगर पालिका अधिनियमातील कलम १० अंतर्गत अपत्रातेस कारणीभूत ठरते, अशी ती तक्रार होती. ४ मे, २०१८ रोजी त्याचे उत्तर आले. आपला ईमेल मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाला असून तो पुढील कार्यवाहीसाठी नगरविकास आणि गृह विभागास पाठविण्यात आला आहे, असे ते ढोबळ उत्तर होते. त्यानंतर आज ६ महिने उलटले तरी कार्यवाहीचा आणि पुढील उत्तराचा पत्ता नाही.मध्यंतरी अहमदनगर महानगर पालिकेनेही छिंदम याला अपात्र ठरवणारा ठराव केल्याचे माध्यमात प्रसारित झाले होते. मग नेमकी माशी शिंकली कुठे ते कळत नाही.

श्रीपाद छिंदम हा केवळ भाजपाचा नगरसेवक नव्हता, तर तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही सदस्य आहे. त्याचे संघ गणवेशातील फोटोज गुगलवर आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतही फोटो आहेत. छिंदमवर फुटकळ कारवाई करून भाजपा, संघ, आणि शिवसेना-भाजपा सरकारने वेळ मारून नेली, पण त्याचा राजकीय प्रवास रोखला नाही. प्रभाग क्रमांक ९ मधून क जागेवरून तो अहमदनगर महानगर पालिकेची निवडणूक लढवतोय. छिंदमला फासावर द्या असे कोणी म्हणणार नाही. पण छत्रपती शिवरायांचा शिवराळ भाषेत अपमान करणारी व्यक्ती जर उजळ माथ्याने निवडणूक लढवत असेल, तर ते निश्चितच महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे. छिंदमकडे निवडणूक लढवण्याचा संविधानिक अधिकार नक्कीच आहे, पण तत्पूर्वी महाराष्ट्र सरकारने आपला अधिकार वापरला असता, तर त्याला त्या संविधानिक अधिकारांचा गैरवापर करता आला नसता. छिदमला निवडणूक लढवायची संधी शिवसेना - भाजपाने दिली आहे, तात्पुरता गदारोळ माजवून नंतर गपगुमान बसणाऱ्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, रिपब्लिकन व इतर राजकीय पक्षाने दिली आहे. छत्रपतींचा आशीर्वाद, शिवस्मारक, सोन्याचे सिंहासन वगैरे गोष्टी किती फसव्या आहेत, हे पुन्हा एकदा छिंदम प्रकरणात दिसून आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छिंदमला अपात्र ठरवण्यात दिरंगाई का झाली, हे महाराष्ट्राला सांगितलेच पाहिजे.

राज असरोंडकर

कायद्याने वागा लोकचळवळ

Updated : 2 Dec 2018 6:26 AM GMT
Next Story
Share it
Top