Home > मॅक्स मार्केट > डान्स : छंद की व्यवसाय?

डान्स : छंद की व्यवसाय?

डान्स : छंद की व्यवसाय?
X

साधारण दहावर्षापूर्वी सोनी वाहिनीवर “इंडियन आयडॉल” हा गाण्यावर आधारित रियालिटी शो सादर करण्यात आला होता. या पहिल्यावहिल्या स्पर्धेत अभिजित सावंत हा माटुंगा लेबर कॅम्प येथे राहणारा मुंबईकर पहिला इंडियन आयडॉल म्हणून विजेता झाला होता. सोनी वाहिनीचा "इंडियन आयडॉल" हा कार्यक्रम देश विदेशात खूप लोकप्रिय झाला होता. या कार्यक्रमात भाग घेतलेले स्पर्धक लोकप्रिय झाले होते. इंडियन आयडॉल म्हणून विजेता ठरलेल्या अभिजित सावंत यास विजेता म्हणून जवळपास एक कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले होते तसेच सोनी वाहिनीतर्फे गाण्याचा एक अल्बम काढण्यात आला. त्याचबरोबर काही जाहिरीतीचे कंत्राट मिळवून देण्यात आले होते. वैशाली भैसने-माडे, सोनू निगम आणि श्रेय घोशाल यासारखे आजचे आघाडीचे गायक अशाच रिअलिटी शो मधून नावारूपाला आले.

नुकताच कलर्स मराठी या वाहिनीवर “2 MAD” हा नृत्याचा रियालिटी शो सादर झाला होता. कोरिओग्राफर उमेश जाधव, संजय जाधव आणि अमृता खानविलकर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली होती. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विविध भागातून स्पर्धक आले होते. त्यांचे नृत्याविष्कार पाहून खरोखरच आश्चर्य वाटले होते. या स्पर्धेमध्ये नागपूरची पलक बेरड, पुण्याचा तन्वीर शेख, अहमदनगरहून आलेला राहुल कुलकर्णी, पुण्याची प्रतीक्षा सुतार किवा सोनल विचारे, निखील ठमके यांच्यापैकी कुणीही मुंबईच्या वातावरणाशी परिचित नव्हते. या मुलांनी जे काही सादर केले ते खरोखरच वाखाणण्यासारखे होते. तरीही प्रश्न उरतो तो स्पर्धेच्या माध्यमातून लाकांपर्यंत पोहोचलेली मुलं पुढे काय करतात. यासाठी मराठीतील आघाडीचे कोरीओग्राफर उमेश जाधव यांच्याशी बोलले असता त्यांनी या सर्व प्रश्नांना सविस्तर उत्तर दिले. कोणत्याही प्रकारचे नृत्याचे औपचारिक शिक्षण न घेतलेले उमेश जाधव महाविद्यालयात असताना कधीकाळी हौस म्हणून हिंदी नाटकातून भूमिका करीत असत. चौपाटीच्या भवन्स महाविद्यलयात असताना गम्मत म्हणून नृत्याच्या कार्यक्रमात भाग घेतला आणि ते याच क्षेत्रात स्थिरावले.

गेल्या पंचवीस-तीस वर्षात शंभरहून अधिक मराठी/हिंदी चित्रपट तर जवळपास चाळीस पुरस्कारांनी सन्मानित झालेले उमेश जाधव यांची सुरुवात ९०च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले कोरीओग्राफर अहमद खान यांच्याकडे सहाय्यक म्हणून झाली. सर्वसाधारण मराठी मध्यमवर्गीय... त्यामुळे आमच्याकडे शिक्षणाला प्राधान्य होते... घरच्यांचा माझ्या या आवडीला विरोध होताच, आणि ते स्वाभाविक होतेच. बरोबरचे मित्र शिकून बँकेत तर कुणी सरकारी नोकरीत लागले होते. आणि आम्ही अजूनही “स्ट्रगलर” होतो. कोरिओग्राफर अशी संकल्पना त्याकाळात हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मूळ धरली नव्हती. सुबल सरकार, गोपीकृष्ण असे एखाद दोन नृत्य दिग्दर्शक होते. धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, जितेंद्र, ऋषी कपूर, विनोद खन्ना, मिथुन आदी अभिनेत्याचा काळ होता. यातील काही अपवाद वगळता कुणीही डान्सर अभिनेता नव्हता. बॉलीवूड डान्स ही संकल्पनाच तोपर्यंत हिंदी चित्रपट सृष्टीत आली नव्हती. त्यामुळे आमच्यासारख्या नृत्यात करिअर करण्याचा प्रयत्न करणाऱ्याना वेड्यात जमा केले जायचे. याच नव्वदच्या दशकात रामगोपाल वर्मांचा "रंगीला" आला आणि खऱ्या अर्थाने बॉलीवूड डान्स ही संकल्पना हिंदी चित्रपटात आली. रंगीला चित्रपट हा खऱ्या अर्थाने "ट्रेन्ड सेटर" म्हणता येईल. मी आणि आजचा आघाडीचा कोरिओग्राफर आणि दिगदर्शक रेमो डिसोझा या चित्रपटत मॉब मध्ये डान्सर होतो. मराठीमध्ये राजीव पाटील यांच्या "सावरखेडे-एक गाव" या चित्रपटाला हा मान देता येईल.

आज अनेक तरुण हिंदी, मराठी चिंत्रपटसृष्टीत कोरिओग्राफर म्हणून दिसतात. बॉस्को सीझर, टेरेन्स लुईस, प्रभुदेवा, वैभवी मर्चन्ट, फराह खान तसेच मराठीतील फुलवा खामकर, दीपाली विचारे अशी अनेक नावे झळकतात. परंतु खरोखरच नृत्यक्षेत्रात करिअर आणि पैसे आहे यावर उमेश जाधव म्हणाले या क्षेत्रात येणाऱ्या तरुणाचे साधारण वय १८ ते २० या वयोगटात असते. साधारण वयाच्या ३५ पर्यंत स्टेजशो किंवा चित्रपटात काम करू शकतात. कारण डान्स इज अ फिजिकल ऍक्टिव्हिटी... तुम्हाला तेवढा स्टॅमिना असावा लागतो. त्यामुळे एका ठराविक वयानंतर तुम्ही स्टेजवर नृत्य करू शकत नाही. हल्ली या डान्सर्सना चित्रपट, स्टेज शोज, परदेश दौरे, कार्पोरेट इवेन्ट मिळत असतात. अशा कार्पोरेट डान्स इवेन्ट मध्ये नृत्य करण्यासाठी साधारण ४००० रुपये प्रत्येक दिवशी मिळतात. तर परदेश दौऱ्यांना लक्षावधी रुपये मानधन मिळते. परंतु हे सर्व जास्तीत जास्त पंधरा वर्षे म्हणजेच वयाच्या ३५ पर्यंतच असते. हळूहळू तुम्हाला स्टेजशो मिळत नाहीत आणि उत्पन्न कमी होते आणि इथून समस्या सुरु होतात असे अनुभवाचे बोल उमेश जाधव सांगत होते. परंतु खचून जाण्याचे काही कारण नाही.

हल्ली भारतामध्ये अनेक डान्स क्लासेस लहान मोठ्या शहरातून सुरु होत असतात. त्यामध्ये डान्स टीचर म्हणून काम करता येते. तसेच मुंबई, पुणे, दिल्ली बंगळूर या सारख्या शहरामधून लग्न, कार्पोरेट इवेन्टसाठी डान्स कोरिओग्राफ केले जातात. डान्स अकादमी सुरु केल्यास साधारण ५०० रुपये तास तर काही ठिकाणी १००० रुपये महिना तर काही अतिश्रीमंत डान्स क्लासेस महिन्याला ७५,००० रुपये देखील घेतात. अशा स्पर्धेच्या युगात पाय घट्ट रोवून उभे राहायचे असल्यास आपला गृहपाठ देखील तयार असावा लागतो. न्यूयॉर्क हे जगातील डान्सचे माहेर घर आहे. येथूनच नवीन ट्रेंड जगभरात जात असतात. या क्षेत्रात असलेल्यांनी आणि येणाऱ्यानी कायम नवीन शिकण्यावर भर ठेवायला हवा. बॉलीवूडसोबत हिपॉप, जॅझ, कंटेम्परी, फोक, लॉकिंग, ब्रेक डान्स, बॉल रूम डान्सिंग, इंडियन क्लासिक आदी नृत्याचे प्रकार आत्मसात केले पाहिजेत. जेणेकरून आताच्या स्पर्धेच्या काळात मागे राहणार नाहीत.

मराठी लोकनृत्याच्या दुनियेत स्वतःचा वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे गेली सुमारे तीन दशके नृत्यक्षेत्रात कार्यरत आहेत. लालबाग येथे त्यांच्या वडील बंधूचे गणिताचे “जीएन क्लासेस” असलेल्या सुभाष नकाशे स्वतः एका सुसंस्कृत आणि सुशिक्षित घरातून आले आहेत. नकाशे सांगतात नृत्यक्षेत्रात येणाऱ्या तरुणांचा “स्ट्रगल” वयाच्या सतरा-अठरा पासूनच सुरु होतो. अत्यंत कठीण आणि प्रचंड शारीरिक श्रम करावे लागणारं अस “प्रोफेशन” असूनही माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खूप तरुण कलाकार मुंबईत येतात. नाचाची आवड आणि एखाद्या अभिनेत्याच्या नृत्याची हुबेहूब नक्कल करता येते आणि त्या भांडवलावर मुंबईत आपले नशीब आजमावायला आलेले बरेच तरुण आपण पाहिलेले असल्याचे नकाशे सांगतात. हल्लीचे पालक देखील प्रसिद्धी आणि पैसे याचा विचार करून स्वतहून मुलांना या अनिश्तेच्या जगात पाठवतात. ही तरुण मुलं मुंबईतील दूरवरच्या एखाद्या उपनगरात भाड्याच्या खोलीत राहतात आणि कुठल्यातरी नृत्याच्या ठेकेदाराकडे हेलपाटे घालत राहतात. कधीतरी काम मिळते त्यावर गुजराण करतात. सुभाष नकाशे यांच्या मते कोणत्याही व्यवसायात असलात तरीही शिक्षण पूर्ण करायलाच हवे. शिक्षणामुळे निर्णय घेताना योग्य ती काळजी घेता येते असे स्वनुभावरून त्यांनी सांगितले. तसेच मध्येच या व्यवसायातून बाहेर पडायचे असल्यास शिक्षण आपल्याला मदतनीस ठरू शकते.

गेल्या तीस वर्षाच्या काळात दिशा भरकटलेले बरेच तरुण पाहिले असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. नाचाच्या आवडीपायी शिक्षण अर्धवट सोडलेले असते आणि त्यानंतर त्यांना बऱ्याच त्रासांना सामोरे जावे लागते. साधारण हजार तरुणांमधून फक्त १० ते १५ जण कोरीओग्राफर म्हणून काम करतात तर फक्त ३० ते ३५ त्यांचे सहाय्यक होतात. उरलेल्या ९५० मुलांना स्थैर्य मिळविण्यासाठी आयुष्यभर फक्त झगडत रहाव लागते. पूर्वी एका कार्यक्रमाचे साधारण २५ ते ५० रुपये मानधन मिळत असे. आताच्या मुलांना पैसे खूपच चांगले मिळतात. त्याचबरोबर कार्पोरेट इवेन्ट, लग्न समारंभ, चित्रपटातून तसेच देश-विदेशातील कार्यक्रमातून या डान्सरना चांगले पैसे मिळतात.

“2 MAD” या रियालिटी शोचा उपविजेता ठरलेला आणि आताच्या पिढीचा प्रतिनिधी राहुल कुलकर्णीने अधिक माहिती देताना सांगितले की, प्रसिद्धी, आवड आणि पैसे या तीन कारणासाठी हल्लीची पिढी इथे ओढली गेली आहे. मी स्वतः सिम्बोयासीसमधून एमबीए पूर्ण केले आहे. प्रचंड कष्ट आणि अनिश्चीतीता असून देखील माझी आवड जोपासायला या व्यवसायात आलो आहे. गेली सहा वर्षे मी मुंबईत एकटा राहत असून “आयना का बायना” या मराठी चित्रपटात काम केले आहे. नृत्य शिकत असताना कॉर्पोरेट इवेन्ट, चित्रपट, फिल्म अवार्ड सोहळे मधून काम मिळते. त्यातून पैसे देखील मिळतात. या क्षेत्रात अनेक मुलांनी येऊन नाव कमावले आहे. रेमो डिसोझा, धर्मेश यासारखे तरुण आमच्या पिढीचे आदर्श आहेत. सगळीच मुल कोरिओग्राफअर होत नसली तरीही तरुण या क्षेत्रात येतात ते फक्त आवड जोपासायची म्हणून. आज मुंबईसारख्या शहरात शेकडो डान्स क्लासेस आहेत त्यात हजारो मुले नृत्य शिकत आहेत.

Updated : 10 Jun 2017 7:52 AM GMT
Next Story
Share it
Top