Home > मॅक्स किसान > मराठवाड्यातील शेतकरी का लटकतोय झाडांना?

मराठवाड्यातील शेतकरी का लटकतोय झाडांना?

मराठवाड्यातील शेतकरी का लटकतोय झाडांना?
X

मराठवाडा आणि दुष्काळ हे जणू समीकरण झाले आहे आणि सततचा दुष्काळ येथील जनतेच्या जणू पाचवीला पुजलेला आहे. लहरी निसर्गामुळे अस्मानी आणि सुलतानीच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्नाचे साधन नाही.

निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीत मराठवाड्यातील शेतकरी प्रत्येक वर्षी खते, बी-बियाणांसाठी लाख-दीड लाख प्रत्येक वर्षाला मातीत घालून ढगाकडे पाहून पावसाची वाट पाहतो आणि पावसाने हुलकावणी दिली की प्रसंगी कर्जबाजारी होऊन काळ्या आईची भरलेली ओटी वांझोटी ठरते. उत्पन्नाची हमी नाही, शेतीत ओतलेला पैसा परत मिळण्याची शक्यता नाही. मुलाबाळांची शिक्षणाची होणारी आबळ, उपवर मुलीच्या लग्नाची भ्रांत यामुळे शेतकरी मेटाकुटीला येत आहे.

डोक्यावर वाढत जाणारा कर्जाचे भार आणि कुटुंबाची होणारी वाताहत यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. बेसुमार वृक्षतोड आणि राजकीय उदासीनता ही कारणेही या परिस्थितीला कारणीभूत आहेत. बीड सारख्या जिल्ह्यात अद्याप रेल्वे नाही, एमआयडीसी नाही की मोठा उद्योग नाही. त्यामुळे उत्पन्नाचे साधन येथील तरुणांना मिळत नाही. जनतेमध्ये जेवढे मागासलेपण असेल तेवढा राज्यकर्त्यांना फायदा होतो, लोक हुशार झाले तर जास्त काळ राजकीय हीत साध्य होत नाही, या समिकरणामुळे या भागातील राज्यकर्त्यानी लोकांना मागास ठेऊन आपला राजकीय स्वार्थ कसा साधता येईल हेच धोरण अवलंबले.

संयुक्त महाराष्ट्रात मराठवाडा विनाअट सहभागी झाला, परंतु सरकार कोणतेही असले तरी प्रत्येकाने मराठवाड्यावर अन्यायच केला. एकंदर सुशिक्षित बेरोजगार म्हणून फिरणाऱ्या तरुणांच्या हाताला काम नाही, हंगामी ऊसतोडणी शिवाय नागरिकांना रोजगाराचे साधन नाही, निसर्गाचे आणि राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष, सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी जनतेच्या मन आणि मत परिवर्तनासाठी अपेक्षित कामाचा अभाव यासह झाडे लावण्यासारख्या गोष्टीला सरकारनेच पुढाकार घेतला पाहिजे अशी बळावत चाललेली मानसिकता मराठवाड्याला वाळवंटाकडे घेऊन जात आहे.

दिवसेंदिवस पाण्याचे वाढत जाणारे दुर्भिक्ष्य, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती, जलसिंचनाच्या मोठ्या प्रकल्पांचा अभाव यामुळे या भागातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि निसर्गाने हुलकावणी दिली की कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी झाडे जवळ करत आहे. या परिस्थितीला उदासीन प्रशासकीय यंत्रणा, शासनाचे चुकीचे धोरण, राज्यकर्त्यांची नाकारात्मत मानसिकता, विधायक सामाजिक कार्याचा अभाव आणि शेतकऱ्यांचा वृक्षतोडीकडे वाढता कल, या गोष्टी कारणीभूत आहेत.

[button color="" size="" type="square" target="" link=""]अभिमन्यू घरत

संपादक

दै. हिंद जागृती,

बीड[/button]

Updated : 4 March 2019 12:57 PM GMT
Next Story
Share it
Top