Home > मॅक्स किसान > Kharip2023 दुबार पेरणीचे संकट ओढावले, तर जबाबदार कोण? डॉ. सोमिनाथ घोळवे

Kharip2023 दुबार पेरणीचे संकट ओढावले, तर जबाबदार कोण? डॉ. सोमिनाथ घोळवे

समृद्धी महामार्गावरील(SamruddhiMahamarg) अपघातामध्ये 25 जीव गेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी चिता जळत असताना राज्यात सत्तेचा नवा पट मांडण्यात (swearing in) आला.. या सगळ्या राजकीय उलथापालोथीत अन्नदाता शेतकरी (Farmer)हा दुबार पेरणीच्या (kharip) संकटात सापडला आहे त्याकडे कोणाचे लक्ष आहे? राजकीय धामधुमीत या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष वेधलं आहे डॉ. सोमिनाथ घोळवे यांनी...

Kharip2023 दुबार पेरणीचे संकट ओढावले, तर जबाबदार कोण? डॉ. सोमिनाथ घोळवे
X


काल सकाळी (२ जून २०२३ रोजी) साडेचार एकर कोरडवाहू शेती असलेले प्रभाकर मुंडे (रा, निवडंगवाडी. ता.जि बीड) यांना "काय कामे चालू आहेत? बि-बियाणे, रासायनिक खते घेतली का? झाली पेरणी का? असं फोन करून विचारले. त्यावर प्रभाकर मुंडे म्हणाले, “पेरणीचीच कामे चालू आहेत, अर्धी पेरणी झालीय, राहिलेली पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये होईल". मी विचारले, “पेरणीला ओलावा चांगला झाला आहे का? पाऊस किती झालायं?”. त्यावर प्रभाकर मुंडे म्हणाले “दोन-चार सटकारे (१० ते १५ मिनिटांचा एक पाऊस म्हणजे एक सटकारा) झालेत, शेतात केवळ टुचभर ओल झालीय. त्याखाली कोरड हाय, पण चुंबळी देऊन पेरत आहे. त्यामुळे बियाणे ओलीला पडत हाय”. मी म्हणालो, “असं असेल तर पेरू नका. कारण बियाणं जरी चार इंचावर पडले, ते चार दिवसांनी बियाणे उगवलं तर मुळी लगेच कोरडीला जाईल आणि सर्व करपून जाईल. वारं सुटलेले असेल तर उन्ह आणि वाऱ्यामुळे आहे ती ओल पण संपून जाईल. थोडा पावूस होवू द्या”. त्यावर प्रभाकर मुंडे म्हणाले, “पाऊस पडणार आहे, असे एका “.....” तज्ज्ञाने सांगितले आहे. गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सांगितला हाय”. मी म्हणालो, " असे आपण कोठे ऐकले, तुम्हाला कोणी माहिती दिली?" त्यावर मुंडे म्हणाले, "आमच्या गावातील पोरांकडे मोबाईल माहिती आली आहे, मोबाईलमध्ये आम्ही व्हिडीओ बघितला हाय" असेच बरेच मला ऐकवलं. शेवटी म्हणाले “आता मी पेरायला चाललो आहे, ठेऊ का फोन? संध्याकाळी बोलू”,



फोन ठेवल्यावर मी सुन्न झालो, विचार करू लागलो. शेतकऱ्यांच्या बाबतीत असेच किती असाच दिवस चालणार आहे? योग्य आणि खात्रीशीर मार्गदर्शन का मिळत नाही? नेमके शासन कोठे कमी पडते याचे आत्मचिंतन का नाही? शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? कमी ओलाव्यात पेरणी करत असण्यास नेमके कोण जबाबदार? अशा अनेक प्रश्नांचा विचार करत गेल्या आठवड्यातील वर्तमानपत्रे काढली आणि हवामानाच्या बातम्या काय आहेत हे तपासल्या. तसेच सोशल मिडिया वरील खाजगी हवामान तज्ज्ञ काय सांगत होते हे देखील पहिले. यातून हवामान विभागापेक्षा खासगी हवामान सांगणाऱ्या व्यक्तीचे शेतकरी जास्त ऐकत आहेत, विश्वास ठेवत आहेत हे लक्षात आले. दुसरे, खरीप पेरण्याचा आढावा घेतला असता, अंदाजे 60 ते 65 टक्के क्षेत्रफळावर पेरण्या झाल्या असतील असे दिसून आले. मात्र पाऊस पुरेसा पडला नसल्याने, झालेल्या पेरण्यावर हळूहळू दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. जर दुबार पेरणी करावी लागली तर होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण? झालेले बि-बियाणे, रासायनिक खते आणि कष्ट-वेळ याची नुकसान भरपाई कोण देणार आहे?.

अरबी समुद्रातील “बिपॉरजॉय" चक्रीवादळाच्या नंतरचे, अर्थात 20 जून नंतरची हवामान विभागाकडून आणि खासगी हवामान तज्ज्ञांकडून आलेले पाऊसाचे अंदाज पहा. हे तपासले तर आपल्या लक्षात येईल की नेमके काय प्रकारचा संदेश शेतकरी वर्गामध्ये पाठवला गेला. चांगला पाऊस होणार या आशयाच्या संदेशामुळे शेतकरी वर्गाने थोड्या पाऊस (७ ते १० इंच ओलावा) झाला तरी पेरण्या करण्याचा निर्णय घेतला का हा प्रश्न आहेच. (आजच्या वर्तमानपत्रात देखील "जुलै मध्ये चांगल्या पावसाचे संकेत" अशी बातमी आहे. खासगी हवामान तज्ञांनी तर "मुसळधार पाऊस", भरपूर पाऊस सांगणारे व्हिडीओ आणि वेबसाईटवर बातम्या आहेत.)




जून महिन्यात हवामान विभागाच्या नोंदीनुसार केवळ 54 टक्के पाऊस झाला आहे. हवामान विभागाची पाऊस नोंदीची पद्धत पाहता, त्यातील किती नोंदी खऱ्या आहेत या विषयी शंका आहेच. कारण प्रत्येक गाव शिवारात पाऊस पडण्यामध्ये वेगळेपण आहे. (एक ते दोन किमी अंतरात पाऊस वेगवेगळा पडलेला दिसून येतो) त्यामुळे प्रत्येक गावांमधील पाऊसाची नोंद घेतली जात नाही. त्यामुळे 54 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असावा. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र कोरडा आहे. दुसरीकडे खासगी हवामान तज्ज्ञांच्या मुसळधार पाऊसाचा वर्तवलेल्या अंदाज चुकीचा निघाला आहे. 25 जून नंतर मुसळधार पाऊस होणारच आणि प्रत्येक जिल्ह्यांची नावे घेऊन हा अंदाज वर्तवला होता. परिणामी शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवून थोडा पाऊस झाला असता, पेरण्या करण्याची कामे हाती घेतले. आगदी 6 ते 7 इंच ओलावा झाला की पेरणी करणारे शेतकरी दिसून येतात. शेतकऱ्यांनी हवामान विभागापेक्षा शेतकरी खासगी तज्ञांवर जास्त विश्वास का? हवामान विभागाचा अंदाज ग्रामीण भागात बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत का पोहचत नाही? या सर्वात शासनाची काय जबाबदारी असू शकते? खासगी तज्ञांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल होत नाही ना? ह्याची तपासणी का केली जात नाही? असे अनेक प्रश्न आहेत.

अरबी समुद्रात 'बिपॉरजॉय " चक्रीवादळाने बाष्प असलेले ढग ओढून घेतले असे सांगण्यात आले, मात्र वादळानंतर वातावरण पूर्ववत झाल्यानंतर आल्येल्या बाष्पयुक्त ढगांद्वारे कृत्रिम पाऊस पडण्याचे प्रयोग शासनाने करणे आवश्यक होते का?. जेणेकरून जून महिन्यात सरासरी होणाऱ्या पाऊसाची उणीव भरून काढता येऊ शकली असते. यात सर्वांमध्ये शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली तर जबाबदारी कोणावरही टाकली तरी होणाऱ्या नुकसानाची भरपाई कशी भरून काढायची? की नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायाचे? पूर्वानुभव तर दुबार पेरणीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आहे. दुसरे, दुबार पेरणी शेतकऱ्यांना करायला लावण्यामध्ये अनेक घटकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत हे मात्र निश्चित.

लेखक : डॉ. सोमिनाथ घोळवे, हे शेती, पाणी प्रश्नांचे अभ्यासक असून, द युनिक फाऊंडेशन, पुणे येथे वरिष्ठ संशोधक आहेत.


Updated : 3 July 2023 4:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top