Home > मॅक्स किसान > पांढरं सोनं संकटात..

पांढरं सोनं संकटात..

पिवळे सोनं सर्वांना माहितच आहे. परंतु पांढरं सोनं (white gold) आपल्याला माहीत आहे का? तर हो मी जीवन चव्हाण कापसाबद्दल बोलत आहे. आज कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर (farmer) भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.

पांढरं सोनं संकटात..
X


कापूस हे एक नगदी पीक (cash crop) आहे. तसेच त्याला पांढरे सोने देखील म्हटले जाते. महाराष्ट्रातील विदर्भात काळी कसदार मृदा व कोरडे हवामान आहे. त्यामुळे तेथे कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. विदर्भातील यवतमाळ (yeotmal) जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा म्हणजेच सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखले जातात. कापसाच्या बियांना सरकी म्हणतात. सरकी हे गुरांचे खाद्य आहे तर सरकीचे तेल स्वयंपाकासाठी वापरायचे एक स्वस्त तेल आहे. या तेलाचा साबणाच्या आणि अन्य व्यवसायांत वापर होतो. तसेच कापसापासून मोठ्या प्रमाणात सुती कापडाची निर्मिती करण्यात येते. त्यात अकोला येथे कापसाच्या पिकासाठी सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.

मागील वर्षी कापसाला विक्रमी भाव मिळाला, एकवेळ तर प्रतिक्विंटल १४ हजार रुपयांपर्यंत कापसाचे भाव पोहोचले होते. त्यामुळे यंदाही कापसाला तसेच भाव कायम राहतील, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. काही भागात आता नवीन कापूस आला असून, काही शेतकरी विक्री करत आहेत.

पण सध्या बाजारात कापसाला प्रतिक्विंटल ५ ते ६ हजार रुपये दर मिळत आहे. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात कापसाला साडेअकरा ते बारा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव होता. मात्र, आता झपाटय़ाने दर कमी झाले आहेत. दुसरीकडे, सोयाबीनचा हंगाम आता सुरू झाला आहे. केंद्राने यंदा सोयाबीनला ४ हजार ३०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. सध्या सोयाबीनला हमीभावाच्या दरम्यान दर मिळत आहे. ग्रामीण भागातील कापसात आद्र्रता मोठय़ा प्रमाणात असल्याने ५ ते ६ हजार रुपये भाव मिळत असल्याचे व्यापारांचे म्हणणे आहेत. तत्पूर्वी यंदा देशातील कापूस लागवड हि गेल्यावर्षीपेक्षा जवळपास ७ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र देशातील कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापूस पिकाला हवामानाचा फटका बसला आहे.

महाराष्ट्रात अवकाळी पावसांमुळे पिकांची मोठी हानी झाली. त्यात तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. म्हणून शेतकरी हवालदिल झाला आहे.अनेकांची घरात मुले लग्नाला आली आहे. अगोदरच पीक लागवडीसाठी घेतलेले कर्ज परतफेड झाले नाही. त्यात मुलांची लग्ने कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ नुकसान भरपाई जाहीर करून त्यांना आर्थिक हातभार लावावा जेणेकरून शेतकऱ्यांवर आत्महत्यांची वेळ येणार नाही. यंदा कापसाचे भाव खूपच खाली आल्यामुळे पुढील वर्षी किमान हमी भाव मिळतील का? अशी अपेक्षा आता शेतकरी वर्ग करू लागला आहे. त्यात ऑक्टोम्बरमध्ये पाऊस आणि वातावरण व गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कसा राहतो, यावर कापसाचा बाजार अवलंबून राहील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.


Updated : 4 April 2023 11:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top