Home > मॅक्स किसान > शीख शेतकऱ्यांना ' खलिस्तानी ' ठरवू पाहणाऱ्या अडाणी भक्तांसाठी: आनंद शितोळे

शीख शेतकऱ्यांना ' खलिस्तानी ' ठरवू पाहणाऱ्या अडाणी भक्तांसाठी: आनंद शितोळे

तीन कृषी सुधारणा कायदा वरून सुरू झालेले शेतकरी आंदोलन आता दिल्ली पर्यंत पोहोचले आहे. भाजपच्या वतीने या आंदोलनाला खलिस्तानवादी ठरविण्यात आले. इतिहासाचा दाखला देत आनंद शितोळे यांनी अडाणी भक्तांसाठी या आंदोलनावर केलेले भाष्य...

शीख शेतकऱ्यांना  खलिस्तानी  ठरवू पाहणाऱ्या अडाणी भक्तांसाठी: आनंद शितोळे
X

पंजाब देशाच्या सीमेवर असलेल राज्य आहे.इथली माणस शेतकरी आहेत आणि सोबतच लढवय्ये.खैबरखिंडीतून येणाऱ्या आक्रमकांना पहिल्यांदा याच राज्यातून भारतात पुढे यायला लागतय आणि इथल्या लोकांना लढाया संघर्ष नवे नाहीत.

मुळच्या हिंदू धर्मातून बाहेर पडलेल्या नानकांचा शीख हा संपूर्ण वेगळा धर्म आहे, तो हिंदूंचा उपपंथ नाही ना शीख वाट चुकलेले हिंदू आहेत, त्यामुळे देशभरात वापरला जाणारा हिंदू मुस्लीम द्वेषाचा हातखंडा प्रयोग इथे अजिबात चालणार नाहीये.

इथल्या संघर्षाला असणारे पदर वेगवेगळे आहेत.

फाळणीची दाहकता अनुभवलेला हा समाज आहे ज्यांच्या राज्याची उभी फाळणी झाली, निम्मे नातेवाईक पाकिस्तानात आणि निम्मे भारतात, घर इकडे शेत तिकडे अशी अवस्था झाली.लाखोंच्या संख्येने माणस मारली गेली , विस्थापित झाली.अंगावरच्या कपड्यानिशी गाव घर सोडलेल्या शिखांनी देशभरात मिळेल तिथे जाऊन आपली प्रगती केली.

स्वातंत्र्य मिळाल्यावर सातत्याने शीख समुदाय सैन्यात वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहे.स्वातंत्र्यपूर्व काळापासून आणि नंतरही फक्त देशातच नव्हे , परदेशात उद्योग उभारून संपत्ती निर्मितीचे काम त्यांनी केलेलं आहे, विशेषतः कॅनडा मध्ये मोठ्या संख्येने शीख समुदाय आहे आणि त्यांचा राजकारणात प्रभाव आहे.

आपण अमुक वर्षे भिक्षा मागितली याचा अभिमान असलेल्या लोकांना शीख समुदाय कधीही भिक मागत नाही तर लोकांना उद्यमशीलता शिकवतो हे लक्षात घ्यायला हव.

१९६९ च्या निवडणुकीत पराभूत झालेल्या जगजितसिंह चौहान ने खलिस्तान चळवळ सुरु केली, शिखांचा स्वतंत्र देश.१९४७ पासून सलग भारताकडून पराभूत झालेल्या पाकिस्तानने या संधीचा फायदा घेतला आणि पंजाब मध्ये अतिरेक्यांना मदत करून छुप्या युद्धाला सुरुवात केली.

अतिरेक्यांची मजल थेट सुवर्णमंदिरात तळ ठोकून कारवाया करण्यापर्यंत गेली.सातत्याने पंजाबी समुदायावर हल्ले, पोलीस लष्करावर हल्ले करण्यात खलिस्तानी अतिरेकी पुढे होते.

जून १९८४ ला ऑपरेशन ब्ल्यू स्टार झाले.

ऑक्टोबर १९८४ ला इंदिरा गांधींची हत्या झाली.

राजीव गांधी प्रधानमंत्री झाल्यावर अर्जुन सिंग राज्यपाल असताना अकाली दलाच्या नेत्यांना तुरुंगातून सोडून त्यांच्याशी चर्चा करून अकाली दलाचे प्रमुख हरचरणसिंग लोंगेवाल यांच्यासोबत २४ जुलै १९८५ ला अकरा कलमी करार भारत सरकारने केला ज्यामध्ये पंजाब साठी अनेक सवलती, आर्थिक सुधारणा यांचा समावेश होता.अतिरेक्यांना हे पटल नाही म्हणून त्यांनी २० ऑगस्ट १९८५ ला लोंगेवाल यांची हत्या केली.

कॉंग्रेसचे मुख्यमंत्री असलेल्या बेअंतसिंग यांची ३१ ऑगस्ट १९९५ ला कारबॉम्ब स्फोटात हत्या झाली.

ऑपरेशन ब्ल्यू स्टार च्या काळात लष्करप्रमुख असलेल्या अरुण कुमार वैद्य यांची पुण्यात १० ऑगस्ट १९८६ ला गोळ्या झाडून हत्या झाली.

ऑपरेशन ब्ल्यू स्टार हाताळणारे लष्करी अधिकारी आणि १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धात लष्करी सन्मान मिळवलेले कुलदीपसिंग ब्रार यांच्यावर तब्बल २८ वर्षांनी ३० सप्टेंबर २०१२ ला लंडन मध्ये चाकूहल्ला झाला ज्यामध्ये ते बचावले.

खलिस्तानी चळवळीने हि प्रमुख माणस आणि हजारो पोलीस अधिकारी, लष्करी अधिकारी यांचे बळी घेतले.

जे.एफ.रिबेरो आणि के.पी.एस गिल यांच्या प्रयत्नाने पंजाबमधील शांतता परत आली.दरम्यानच्या काळात इथल्या लोकांनी शेती, व्यापार यामध्ये प्रगती केली.भारतातल्या सायकल उद्योगाची पंढरी लुधियाना आहे.

हिरो समुहाचे जन्मस्थान हिरो सायकल्स इथूनच सुरु झालेल्या आहेत.

सध्याच्या पिढीने खलिस्तान विषय बाजूला टाकून , फाळणीच्या जखमा बुजवून पुढे वाटचाल केलीय म्हणून पाकिस्तानने पंजाब सोडून काश्मीर कडे मोर्चा वळवून तिथल्या अतिरेक्यांना रसद पुरवली आहे.

सीमेवरच्या राज्यातील असंतोष जास्त काळजीपूर्वक हाताळावा लागतो, अन्यथा शेजाऱ्यांना तोंड घालायला संधी मिळते हि बाब राज्यकर्त्यांना लक्षात येत नसेल तर आपली वाटचाल चुकीच्या मार्गावर आहे हे नक्कीच.

नेहमीच्या पद्धतीने आयटीसेल, न्यूज वाहिन्या हाताशी धरून हिंदू मुस्लीम, पाकिस्तान झिंदाबाद आणि हिरवे झेंडे फडकले टाईप प्रोपोगेंडा इथे चालणारच नाहीये हे कारभाऱ्याना लवकर कळायला हवय.

इथल्या माणसाला धमकावल तर तो अंगणातून गव्हाचा दाणा उचलू देणार नाही मात्र प्रेमाने मिठी मारून विनंती केली तर गरमागरम पराठा-लोणी आणि ग्लासभर लस्सी तुमच्या स्वागताला असेल.

सरकारने पाण्याचे फवारे मारून, लाठ्या वापरून, बळाचा वापर करून, आयटी सेल च्या माध्यमातून शेतकर्यांना खलिस्तानी ठरवून प्रेमाची मिठी मारण्याची संधी गमवलेली आहे.याच शेतकरी कायद्याच्या मुद्द्यावर अकाली दलाने काडीमोड केलेला आहे.

सरकार दारूगोळ्याच्या कोठारावर बसून दिवे पाजळून , फुलबाज्या धरून देवदिवाळी साजरी करतय, आता वाट दारुगोळा पेटण्याची.

#IStandWithFarmers

Updated : 3 Dec 2020 12:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top