Home > मॅक्स किसान > राज्यावर दुष्काळाची सावली होत आहे गडद

राज्यावर दुष्काळाची सावली होत आहे गडद

राज्यावर दुष्काळाची सावली होत आहे गडद
X


यंदाच्या मोसमातील पावसाळा संपत आला आहे, तरी राज्यातील कोकण वगळता 329 महसूली मंडळात पावसाने तूट दिल्याने राज्यातील 18 जिल्ह्यातील खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे.

राज्यात १ जून ते 26 ऑगस्ट या तीन महिन्यांच्या काळात मध्य महाराष्ट्रात 21 टक्के, मराठवाड्यात 18 टक्के, विदर्भात 9 टक्के पावसाची तूट आहे. मात्र, यापैकी जालना आणि सांगली या जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस पडला आहे. एकूणच काय तर कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झालेला नाहीये. त्यामुळं भीषण टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे.

भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार राज्यात 1 जून ते 26 ऑगस्ट या तीन महिन्यांच्या काळात अहमदनगर जिल्ह्यात 31 टक्के, धुळे जिल्ह्यात 20 टक्के, जळगाव जिल्ह्यात 11 टक्के, कोल्हापूर जिल्ह्यात 14 टक्के, नंदूरबार जिल्ह्यात 18 टक्के, नाशिक जिल्ह्यात 8 टक्के, पुणे जिल्ह्यात 16 टक्के, सांगली जिल्ह्यात 44 टक्के, सातारा जिल्ह्यात 36 टक्के, सोलापूर जिल्ह्यात 25 टक्के पाऊस हा सरासरीपेक्षा कमी झालेला आहे.

त्याबरोबरच मराठवाड्यात नांदेड वगळता सर्वच जिल्ह्यात पर्जन्यतूट दिसून येत आहे. त्यात जालना जिल्ह्यात 46 टक्के, छत्रपती संभाजी नगर जिल्हयात 31 टक्के, हिंगोली 32 टक्के, परभणी 21 टक्के, बीड 30 टक्के, धाराशिव 20 टक्के, लातूरमध्ये 4 टक्के पर्जन्यतूट आली आहे.

विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात 19 टक्के, अकोला जिल्ह्यात 27 टक्के, अमरावती जिल्ह्यात 31 टक्के, वाशिम जिल्ह्यात 15 टक्के, वर्धा जिल्ह्यात 9 टक्के, नागपूर जिल्ह्यात 5 टक्के, गोंदिया जिल्ह्यात 15 टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात 4 टक्के, गडचिरोली जिल्ह्यात 1 टक्के पावसाची तुट असल्याचे समोर आले आहे. भंडारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा 2 टक्के अधिक पाऊस झाला आहे.

कोकणात ठाणे, पालघर, मुंबई उपनगर आणि रायगड वगळता रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातही सरासरीपेक्षा पाऊस कमीच झालाय. सांगली आणि जालना या जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील खरीपाची पीकं धोक्यात आले आहेत. त्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाल्याचं चित्र आहे.

त्याबरोबरच 8 सप्टेंबरपर्यंत पावसासाठी पोषक स्थिती नसल्याने 18 जिल्ह्यातील पिकं जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यावर दुष्काळाची छाया आणखी गडद होत चाललीय. अशा परिस्थितीत राज्यातल्या 329 मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जातेय. यावर सरकार काय निर्णय घेतंय हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. मात्र, सरकारनं उध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन बळीराजाला धीर देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास खरीप पीक हातून गेल्यामुळं नजिकच्या काळात अन्न-धान्यही महागण्याची शक्यता आहे.

Updated : 29 Aug 2023 3:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top