Home > मॅक्स किसान > अवकाळीचा फटका! शेतकऱ्यांचं लाखमोलाचं पीक मातीमोल; द्राक्ष, मिरचीसह अनेक पिकं उद्ध्वस्त

अवकाळीचा फटका! शेतकऱ्यांचं लाखमोलाचं पीक मातीमोल; द्राक्ष, मिरचीसह अनेक पिकं उद्ध्वस्त

रविवारी मुख्यमंत्री अयोध्या दौ-यावर असताना राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं बळीराज्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. या पावसाने विदर्भासह मराठवाड्याला झोडपून काढलं आहे..

अवकाळीचा फटका! शेतकऱ्यांचं लाखमोलाचं पीक मातीमोल; द्राक्ष, मिरचीसह अनेक पिकं उद्ध्वस्त
X

बळीराजाच्या हातात आलेला घास मार्च महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हिसकावून घेतला होता. यातून शेतकरी सावरत नाही तोच राज्याला पुन्हा एकदा गारपीटीसह अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. रविवारी राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने बळीराज्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. या पावसाने विदर्भासह मराठवाड्याला झोडपून काढलं आहे. शेतकऱ्यासाठी आभाळ फाटलं असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामाच्या दर्शनासाठी अयोध्या दौऱ्यावर गेले आहे.

काल रविवारी (ता.३) विदर्भातील सर्वच जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालं. त्याचबरोबर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र , पश्चिम महाराष्ट्रातही काही भागात पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात तालुक्यात पुन्हा गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला.

धाराशिव जिल्ह्यात ४ वर्षांपासून वरुणराजाची अवकृपा होत आहे. कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट तर कधी अतिवृष्टी यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकांना जपायचे अन् वरुणराजाच्या अवकृपेमुळे त्याच पिकांना माती मोल होताना पाहायचं, अशी दुर्दैवी वेळ धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर येत आहे. यंदाही अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून काल सायंकाळी झालेल्या गारपिटीत धाराशिव तालुक्यातील महाळंगी येथील द्राक्षे बागेचे मोठे नुकसान झाले आहे.

महाळंगी शिवारातील तब्बल ४० एकर द्राक्ष बागेचे नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला गेला आहे. काल झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा अडचणीत आला आहे. लाखो रुपये द्राक्ष बागेवर खर्च करूनही गारपिटीत तीच बाग मातीमोल होत आहे. काल झालेल्या गारपिटीत द्राक्ष बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे.

अवकाळी पावसामुळे सर्वस्व गमावलेला शेतकरी म्हणाला, 'आता पंचनामे करायला येऊ नका, मैतालाच या'

बीड जिल्हाभरात अवकाळी पावसासह गारपिटीने चांगलेच झोडपले आहे. यामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर गारपीट आणि नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे बीडच्या काही भागांमध्ये शेतकऱ्यांची जनावरेही दगावली आहेत. २५ दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात गारपीट झाली होती. त्यामधून सावरत असतानाच काल झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पुन्हा उभारी घेण्याची उमेदच मोडून पडली आहे. शनिवारी रात्री झालेल्या पावसाने उरलीसुरली शेतीही उद्ध्वस्त झाली आहे. मात्र, शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद आणि मदत न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता पंचनामे करण्यासाठी नको तर मैतासाठीच या, अशी उद्विग्न प्रतिक्रिया येथील एका शेतकऱ्याने दिली.

या अवकाळी पावसामुळे फळबागासह पालेभाज्या त्यात टोमॅटो, पालक, कांदा, कैऱ्या सोबत ऊस देखील पूर्णपणे जमीन दोस्त झाला आहे. या रात्रीच्या अघोरी पावसाने शेतकऱ्याला खरंच आम्ही वाचतो की नाही असं देखील वाटू लागलं होते. मात्र फक्त नुकसान आणि जीवित हानीवर रात्रीचा पाऊस थांबला.


Updated : 10 April 2023 12:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top