Home > मॅक्स किसान > डाळींबाचा 'कॅलिफोर्निया‌ 'संकटात

डाळींबाचा 'कॅलिफोर्निया‌ 'संकटात

डाळींबाचे कॅलिफोर्निया असलेल्या आशिया खंडातील श्रीमंत समजल्या जाणाऱ्या अजनाळे गावातील डाळींबाच्या बागा उध्वस्त होत आहेत .डाळींबाच्या उलाढाल होत होती 200 कोटींची उलाढाल ठप्प बंद पडण्याच्या मार्गावर आहेत प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राउंड रिपोर्ट...

डाळींबाचा कॅलिफोर्निया‌ संकटात
X

सांगोला तालुका एके काळी दुष्काळी तालुका म्हणून गणला जात होता. पण येथील शेतकरी वर्गाने काबाड कष्ट करीत येथील माळरानावर डाळींबाची शेती फुलवली.त्यासाठी त्यांनी पाण्याचे योग्य नियोजन केले.सांगोला तालुक्याला डाळींबाचे कॅलिफोर्निया समजले जाते.पण या तालुक्यातील डाळींब बागांवर विविध प्रकारचे रोग पडले असून त्याचे निराकरण होत नसल्याने येथील डाळींब बागा उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.यासाठी शासनाने योग्य पावले उचलून डाळींब बागा वाचवण्यासाठी संशोधन करून रोगावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.या तालुक्यातील अजनाळे गाव डाळींबाच्या व्यापारामुळे जगप्रसिद्ध झाले परंतु आता येथील बागांना रोगांची घरघर लागल्याने येथील शेतकरी अडचणीत आले असल्याचे पहायला मिळत आहे.





अजनाळे गावच्या शेतकऱ्यांनी माळरानावर पाण्याचे चांगल्या प्रकारे नियोजन करीत डाळींबाचे नंदनवन फुलवले होते.यामुळे येथील लोकांच्या जीवनात अमुलाग्रह बदल झाला.येथिल प्रत्येक शेतकऱ्यांकडे राहण्यासाठी चांगल्या प्रकारचा बंगला,गाडी आहे हे सारे वैभव डाळींब बागांमुळे मिळाले असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.येथील शेतकऱ्यांच्या दारासमोर महागडी फॉर्च्युनर गाडी आहे.पण मागील तीन वर्षांपासून या गावातील शेतकऱ्यांना विविध समस्याना तोंड द्यावे लागत आहे. शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांत जोर धरू लागली आहे.अजनाळे गावातील शेतकऱ्यांची प्रगती डाळींब बागांमुळे झाली.डाळींब व्यापाराची वर्षाला 200 ते 300 कोटी रुपयांची उलाढाल होत होती.परंतु गेल्या तीन वर्षांपासून येथील डाळींबाच्या व्यापारात कमालीची घट झाली आहे.डाळींब व्यापार पूर्वपदावर येण्यासाठी शासनाने डाळींब उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष दयावे,अशी मागणी येथील शेतकरी विष्णू देशमुख यांनी केली आहे.

मर,पिन होल बोरर (खोड कीड) या रोगांमुळे डाळींब बागा होऊ लागल्या उध्वस्त

सांगोला तालुक्याला डाळींबाचे हब समजले जाते पण डाळींब बागांवर मर,होल बोरर या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथील शेतकरी अडचणीत आला असल्याचे दिसते.बागेच्या संवर्धनासाठी येथील शेतकऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत.विविध औषधांची फवारणी केली परंतु बागा जळायाच्या थांबेना गेल्या आहेत.त्यामुळे येथील शेतकरी इतर पिकांकडे वळला आहे.परंतु या पिकांवर ही त्यांचा भरवसा राहिलेला नसल्याचे दिसते.डाळींबाच्या बागांवर विविध औषधांची फवारणी करून देखील रोग आटोक्यात येत नसल्याने या भागातील शेतकरी वर्गात निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.





शेतकऱ्यांवर रोजगार शोधण्याची वेळ

अजनाळे गावातील शेतकरी काही वर्षांपूर्वी दुसऱ्या गावात शेतमजूर म्हणून कामाला जात होते.या गावच्या परिसरात माळरान होते.त्यात शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचा अभाव होता.परंतु या गावातील शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करीत डाळींब बागा फुलवल्या त्यामुळे रोजगारासाठी होणारी धावाधाव थांबली. उलट या गावच्या शेतात आजूबाजूच्या गावातील शेतमजूर कामाला येत होते.परंतु बागा उध्वस्त होऊ लागल्याने शेतमजुरांवर देखील बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असल्याचे दिसते.सध्या अजनाळे गावातील काही शेतकऱ्यांवर रोजगार शोधण्याची वेळ आली आहे.

शेतकऱ्यांने डाळींबाची सातशे झाडे टाकली तोडून

अजनाळे गावच्या परिसरातील शेतकरी भारत सोळसे यांनी डाळींबावरील रोग आटोक्यात येत नसल्याने वैतागून 700 झाडे तोडून टाकली व त्याठिकाणी ज्वारी,बाजरी यांची शेती केली आहे.भारत सोळसे यांनी बातचीत करताना सांगितले की,पाऊसकाळ जास्त झाला आहे.बागेत पाणी साचल्याने बागा जळू लागल्या आहेत.माझ्याकडे 1000 झाडांची डाळींबाची बाग होती.त्यातील 700 झाडे तोडली असून सध्या 300 झाडे शिल्लक आहेत.गेल्या तीन वर्षांपासून बागेला दोन-दोन लाख रुपये खर्च करीत आहोत.परंतु डाळींबाचे उत्पन्न निघाले नाही.त्यामुळे आमच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे डाळींब व्यापारी माल खरेदीसाठी आले नाहीत.त्यामुळे डाळींब बागेतच जळून गेले.बागावर तेलकट,कुजवा,मर,पिन होल बोरर रोग पडल्याने जळू लागल्या आहेत.काही वर्षांपूर्वी डाळींबावर तेलकट रोग पडत होता.आता रोगांची संख्या वाढली आहे.अवकाळी पावसाने ही फटका दिला आहे.डाळींब बागेवर भरपूर फवारण्या केल्या.परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.डाळींबाची झाडे पेस्ट केली,रंगवली खोडे धुवून घेतली पण त्याचा काही उपयोग झाला नाही.डाळींबावरील मर रोग आटोक्यात येईना गेला आहे. त्यामुळे सरकारने या जळणाऱ्या बागांकडे लक्ष दयावे.असे शेतकरी भारत सोळसे यांचे म्हणणे आहे.





रोजगार मिळेना गेला आहे शेतमजुरांची व्यथा

डाळींबावर रोग पडल्याने बागा छाटून इथरेल फवारले,पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.पाऊस जास्त झाल्याने पाण्याचा पाझर कमी होईना गेला आहे.शेतकऱ्यांनी करायचे काय ? बागा जळू लागल्याने रोजगार मिळेना गेला आहे.डाळींब बागा चांगल्या स्थितीत होत्या तेंव्हा बागेत पाच तास काम केले तर 250 रुपये रोजगार मिळत होता.आता कोणी 100 रुपये रोजगाराने ही कामाला लावेना गेले आहे.या बागांच्या जीवावर मुलांचे शिक्षण सुरू होते.त्यांच्या फी डाळींब बागेतून मिळणाऱ्या उत्पादनातून भरल्या जात होत्या.आता ते ही भरणे अवघड झाले आहे.त्यात कुटूंबाचा खर्च कसा भागवायचा असे असंख्य प्रश्न येथील शेतमजुरांना पडले आहेत.

डाळींब व्यापाराच्या वार्षिक 200 ते 300 कोटींच्या उलाढालीत घट

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना अजनाळे गावचे शेतकरी विष्णू देशमुख म्हणाले की,अजनाळे गावामधील प्रत्येक शेतकऱ्यांकडे डाळींबाच्या बागा होत्या.अजनाळे गावचे नाव आशिया खंडातील श्रीमंत गावच्या यादीत होते.परंतु मागील 2 ते 3 वर्षांपासून कोरोनाच्या लॉकडाऊन व अति पावसामुळे डाळींबावर तेलकट,मर,पिन होल बोरर रोग पडल्याने अजनाळे गावातील डाळींबाच्या बागा पूर्ण उध्वस्त झाल्या आहेत.या गावच्या डाळींबाच्या व्यापाराची वार्षिक उलाढाल 200 ते 300 कोटी रुपयांच्या आसपास होती.परंतु डाळींबावरील पडलेल्या रोगाने शेतकरी अडचणीत आला आहे.अजनाळे गावातील शेतकऱ्यांना सर्व बँकांनी कर्जे दिली होती.परंतु त्यांची देणी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत.येथिल शेतकरी पूर्ण उध्वस्त होत चाललेला आहे.शासनाने डाळींबासाठी पीक विमा देणे गरजेचं होतं पण दिलेला नाही.

डाळींब संशोधन केंद्र उभारले परंतु डाळींबावर संशोधन झाले नाही





डाळींबाच्या संशोधनासाठी सोलापूर शहराच्या जवळ डाळींब संशोधन केंद्र उभारले परंतु येथील डाळींब बागांवर संशोधन झाले नाही.शेतकऱ्यांना डाळींब बागा कशाने उध्वस्त होत आहेत तेच कळेना गेले आहे.त्यासाठी शासनाने त्याच्यावर संशोधन करणे गरजेचे आहे.असे विष्णू देशमुख यांना वाटते

डाळींबावरील रोगाने अजनाळे गावातील शेतकरी अडचणीत

अजनाळे गावातील प्रत्येक शेतकऱ्यांकडे बंगला,फॉर्च्युनर गाडी आहे.बोलेरो,दोन चाकी गाड्या,ट्रॅक्टर आहेत.सर्व काही व्यवस्थित चालले होते.परंतु डाळींब बागांवर रोगांचा अचानक आघात झाल्याने अजनाळे गावातील शेतकरी पूर्ण कोलमडलेला आहे.या गावातील शेतीवर आसपासच्या 10 ते 15 गावातील शेतकरी, शेतमजूर अवलंबून होते.त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे.त्यामुळे शासनाने याकडे लक्ष दयावे.अशी मागणी विष्णू देशमुख यांनी केली आहे.

Updated : 10 Jan 2022 1:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top