Home > मॅक्स किसान > दोन टन कांदा विकून स्वतःचे 986 देण्याची वेळ

दोन टन कांदा विकून स्वतःचे 986 देण्याची वेळ

कांद्याला सोलापूरच्या मार्केटमध्ये प्रति किलो एक रुपया, दीड रुपया तर 50 पैसे असा दर मिळाला. यातून दोन टनाचे 2871 रुपये मिळाले. त्यातून व्यापाराचा खर्च म्हणून शेतकऱ्याला जवळचे 986 रुपये द्यावे लागले.

दोन टन कांदा विकून स्वतःचे 986 देण्याची वेळ
X

कांदा उत्पादक (onion) शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणलं आहे. बीड तालुक्यातील नागापूर येथील शेतकऱ्याला दोन टन कांदा विकून आपल्या जवळचेच 986 रुपये व्यापाऱ्याला देण्याची वेळ आली, या हतबल कांदा उत्पादकाची व्यथा...

बीड तालुक्यातील अशोक शिंगारे यांनी दीड एकरवर कांद्याची लागवड केली होती. अवकाळी गारपीट अशा आसमानी संकटाचा सामना करून कांद्याचे पीक जोपासले. यातून दोन टन कांद्याचं उत्पादन झालं. हा कांदा सोलापूरच्या मार्केटमध्ये नेण्यात आला. या मार्केटमध्ये व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला पैसे मिळणे अपेक्षित होते. मात्र शिंगारे यांनाच आपल्या जवळील 986 रुपये व्यापाऱ्याला देण्याची वेळ आली. शिंगारे यांच्या कांद्याला सोलापूरच्या मार्केटमध्ये प्रति किलो एक रुपया, दीड रुपया तर 50 पैसे असा दर मिळाला. यातून दोन टनाचे 2871 रुपये मिळाले. त्यातून व्यापाराचा खर्च म्हणून शेतकऱ्याला जवळचे 986 रुपये द्यावे लागले. मायबाप सरकारने आता कांदा उत्पादक शेतकऱ्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करीत आहेत.

सरकारनेच थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा आणि शेतकऱ्याला दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा वेळीच विचार केला नाही तर मात्र रस्त्यावर उतरण्याचा इशारा शेकापने दिला आहे.पारंपारिक शेती सोडून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली. मात्र बाजारात हा कांदा विक्रीसाठी नेला असता शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू तरंगत आहेत. मायबाप सरकारने वेळीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करणे गरजेचे झाले आहे.


Updated : 25 May 2023 1:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top