Home > मॅक्स किसान > चिकन शॉपचा नवा ट्रेंडी लूक !

चिकन शॉपचा नवा ट्रेंडी लूक !

कोरोना पाठोपाठ बर्ड फ्लूच्या अफवेमुळे पोल्ट्री उद्योगाचे अतोनात असे नुकसान झाले, अशा संकटातही थेट चिकन विक्री च्या माध्यमातून चिकन शोप चा नवा ट्रेंडी लूक बद्दल सांगतायत कृषी अभ्यासक दीपक चव्हाण...

चिकन शॉपचा नवा ट्रेंडी लूक !
X

प्रो चिकन ब्रॅंड : गोविंद नगर, नाशिक येथील आनंद अ‍ॅग्रो समूहाचे वन स्टॉप चिकन सोल्यूशन संकल्पनेतील मॉर्डन चिकन स्टोअर. कोरोना संसर्गानंतर नव्या पद्धतीच्या चिकन शॉप्सकडे ग्राहकांची गर्दी वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रातील पोल्ट्री उद्योगातील अग्रगण्य आनंद अ‍ॅग्रो समूहाने नुकतेच प्रो चिकन ब्रॅंडद्वारे प्रक्रिया व थेट विक्री क्षेत्रात पदार्पण केलेय. समूहाचे चेअरमन उद्धव अहिरे, त्यांची कन्या व प्रो – चिकनची भागीदार असलेल्या श्रुती अहिरेनं पुढाकार घेतलाय.

आनंद अ‍ॅग्रोचा व्यावसायिक विस्तार

आनंद अ‍ॅग्रो समूहाने २२ वर्षापूर्वी पोल्ट्री फार्मिंगमध्य पदार्पण केले. तीन पक्ष्यांनी सुरवात केलेल्या या व्यवसायाचा विस्तार २२ ते २२ लाख पक्षी उत्पादनापर्यंत झाला आहे. मुंबई, मराठवाडा, मध्यप्रदेश, गुजरात अशा राज्यांमध्ये कोंबड्याचा पुरवठा केला जातो.

"नाशिक, धुळे आणि पालघर अशा तीन जिल्ह्यामध्ये २० वर्षापासून करार पद्धतीने कुकुटपालनात जम बसवल्यानंतर आम्ही नुकतेच पुण्यामध्येही उतरलो आहोत. या करारामध्ये शेतकऱ्यांने पोल्ट्री शेड उभारण्यासह केवळ व्यवस्थापन पाहायचे असते. या व्यवसायासाठी लागणारी पिल्ले, खाद्य आणि औषधांचा पुरवठा आनंद अ‍ॅग्रोमार्फत केला जातो," असे श्री. अहिरे सांगतात.

"एक दिवसाची पिल्ले साधारण ४० व्या दिवशी २१०० ग्रॅम वजनाची होतात, त्यावेळी त्या पक्ष्यांची आम्ही विक्री करतो. यात शेडची मालकी ही शेतकऱ्याकडे तर पक्ष्याची मालकी ही कंपनीकडे असते. याला ब्रॉयलर कॉन्ट्रक्ट फार्मिग किंवा करारपद्धतीचे कुक्कुटपालन असे म्हणतात. या वीस लाख पिल्लांच्या निर्मितीसाठी आमच्या दीड लाख पालक पक्षी असून, स्वतःची हॅचरी आहे. ३०० टन क्षमतेचा पशुखाद्य कारखाना आहे. चार जिल्ह्यामध्ये ११ शाखा आहेत."

'प्रो-चिकन'ची संकल्पना काय?

श्रुती अहिरे यांनी इंग्लंड येथून इंटरनॅशनल बिझनेस मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी प्रो-चिकन हे अन्य चिकनपेक्षा कसे वेगळे आहे, हे सांगितले. त्या म्हणाल्या की, लोकांमध्ये आरोग्याप्रती जागरुकता वाढत आहे. म्हणून, आनंद अॅग्रो समूहाने प्रो- चिकन ब्रॅंडद्वारे थेट विक्रीत पदार्पण केलेय. आम्ही प्रक्रियायुक्त चिकन उत्पादनासाठी एक सुरक्षित आणि अद्ययावत यंत्रणा उभी केलीय. सूसज्ज शीतसाखळीद्वारे चिकन सेंटर्सवर माल पाठवला जातो. या प्रक्रियेत स्वच्छता आणि ग्राहकांच्या आरोग्यविषयक सर्व काळजी घेतली जाते.

कमी वजनाचे, लहान पक्षी इथे प्रोसेस्ड केले जातात. प्रत्येक पक्षी १.६ ते १.७ किलो वजनाचा असतो. त्यामुळे चवीला छान लागतो. पक्ष्याच्या कटिंननंतर तो साधारण एक किलोपर्यंत येतो. दोन लेग, तर चार विंग पिसेस असे त्याचे स्वरुप असते. ही प्रक्रिया रिगर मॉर्टिस (Rigor mortis) या शास्त्रीय संकल्पनेवर आधारित आहे. त्यामध्ये कोंबडीचा मृत्यू झाल्यानंतर आधी ती कडक होते व नंतर ती मऊ होते. या प्रक्रियेदरम्यान जिवाणू वाढतात. हे टाळण्यासाठी कापल्यानंतर कोंबडी बर्फांच्या थरामध्ये टाकली जाते. अन्य चिकत विक्रेते हे प्रामुख्याने मोठे पक्षी वापरतात. कारण त्यामध्ये टाकाऊ भाग अत्यंत कमी येतात. आमची ब्रॉयलर चिकन, बोनलेस चिकन, गावरान अंडी आणि मॅरिनेटेड उत्पादन ही मुख्य उत्पादने आहेत. यासोबत अन्य कंपन्यांची फ्रोजन उत्पादनेही आहेत.

उद्धव अहिरे म्हणाले की, जेवढी लहान कोंबडी असेल, तितकी ती टेंडर असते. कोंबडी मोठी होताना त्यामध्ये फायबरचे प्रमाण वाढत जाते. प्रो-चिकन मध्ये आम्ही मुद्दाम लहान व कमी वजनाच्या कोंबड्या कापण्यासाठी वापरतो. कोंबडीच्या शरीराचे वजन ३७ अंश सेल्सिअस असते, ती कापल्यानंतर एक ते दोन तासामध्ये जिवाणूंच्या वाढीला सुरुवात होते. आमच्या चिकनमध्ये कापल्यानंतर त्वरीत ० ते ४ अंश सेल्सिअस तापमानामध्ये थंड करतो. त्यामुळे अगदी तीन ते चार तासापर्यंत किंवा घरी जाईपर्यंत जिवाणूंची वाढ होत नाही. तसेच घरी गेल्यानंतर आपल्या फ्रिजमध्ये व्यवस्थित ठेवल्यास तीन दिवसापर्यंत ठेवता येते. हा अन्य चिकन आणि प्रोचिकनमधील महत्त्वाचा फरक आहे.

भविष्यातील योजना

श्रुती म्हणाल्या, की प्रत्येक विक्री केंद्रावरील स्वच्छतेमुळे ग्राहकांचा विशेषतः मुले, मुली आणि बायका यांचा ओढा असतो. नाशिकमध्ये आमची चार स्टोअर असून, त्यातील जुने स्टोअर गंगापुर रोड येथे असून, काठे गल्ली, उत्तम नगर आणि इंदिरानगर येथे आहेत. येथून प्रो-चिकन उपलब्ध होऊ शकतो.

भविष्याविषयी आम्ही मॅरीनेटेट पॅकेज्ड उत्पादनामध्ये उतरत आहोत. रेडी टू इट आणि रेडी टू कुक अशी उत्पादने आणतानाच नाशिकसह अन्य शहरांमध्ये आऊटलेटची संख्या वाढवण्याचा विचार आहे. आपण ब्रॅण्डेड कपडे, शूज वापरतो. मग आपण उघड्यावरचे चिकन का खातो? हा विचार केला पाहिजे. उघड्यावर कापलेल्या व स्रोत माहित नसलेल्या चिकनपेक्षा पारदर्शक, स्वच्छता पाळलेल्या चिकनला प्राधान्य द्यायला हवे.

आरोग्यासाठी चिकनचे महत्त्व

उद्धव अहिरे म्हणाले, की चिकन हे स्वस्त व सहज उपलब्ध असा प्रथिनांचा स्रोत आहे. आपल्याला प्रति किलो वजनामागे एक ग्रॅम प्रथिनांची म्हणजेच ७० किलो वजन असलेल्या व्यक्तीला ७० ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते. हाडे आणि स्नायूंना ताकद देण्याबरोबरच बी१, बी६ आणि बी १२ या जीवनसत्त्वाचा पुरवठा होतो.

Updated : 3 Feb 2021 3:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top