Home > मॅक्स किसान > ग्राहकांना काय हवंय?

ग्राहकांना काय हवंय?

शेती शेत्र मधील आव्हानांचा मुकाबला करताना फक्त उत्पादन वाढीकडे लक्ष केंद्रित न करता ग्राहकांना काय हवे याचा विचार करून शेतीमध्ये मूल्यवर्धन ची साखळी मजबूत करून विपणन व्यवस्था विकसित केली तरच शेती आणि शेतकरी टिकेल असे विश्लेषण शेती अभ्यासक दीपक चव्हाण यांनी केले आहे...

ग्राहकांना काय हवंय?
X

श्री स्वामी समर्थ आठवडे बाजार कंपनीचे संचालक नरेंद्र पवार म्हणाले, की आपण शेतकरी उत्पादनवाढीकडे अधिक लक्ष देतो, या प्रक्रियेत ग्राहकाला नेमकं काय हवं, ते मागे राहते. उदा. चुहा कारले ग्राहकप्रिय ठरतंय. कारण ते रेग्यूलर कारल्यापेक्षा लहान आहे. फ्रीजमध्ये मावतं. टोमॅटोत वैशाली व्हरायटीला चवीमुळे जोरदार मागणी असते. थोडक्यात, फ्रीजमध्ये मावतील या आकाराच्या फळभाज्या व फळांना अधिक उठाव असतो. याशिवाय, फळाचा आकार किती मोठा आहे, यापेक्षा त्याची चव कशी आहे, याला ग्राहक अधिक पसंती देतो...नरेंद्रजी आणि त्यांची टीम पुण्या-मुंबईत 24 आठवडे बाजार भरविते. त्यामुळे ग्राहकांच्या आवडीनिवडीबाबत त्यांची मते, निरीक्षणे फार महत्त्वाची आहेत.

वरील मुद्दा नेमक्या शब्दात परिभाषित केला आहे आयटीसी कंपनीचे अँग्री बिझनेस प्रमुख एस शिवकुमार यांनी. आयटीसी ही शेती क्षेत्रात काम करणारी बडी कंपनी आहे. एका इंग्रजी दैनिकात दिलेल्या मुलाखतीत एस शिवकुमार सांगतात, भारतीय शेती सध्या संक्रमणातून जातेय. उत्पादन केंद्रीत पुरवठा साखळी (production-driven supply chain) कडून ग्राहक केंद्रीत मूल्य साखळीकडे (demand-driven value chain) एक एक पावलाने पुढे जातोय.

नरेंद्र पवार आणि एस शिवकुमार यांच्या मांडणीत शंभर टक्के साम्य आहे. दोन्हींच्या म्हणण्याचा सार असा, की उत्पादन केंद्रीत शेती पद्धतीत आपण केवळ उत्पादकता कशी वाढेल, व्हॉल्यूम कसा जास्तीत जास्त निघेल किंवा जादा टनेजमध्ये विक्री कशी वाढेल, यावर भर देतो. या प्रक्रियेत ग्राहकांना काय हवं नको ते बाजूला राहते. परिणामी खप घटतो. बाजारभाव पडतात. या उलट जर आपण ग्राहक केंद्रीत नियोजन केलं तर मालास चांगला उठाव मिळतो आणि बाजारही किफायती राहतो.

रंग, आकार, चव आदी मागणीनुसार पिकवल तरी आणखी एक मुद्दा उरतो. तो आहे रेसिड्यू फ्री शेतमालाचा...सेफ्टीचा.

नरेंद्र सांगतात, "पुढील काळात रेसिड्यू फ्री भाजीपाल्यास सर्वाधिक महत्त्व असेल. ग्राहकांत याबाबत कमालीची सजगता वाढतेय. शंका आली तर ग्राहक खरेदी करत नाहीत."

दौंड तालुक्यातील उद्यमशील शेतकरी आणि अॅग्रीवाला स्टार्टअपचे फाऊंडर राहूल पवार सांगतात, की आमचा ग्रुप रेसिड्य़ू फ्री शेतमालाचा कॉर्पोर्ट्सना पुरवठा करतो. पण, त्याच वेळी लोकल मार्केटलाही अगदी ठरवून रेसिड्य़ू फ्रीच माल पाठवतो. दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण रेसिड्यू फ्री माल पिकवणार आणि ग्राहकांना सुरक्षित अन्न पुरवणार ही राहूल यांची भूमिका आहे.

येथून पुढे FSSAI अधिक सक्रिय होत जाणार आहे. रिजर्व बॅंक जशी बॅंकांचा नियंत्रक आहे, त्याच धर्तीवर FSSAI शेतमालाचा आणि एकूणच अन्न उद्योगाचा गुणवत्ता नियंत्रक म्हणून काम वाढवत आहे. FSSAI गुणवत्ता चाचण्यांचे रिपोर्ट्स प्रसिद्ध करतो. त्यात कोणत्या पिकात काय रेसिड्यू सापडले, याचाही तपशील देतो. इंग्रजी माध्यमांसह सोशल मिडियांत अशा रिपोर्ट्सची खूप चर्चा होते. म्हणून, FSSAI च्या रेसिड्यू फ्रीच्या मर्यादा भंग होणार नाहीत याला प्राधान्य दिले पाहिजे. आपला बहुतांश माल रेसिड्यू फ्रीच असतो. फक्त तुरळक नोंदीमुळे नाव खराब होते. त्याबाबत सर्वांना सजग राहवे लागणार आहे.

सारांश, ग्राहक केंद्रीत, चांगले पोषणमूल्य असलेले आणि सुरक्षित शेतमालाकडे सर्वांना वळावे लागणार आहे.

- दीपक चव्हाण

Updated : 21 Jan 2021 1:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top