Home > मॅक्स किसान > जनावरांसाठी घातक लाळ्या खुरकूतचे लसीअभावी ग्रामीण भागात थैमान, काय आहेत प्रतिबंधात्मक उपाय?

जनावरांसाठी घातक लाळ्या खुरकूतचे लसीअभावी ग्रामीण भागात थैमान, काय आहेत प्रतिबंधात्मक उपाय?

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ग्रामीण भागात दुभत्या जनावरांना लाळ्या खुरकूत रोगाची लागण; लसीकरणा अभावी जनावरांचे होत आहेत मृत्यू, शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी कशी घ्यावी? मॅक्समहाराष्ट्राचा स्पेशल रिपोर्ट

जनावरांसाठी घातक लाळ्या खुरकूतचे लसीअभावी ग्रामीण भागात थैमान, काय आहेत प्रतिबंधात्मक उपाय?
X

जिल्ह्यातील ग्रामीण भागात लाळ्या खुरकूत रोगाने थैमान घातले आहे. अनेक दुभत्या जनावरांना या रोगाची लागण झाली आहे. लसीकरणाअभावी जनावरांचे मृत्यू होत आहेत. असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. लाळ्या खुरकूत या रोगाची लागण जनावरांना हिवाळ्याच्या सुरुवातीला होते. याची माहिती शासन, प्रशासनाला असताना जनावरांचे लसीकरण केले नसल्यामुळे जनावरांचे मृत्यू होत आहेत. जनावरांच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार आहे. असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

लाळ्या खुरकूत रोगाची लागण होऊन टाकळी सिकंदर भागात दगावली जनावरे...

टाकळी सिकंदर ता.मोहोळ येथील शेतकरी रफिक सय्यद यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले की,

आमच्या गोट्यातील जनावरांना लाळ्या खुरकूत रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना वैरण खाता येत नाही. जनावरांना ताप आला आहे. त्यांच्या तोंडात जखमा झाल्या असून सतत लाळ गळत आहे. पशू वैद्यकीय दवाखाना गावात असूनही लस मिळाली नाही. त्यामुळे २ जनावरे दगावली आहेत. या रोगाची लागण शेळ्यांना ही झाली आहे. सध्या जनावरांवर खासगी डॉक्टरांकडून कडून उपचार सुरू आहेत. त्यासाठी आतापर्यंत १० ते १५ हजार रुपये खर्च आला आहे. जनावरांच्या पायावर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना चालता येत नाही. १५ लिटर दुध देणारी जनावरे आता २ लिटर दुध देत आहेत.

शासनाने आमचा विचार केला नाही व सरकारी दवाखान्याचा माणूस ही आमच्याकडे आला नाही. जनावरांचे होणारे हाल थांबवण्यासाठी शासनाने लवकर लस उपलब्ध करून द्यावी.

गाईच्या तोंडातून घागरभर लाळ पडली...

शेतकरी नजीर मुजावर यांनी बोलताना सांगितले की, जनावरांना लाळ्या खुरकूत रोगाची लागण झाली असून खासगी डॉक्टरामार्फत उपचार सुरू आहेत. त्यासाठी एका गाईला ५ ते ६ हजार रुपये खर्च आला आहे. जनावरांच्या नख्या नासल्या आहेत. जनावरांचा तोंडातून आत्तापर्यंत घागरभर लाळ पडली आहे. गाईला अशक्तपणा आला असून ती उठेना गेली आहे. त्यामुळे सरकारने लवकरात-लवकर लस उपलब्ध करून द्यावी.

गोठ्यातील सर्वच जनावरांना लाळ्या खुरकूत रोगाची लागण...

आमच्या गोट्यातील जवळपास सर्वच जनावरे लाळ्या खुरकूत रोगाने ग्रासली आहेत. त्यातील २ जनावरे दगावली आहेत. सध्या जनावरांवर खासगी डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. जनावरांच्या तोंडात जखमा झाल्या असून त्यांना चारा खाता येत नाही. जनावरे सतत लाळ गाळत आहेत. त्यांच्या नख्यामध्ये दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना उठता येत नाही. पशु वैद्यकीय दवाखान्याकडून अद्यापही मदत मिळाली नाही. २ ते ३ जनावरे बरी होण्याच्या मार्गावर असून जनावरांना पुन्हा या रोगाची बाधा होऊ नये. लसी अभावी जनावरांचे हाल होत आहेत.

जनावरांची आवक-जावक वाढल्याने जनावरांना लाळ्या खुरकूत रोगाची लागण- डॉ. प्रदीप रणावरे पशुधन विकास अधिकारी

डॉ. प्रदीप रणावरे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले की,

गेल्या महिन्याभरापूर्वी पुणे व अहमदनगर जिल्ह्यात लाळ्या खुरकूत रोगाचा उद्रेक झाला होता. सध्या जनावरांचे बाजार सुरू झाले आहेत. त्यामुळे जनावरांची आवक-जावक वाढली असून लाळ्या खुरकूत रोग वाढण्याचे हे एक कारण मानले जात आहे. या रोगावर लसीकरण हा एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आहे. जनावरांना ६ महिन्यातून एकदा व वर्षातून दोनदा लसीकरण केले जाते. हा रोग विषाणूजन्य असून शक्यतो हिवाळ्याच्या सुरुवातीला व हिवाळा संपून उन्हाळ्याच्या अगोदर पसरण्याचे प्रमाण जास्त असते.

काय आहे रोगाची लक्षण?

जनावरांना जे लसीकरण केले जाते. त्याची इम्युनिटी पॉवर ६ महिने असते. त्यामुळे वर्षातून दोनदा लसीकरण केले जाते. या रोगामुळे जनावरे दगावण्याची शक्यता फारच कमी असते. या रोगामुळे जनावरांच्या तोंडात जखमा होतात. त्यामुळे त्यांना चारा खाता येत नाही. पायावर जखमा झाल्याने त्यांना उठण्यास त्रास होतो. जनावरे सतत लाळ गाळतात. या रोगामध्ये जनावराचे चारा खाणे सुटल्यामुळे इन्फेक्शन होऊन जनावर दगावण्याची शक्यता असते. यावर उपाय केले तर जनावरे दगावत नाहीत. ती पूर्ववत होऊ शकतात.

जनावरांना लाळ्या खुरकूत आजार झाल्यास कोणकोणती काळजी घ्यावी?

या विषाणूजन्य आजाराचे ७ ट्रेंड आहेत. या आजारामध्ये जनावरांच्या जिभेवर फोड येतात. त्यावेळेस त्यांच्या तोंडात बोरो-ग्लिसरीन किंवा कॉस्टिक सोडा लावावा. आजार जनावरांच्या खाण्या-पिण्यातून पसरत असल्याने इतर जनावरांना त्याची लागण होऊ नये. यासाठी लागण झालेल्या जनावराचे विलगिकरण करावे.

त्याला चारा-पाणी वेगळ्या भांड्यात ठेवावे. या रोगाची लक्षणे दिसायला लागताच लागलीच उपचार करून घ्यावेत. या रोगाची लागण गोठ्यातील इतर जनावरांना झाली असेल तर गोठ्यात द्रावणाची फवारणी करून घ्यावी. जनावरांच्या पायावर जखम झाली असेल तर पोटँशियमने जखम स्वच्छ करून घ्यावी. जनावरांना या रोगाची परत लागण होऊ नये. यासाठी जनावरांना कोणते तरी प्रतिजैविक ४ दिवस देणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने या रोगावर मात करता येत असून लसीकरण हा एकमेव या रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय आहे.

लाळ्या खुरकूत आजारावरील प्रतिबंधात्मक उपाय कोणते?

आजारी जनावरांचे तात्काळ विलगिकरण करावे.

दूषित वैरण व आजारी जनावराखाली अंथरलेला पालापाचोळा जाळून टाकावा.

जनावरांच्या गोठ्याचे २ टक्के कॉस्टिक सोडा किंवा फॉरमँलीन द्रावणाने निर्जंतुकीकरण करावे.

आजारी जनावराला निरोगी जनावरासोबत चरण्यासाठी सोडू नये.

आजारी जनावरास सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्यास घेऊन जाऊ नये.

वासरांना आजारी मातापासून दूर ठेवावे.

जनावरांचे सामुदायिक पध्दतीने लसीकरण करावे.

जनावरांच्या आंतरराज्य वाहतुकीवर बंदी घालावी अशा पध्दतीने या आजारावर मात करता येते.

जिल्ह्यात लवकरच लस उपलब्ध होईल: एन. एल.नरळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

आयुक्त कार्यालयाकडे लसीची मागणी केली असून जिल्ह्यात लवकरच लस उपलब्ध होईल. ही लस नाफेड मार्फत येणार आहे. सोमवारी लस जिल्ह्यात दाखल झाल्यास तिचे वाटप करून जनावरांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल. लस जिल्ह्यात लवकर आली तर लाळ्या खुरकूत रोग आटोक्यात येण्यास मदत होणार आहे.

Updated : 25 Oct 2021 10:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top