Home > मॅक्स किसान > शेतकरी आंदोलनाला पवारांचा पठिंबा

शेतकरी आंदोलनाला पवारांचा पठिंबा

शेतकरी आंदोलनाला पवारांचा पठिंबा
X

सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. तशी त्यांची नियत दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत टोकाची भूमिका घ्यावी असं आवाहन माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

यावेऴी पवार म्हणाले की, "एक शेतकरी म्हणून माझा शेतकरी संपाला पाठिंबा आहे. समाजाने शेतकरी संपाला पाठिंबा द्यावा. सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. तशी त्यांची नियत दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत टोकाची भूमिका घ्यावी" ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी पवारांनी शेतकऱ्यांना रस्त्यावर दूध न ओतण्याचे देखील आवाहन केलं.

पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन

“माझी विनंती आहे, आंदोलनात रस्त्यावर दूध ओतणं टाळावे. आक्रोश दाखवायचा असेल तर दूध गरीब मोहल्ल्यात वाटप करा. त्यामुळे कष्टाने पिकवलेल्या मालाची नासाडी होणार नाही. त्याउलट गरिबांची सहानभूती मिळेल”,

पवारांची मुख्यमंत्र्यावर सडकून टीका

मुख्यमंत्र्यांच्या साम दाम दंड भेद वर टीका करत “पालघर पोटनिवडणुकीत भाजप जिंकली असली तरी, शिवसेना आणि हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाला मतं मिळाली. तर भाजपविरोधात बहुसंख्य मतदान झाल्याचं स्पष्ट झालं” असं पवारांनी नमूद केलं .

“मुख्यमंत्र्यांनी पोटनिवडणुकीत पूर्णपणे साम-दाम-दंड-भेदची अंमलबजावणी केली. सत्तेचा गैरवापर केला. बँका खुल्या ठेवणे याचा अर्थ सरळसरळ कोणत्याही मार्गाने निवडणूक जिंकायची. गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढील ८-१० वर्ष निवडणुकीचे काम देऊ नये असा निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारने,केंद्राने जिल्हधिकाऱ्यांना शासकीय सेवेत ठेवता कामा नये. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. निवडणूक यंत्रणा, प्रशासन यंत्रणा मर्यादा सोडून वागता काम नये, अशी भूमिका घ्यायला हवी” असेही पवार म्हणाले.

भाजपविरोधात एकत्र या

“लोकशाहीवर विश्वास असलेल्या सगळ्यांनी, लोकमानस लक्षात ठेवून भाजप विरोधकांनी या परिस्थितीत एकत्र यावं, असं घडलं तर सगळ्यांना एकत्र आणण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हायला आनंद होईल” असं पवारांनी या वेळी सांगितलं.

Updated : 4 Jun 2018 10:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top