Home > मॅक्स किसान > बैल नांगर आणि परंपरा...

बैल नांगर आणि परंपरा...

लिखाणात मातीचा सुंगंध येतो. असं लिखाण तुम्ही कधी वाचलंय का? मातीत राबणाऱ्या, गुरांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या अस्सल शेतकरी बंधूंसाठी Somnath Kannar यांचा विशेष लेख Indian Kirloskar ox plow and tradition Explain by Somnath Kannar

बैल नांगर आणि परंपरा...
X

१९१० साली लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी भारतातला पहिला लोखंडी नांगराचा कारखाना टाकला. त्यापूर्वी लाकडी नांगर होते. लाकडी नांगर २ बैल ओढत. मात्र, लोखंडी नांगर आल्यापासून त्याला ६ बैल जुंपावे लागत. तेव्हापासून शेतकऱ्यांना ८ किंवा ६ बैल दावणीला ठेवणं गरजेचं झालं.

सुरुवातीला किर्लोस्करचे नांगर मोठ्या आकाराचे असल्याने बैलांना ओढायला जास्त श्रम पडत. त्यात नंतर सुधारणा होऊन बैलांना ओढायला सोयीस्कर आणि लहान आकाराचे नांगर त्यांनी विकसित केले. किर्लोस्कर नंतर या व्यवसायात शेतकरी, पारस इत्यादी कंपन्या आल्या. किर्लोस्कर मात्र ब्रँड होता. कारण त्यांनी बैलांना पडणारं कष्ट डोळ्यासमोर ठेवूनच नांगराचं उत्पादन केलं.

किर्लोस्कर कंपनीच्या बांधणीचे नांगर बैलांना ओढायला सोपे जात म्हणून महागडे असले तरी शेतकरी त्यांनाच पसंती देत. नंतर त्या क्षेत्रात आलेल्या पारस कंपनीच्या नागरांच्या धुरी लांब असल्याने फाळ जास्त खोल लागून चांगली नांगरट होत असे. हराळी, कुंदा असलेल्या शेतांमध्ये हा नांगर जास्त उपयोगी ठरला. वडील शेतीत कामाला लागले त्यावर्षी म्हणजे ४० वर्षांपूर्वी आजोबांनी हा पारसचा नांगर आणला होता.

जुन्या माणसांच्या बैठकीत त्या बैलांच्या भीमपराक्रमाच्या कथा सांगताना म्हातारे रंगून जात. अमुक बैलाची शेवटपर्यंत दुसऱ्या कोणत्याच बैलाला बरोबरी करता आली नाही. तमुक बैलाची शेवटपर्यंत वाईट खोड मोडली नाही... किंवा आसूड मारताना नेम चुकल्याने कसा बैलाच्या डोळ्यावर फटका बसून त्याला इजा झाली हे सांगताना माणसं आतून हळहळत.

बैलांच्या मामा-भाच्यांच्या जोड्या असत. अनेक बैलांची नावं तर तीनदा रिपीट झालीय दावणीला. त्यांचा उल्लेख करताना इतिहासातल्या पहिला बाजीराव दुसरा बाजीरावच्या धर्तीवर करत.

मला कळायला लागलं तेव्हा दवणीला ८ बैल होते. त्यातच बालपण गेलं. बैलांइतके शारीरिक कष्ट पृथ्वीवरील क्वचितच दुसऱ्या एखाद्या प्राण्याला उपसावे लागले असतील.. पण बैलांना शेतकरी जपतात किती? याची अनेक उदाहरणं अचंबित करणारी आहेत. बैल होते तोपर्यंत त्यांना पौष्टिक खाद्य म्हणून आर्थिकदृष्ट्या परवडत नसतानाही उडीद आणि हुलगे आम्ही पेरत असू. माणसांनी भाकरीला अंतर दिलं पण बैलांच्या सोयीत मात्र, कमी पडू दिली नाही.

हा नांगर लोखंडी असल्याने अजूनही शाबूत अवस्थेत आहे. याला ओढणारे हाडामांसाचे कित्येक बैल आणि माणसं मातीत मिसळून गेली. मी सातवी-आठवीत जाईपर्यंत आमच्याकडे बैलांनीच नांगरट केली जायची. वडील आणि सालगडी माणसं नांगर धरत. तेव्हा मी प्रचंड आवड असल्याने मध्येमध्ये लुडबुड करून नांगर धरण्याच्या हट्ट करत असे.

मऊ शेत लागलं की माझ्या हातात नांगर देत. तेव्हा याच नांगराचे कर्व्हे (मुठा) माझ्या छातीइतक्या उंच होत्या. तरीही मी जोर देऊन नांगर दाबून धरायचो. हाकणारा मुद्दाम आसूडचा खुळखुळा वाजवून बैलांचा स्पीड वाढवत असे. तेव्हा भेलकांडून माझी फजिती व्हायची. मात्र, अशावेळी आजोबा आयडिया द्यायचे. नांगर तिरपा करून मोठा घास धरला की लोड आल्याने आपोआप बैलांचा स्पीड कमी व्हायचा.

दोनतीन वर्षात अनेक बारकावे शिकलो. आसूड चालवायला शिकताना एकदा असूडाचा ठोका समोर बैलावर न पडता नांगर धरलेल्या नजीर चाचांच्याच कानावर पडला. तेव्हा त्यांच्या कानाचं मांस असुडाच्या टोकाला गुंडाळून आलं होतं. तसं चवताळलेल्या चाचांनी नागरतासातील कडक ढेकूळ पाठीत घातलं. त्यानंतर मात्र, कधी आसूड चुकला नाही.

आज सलग चौथा पोळा आहे, दावणीला बैल नाही. शहरात शिकायला असताना एकवेळ दिवाळी सोडली पण पोळ्याला घरी येणं सोडलं नाही. बारावीत असताना मास्तर सुट्टीच देत नव्हता तेव्हा आज्जी वारली असं खोटं बोलून घरी आलो.

औरंगाबादहुन घरी यायला तेव्हा रात्रीचे १२ वाजले होते. आमच्या गावात तेव्हा बस नव्हती. ४ किलोमीटरचा पांदण रस्ता होता. तळ्याच्या भिंतीवरून वाट होती. रात्री बारा वाजता चिखल तुडवत किर्रर्र पांदण रस्त्याने नोकियाच्या छोट्या मोबाईलच्या टॉर्चवर घरी निघालो. मागचं गाव सोडून लांब पुढे आलो. बारा वाजून गेले होते. तेव्हा अचानक पोळा सण अमावस्येला असतो हे आठवलं.

अन् अमावस्या म्हणताच पोटात भीतीचा गोळा आला. परतही फिरता येत नव्हतं. समोर किर्रर्र अंधार, उंच झाडी, सगळीकडे पाणी अन चिखल. एका पायातला शूज एका ठिकाणी चिखलात खोल गेला तर खालीच राहिला. त्या रस्त्याने कुणाला कसा चकवा झाला वगैरेच्या मन लावून ऐकलेल्या कहाण्या व्हिज्युअल्ससहित आपोआप नजरेसमोर येऊ लागल्या.

काही झालं तरी मागे वळून बघायचं नाही एवढा आज्याने सांगितलेल्या कहाणीतलाच मंत्र ध्यानात ठेऊन झपाझप चालत राहिलो. रात्री घरी पोहोचलो तेव्हा गाव अन घर झोपी गेलं होतं.

मी दार वाजवलं तेव्हा ढाळजेत झोपलेल्या आजोबांनी दार उघडलं. मला पाहून त्यांनी "काहो आले?". (ते कुणालाही आहोजहोच करत) एवढंच विचारलं. बाकी घर जागं झालं तेव्हा आज्जी अन आईने रडपड केली. एवढ्या रात्री कशाला आलास म्हणून काळजीपोटी आईने शिव्या घातल्या.

वडील बारावीचं वर्ष असताना अभ्यास सोडून आला म्हणून भयंकर चिडले. आज्जीने मात्र, जवळ घेऊन पटापट मुके घेऊन कान फुंकले. आजोबा मात्र नॉर्मल होते. धाडसाच्या बाबतीत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवल्याचं आजोबांना कौतुक वाटत होतं. पोळा सणाबाबत एक भयंकर आकर्षण होतं.

२००८ साली ट्रॅक्टर घेतलं. पुढे कापूस, मका,ऊस ही पीकं जाऊन सोयाबीन आल्याने हळूहळू बैल कमी होत गेले. २०१६ ला मी पुण्यात असताना शेवटची बैलजोडी विकली अन आमची दावन सुतक पडलेल्या कपाळासारखी भुंडी झाली. तोपर्यंत वाघासारखा दणकट असलेला आज्या ६ महिन्यातच देवाघरी गेला. मीही परत कधीच पोळ्याला घरी गेलो नाही. पोळ्याच्या दिवशी पोटात आग पडत असे. जेवण कधी गेलं नाही.

कोरोनामुळे यंदा घरीच असल्याने नाईलाजाने पोळ्याला सामोरं जावंच लागलं. तरीही मुद्दाम दिवसभर तालुक्याच्या गावाला निघून गेलेलो. सायंकाळी भरलेल्या पोळ्यातही विशेष मन रमलं नाही.

सकाळी बैलांचा साज काढून डोळे भरून बघून पुन्हा पेटीत ठेवून दिला. काही गोष्टींचं सांत्वन कशानेच होत नाही. ती गोष्ट आमच्यासाठी विनाबैलाचा पोळा ही आहे. कारण हा निव्वळ मौजमजेचा सण नसून कृतज्ञतेचा सोहळा आहे.

आपल्यातली कृतज्ञता लोप पावून आपण कृतघ्न झालोय ही जाणीव फार जीव जाळणारी आहे. या वांझोट्या नांगराला बघून मन कडूजहर झालं. आपण त्या नांगरपेक्षा अधिक वांझोटे आहोत हे सत्य नाकारण्याची सराईत बेईमानी अंगी आली आहेच म्हणा...

Updated : 9 Sep 2021 11:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top