Home > मॅक्स किसान > भारतीय बांबू पोचवला देशात आणि परदेशात

भारतीय बांबू पोचवला देशात आणि परदेशात

बांबूपासून (Bamboo) आकर्षक शोभिवंत वस्तु, टिकाऊ फर्निचर व पर्यावरण पूरक बांधकाम रचना याद्वारे देशात आणि परदेशात ओळख व बाजारपेठ निर्माण केली आहे. Konkan Bamboo and Cane Development Centre (KONBAC) संस्थेची उलाढाल त्यातून २५ ते ३० कोटीवर पोचली आहे.

भारतीय बांबू पोचवला देशात आणि परदेशात
X

सिंधुदुर्ग ( Sindhudurga)जिल्ह्यातील कॉनबॅक ( Conaback)या संस्थेने कोकणातील बांबू क्षेत्र, उत्पादक शेतकरी व प्रक्रिया उद्योगाच्या अर्थकारणाला मोठी चालना दिली आहे. बांबूपासून (Bamboo) आकर्षक शोभिवंत वस्तु, टिकाऊ फर्निचर व पर्यावरण पूरक बांधकाम रचना याद्वारे देशात आणि परदेशात ओळख व बाजारपेठ निर्माण केली आहे. संस्थेची उलाढाल त्यातून २५ ते ३० कोटीवर पोचली आहे.

कोकणात शेताच्या बांधावर, कुंपणाच्या कडेला किंवा जंगलात बांबू लागवडीची परंपरा आहे. प्रत्येक शेतकऱ्यांची आठ- दहा तरी बांबूची बेटे असतात. कुंपण, घरगुती वापरासाठी टोपल्या, सूप, रोवळ्या, धान्य ठेवण्यासाठी लागणारे कणगुले, तटे अशा पारंपरिक पद्धतीने घरोपयोगी वस्तु बनविण्यासाठी या बांबूचा वापर केला जातो. व्यापाऱ्यांकडूनही बांबूची खरेदी होते. परंतु बांबूचा व्यावसायीक दृष्टिकोनातून फारसा विचार झाला नाही.

किंबहुना आंबा, काजू आणि उत्पन्न देणाऱ्या अन्य व्यावसायिक पिकांमध्ये बांबू मागे पडला. बांबू चळवळीची मुहूर्तमेढ तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी कुडाळ भागातील विविध क्षेत्रात कार्यरत तरुण आणि कोकणासाठी काही विधायक करू पाहणाऱ्यांशी २००४ मध्ये कुडाळात संवाद साधला. यामध्ये त्यांनी कोकणातील शाश्वत विकासाची संकल्पना मांडली. त्यात बांबू लागवड, त्यावर आधारित प्रकिया उद्योग या बाबींवर भर दिला. त्यावेळी उपस्थित अनेकांच्या भुवया उंचावल्या. काहींना त्यात स्वारस्य वाटले नाही. काही निवडक व्यक्तींनी मात्र हा विषय गांभीर्याने घेतला.परिसंवाद संपल्यानंतर उद्योगाची संकल्पना समजावून घेतली. कॉनबॅकची स्थापना परिसंवादाचा परिपाक म्हणून की काय सर्व विचारांती सन २००४ मध्ये ‘कोकण बांबू ॲण्ड केन डेव्हलपमेंट सेंटर’ (कॉनबॅक) संस्थेची स्थापना करण्यात आली.



कुडाळ ‘एमआयडीसी’ येथे छोटेसे कार्यालय सुरू करण्यात आले. बांबूवर प्रक्रिया करून विविध उत्पादन निर्मिती सुरू करणे हा त्यामागील उद्देश होता. जिल्हयात व्यावसायिक बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे, या उद्योगातील संधी, अर्थकारणाबाबत जागृती करणे हे मोठे आव्हान संस्थेपुढे होते. पाच संचालकांपैकी संजीव कर्पे आणि मोहन होडावडेकर यांनी सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही जबाबदारी उचलली. डॉ.रामानुज राव संस्थेचे अध्यक्ष आहेत.

कच्च्या मालाची उपलब्धता उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाची (बांबू) उपलब्धता होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जिल्हयात माणगा, भोर, कनक अशा जातीच्या बांबूची बेटे आहेत. यातही माणगा लागवडीसाठी संस्थेने प्रयत्न सुरू केले. बांधावर जाऊन शेतकऱ्यांना भविष्यात बांबूचे महत्त्व कसे असेल हे पटवून देण्याचा प्रयत्न सुरू केला. काहींनी या विषयाची थट्टा केली. काहींनी संस्था प्रकिया म्हणजे नेमके काय करणारे हे समजावून घेतले. मग कुडाळ परिसरातील एकेक शेतकरी लागवडीसाठी पुढे येऊ लागला. रोप उपलब्धता बांबू उद्योगाचे संघटन तसे सोपे काम नव्हते. बांबू लागवडीची पध्दत पारंपरिक आहे. बेटातील साधारणपणे एक वर्ष कालावधी पूर्ण केलेला बांबू मुळासकट काढून लागवड केली जाते. परंतु अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात लागवड शक्य नव्हती.

रोपनिर्मितीचा प्रश्न पुढे आला. त्यामुळे पेरापासुन रोपनिर्मीतीचे प्रशिक्षण सामाजिक वनीकरण विभागामार्फत देण्यात आले. त्यातून हजारो रोपे निर्माण होऊ लागली. शेतकऱ्यांना सामाजिक वनीकरण विभागाकडून ती उपलब्ध होऊ लागली. एकमेकांचे पाहून अनेकांनी लागवडीवर भर दिला. स्थानिक तरुणांना प्रशिक्षण संस्थेने सुरवातीला शोभिवंत वस्तू बनविण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी ३०० महिला आणि १२० पुरुषांना प्रशिक्षण दिले. महिलांना घरच्या घरी वस्तु बनविण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे लहान टोपल्या, मोबाईल स्टॅन्ड, हँगर, आकाश कंदील अशा वस्तू तयार होऊ लागल्या. अनेक महिला स्वतः विक्री करू लागल्या. त्याचवेळी काही तरुणांना मार्केटिंग यंत्रणा निर्माण करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. स्थानिक पातळीवर वस्तुंचे मार्केटिंग होऊ लागले. बांबूपासून वस्तू बनविताना खूप वेळ लागतो. त्यामुळे मजूर व अन्य खर्चाचा विचार केला तर प्लॅस्टिक किंवा थर्माकोल वस्तूंच्या तुलनेत त्यांची किंमत जास्त होती. मात्र पर्यावरण पूरक वस्तुंचे महत्त्व ग्राहकांना समजावून देणे सुरू केले.

अर्थात त्यामध्ये तरूणांची दमछाकही झाली. बाजारपेठांचा विचार कॉनबॅकने कुडाळ एमआयडीसीत मोठी इमारत उभी केली. तेथे शोभिवंत वस्तू बनविण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदी केली. त्याचवेळी पर्यावरण पूरक फर्निचर व्यवसायात उतरण्याचा संकल्पही केला. टेबल, खुर्ची, सोफा सेट, डायनिंग टेबल, लहान-मोठी कॉटेजीस बनविण्यास सुरवात केली. परंतु येथेही दरांचा प्रश्न निर्माण झाला. बाजारपेठेत फायबर, धातू यांच्या तुलनेत बांबूची उत्पादने कित्येक पटीने महागडी होती. त्यामुळे संस्थेने पर्यावरणपूरक विचारांच्या व उत्पादने घेणे परवडू शकेल अशा ग्राहकांचा शोध घेण्यास सुरवात केली. प्रयत्न केल्यानंतर कलात्मक, तीस ते चाळीस वर्षाहून अधिक टिकाऊ अशा या उत्पादनांना मुंबई, पुणे, कोल्हापूर यासह परराज्यात दिल्ली, गुजरातसह देशाच्या विविध शहरांत ग्राहकांकडून पसंती मिळू लागली.



बांधकाम व्यवसायात यश शोभिवंत वस्तु ,फर्निचर या दोन्ही क्षेत्रात नावलौकीक आणि चांगला जम बसविल्यानंतर ‘कॉनबॅक’ ने बांधकाम व्यवसायात प्रवेश केला. त्यासाठी मजुरांना विशेष प्रशिक्षण दिले. बांधकामाला लागणाऱ्या बांबूची निवड करण्यापासून ते बांधकाम उभारणीपर्यंतचे धडे दिले. हैदराबाद येथे हॉटेल इमारत उभारण्याचे काम मिळाले. सुमारे ६० ते ७० टक्के बांबूपासून इमारत बनविण्याचे हे काम प्रशिक्षित मजुरांनी अतिशय मनापासून केले. या कामाची चर्चा अनेक ठिकाणी झाली. पर्यावरणपुरक, आकर्षक अशी इमारत उभी केल्यामुळे कॉनबॅकला अशा वास्तू उभ्या करण्याची कामे मिळू लागली. ‘वर्ल्ड बँके’ साठी ओरिसा येथे तर त्रिपुरा येथे चार मजली इमारतीचे बांधकाम केले. त्यानंतर रेस्टॉरंट उभारण्याची कामे मिळाली. बंगळूर, हैदराबाद, चंद्रपूर, गोवा, केरळ या शहरांतील तारांकित हॉटेल उभारणीही संस्थेने केली. जागतिक पातळीवर सन्मान सातत्य, अविरत कष्ट व गुणवत्ता या जोरावर संस्थेने युगान्डा देशात रिसॉर्टची उभारणी केली. त्यानंतर मालदीव्ज येथेही रिसॉर्ट उभारणीचे काम २०१९ मध्ये मिळाले. ही मोठी संधी होती. दिवसरात्र मेहनत करून रिसॉर्टचा बांधकाम आराखडा कुडाळ येथे तयार केला. त्यानंतर ऐन गणेशोत्सव काळात सर्व साहित्य घेऊन समुद्रमार्गे ‘कॉनबॅक’ चे पथक मालदीव्जमध्ये पोचले. तेथे नावलौकीकाला साजेशा रिसॉर्टची उभारणी केली. ‘सीएनएन’ या जागतिक संस्थेने जगातील सर्वोत्तम दहामध्ये या रिसॉर्टची निवड केली. त्यातूनही पुन्हा तीन रिसॉर्टस निवडली. त्यातही या रिसॉर्टने नाव मिळवले. कॉनबॅकचा जागतिक पातळीवर झालेला हा मोठा सन्मान आहे. साडेतीनशे मजुरांना रोजगार शोभिवंत वस्तु, फर्निचर व बांधकाम अशा तीनही क्षेत्रात नाव कमावताना तब्बल १६ वर्षे खर्च झाली.

टप्प्याटप्याने स्थानिक मजुरांनाच प्रशिक्षित करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. सध्या ३५० हून अधिक तरुण संस्थेत पूर्णवेळ कार्यरत आहेत. अप्रत्यक्षरीत्या हजारो महिला आणि तरुण संस्थेशी जोडले आहेत. बांबू उत्पादकांना समाधानकारक दर सध्या माणगा, भोर किंवा अन्य बांबूला प्रति काठी (सुमारे १८ फुटी) ५० ते ५५ रुपये दर व्यापाऱ्यांकडून दिला जातो. परंतु ‘कॉनबॅक’ संस्था शेतकऱ्यांना प्रतवारीनुसार ८० ते १०० रुपये दर देते. पूर्वी एक वर्षे वयाचे कोवळे बांबू तोडले जायचे. आता तीन वर्ष पूर्ण झालेल्या परिपक्व बांबूची तोडणी होते. सध्या जिल्ह्यातील अडीच हजारांपर्यंत बांबू उत्पादक संस्थेशी जोडले असून ते नियमित पुरवठा करतात. बांबूवर प्रिटींग संस्थेने व्यवसायात सातत्याने नवे तंत्रज्ञान आणले आहे. आता जपानी कंपनीकडून युव्ही लेसर प्रिंटर आणला आहे. बांबूच्या खडबडीत पृष्ठभागावर त्याद्वारे प्रिटींग होते. पर्यावरणाचा पुरस्कार करणाऱ्या अनेक संस्था येथून प्रमाणपत्रे तयार करून घेतात. दीडशे प्रकारच्या वस्तु संस्थेने सुमारे १५० शोभिवंत वस्तूंची निर्मिती केली आहे.

यामध्ये विविध आकाराची घड्याळे, गणेशमूर्ती फोटो फ्रेम, दिवे, काठी, की चेन, पेन स्टॅन्ड, कॉफी मग, टिश्यू पेपर, फ्लॉवर स्टॅन्ड, बॉटल स्टॅन्ड, पेन्टीग ट्रे, बैलगाडी, मोबाईल स्टॅन्ड, हँगर, पेन स्टॅंड, गिफ्ट व चॉकलेट बॉक्स, आकाश कंदील, लहान टोपली आदींचा समावेश आहे. टिकवणक्षमता वाढवली तीन वर्षे कालावधी पूर्ण झालेल्या बांबुवर संस्थेच्या प्रकिया केंद्रात प्रक्रिया होते. किडे-भुंगे किंवा अन्य प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यावर रसायनाची प्रक्रिया होते. बांबू पुन्हा वाळविला जातो. या पद्धतीमुळे वस्तूची ६० वर्षांहून अधिक काळ टिकण्याची क्षमता वाढते.

त्यामुळेच आमच्या वस्तूंबाबत ग्राहक आग्रही असतात असे संस्थेचे संचालक सांगतात. आधुनिक फर्निचर केंद्र महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक विकास कार्यक्रमांतर्गत कुडाळ एमआयडीसी येथे पारंपरिक कारागिरांना एकत्र आणून बांबूपासून आधुनिक फर्निचर निर्मिती केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचे प्रशिक्षण देण्याचे काम ‘कॉनबॅक’ वर सोपविले आहे. संस्थेने जिल्ह्यातील अशा १०० कारागिरांना एकत्र केले आहे. त्यांना उद्योजक म्हणून उभे करण्याचा निर्धार आहे. शासनाने या प्रकल्पासाठी ६ कोटी रुपये निधी दिला आहे. स्फूर्ती प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्हयात शेकडो कारागीर आहेत. शासनाच्या स्फूर्ती प्रकल्पांतर्गत कॉनबॅकने जिल्ह्यातील तीनशे कारागिरांना एकत्र करण्याचे काम केले. सध्या त्यांना मॉडेल फर्निचरचे धडे संस्थेच्या माध्यमातून कुडाळ येथे दिले जात आहेत. आशियातील सर्वात मोठे संशोधन केंद्र बांबू हा शेतकऱ्यांसाठी शाश्वत विकासाचा मार्ग ठरत आहे.

त्यामुळे बांबुवर वेगवेगळ्या पातळ्यांवर संशोधन होणे गरजेचे वाटून शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहयोगाने चंद्रपूर येथे आशिया खंडातील सर्वात मोठे बांबू संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी भव्यदिव्य इमारत उभारण्याचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर त्यासाठी कॉनबॅकचे अग्रक्रमावर आले. एक लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या इमारतीचे काम करण्याची संधी कॉनबॅकला मिळाली आहे. देशासह जगात विविध इमारतींचे रेखीव आणि कोरीव नेत्रदीपक काम करणाऱ्या कॉनबॅकच्या कारागिरांनी इमारतीचे काम अंतिम टप्प्यावर आणले आहे. देशातील बाजारपेठ व उलाढाल सुमारे १६ वर्षांपूर्वी २५ हजार रुपयांच्या भांडवलावर सुरू झालेल्या या संस्थेने आज टप्प्याटप्प्याने उलाढाल वाढवत १० कोटी व मागील वर्षी ३० कोटींपर्यंत मजल मारली आहे. गुजरात राज्यातील एकता मॉल, नवी दिल्ली येथील खादी भवन व कॉटेज इंडस्ट्री मॉल तसेच मुंबई, पुणे आदी ठिकाणी संस्थेचे खरेदीदार आहेत. नुकतेच पार पडलेल्या फिफा वर्ल्ड कप साठी देखील बांबूचे स्ट्रक्चर बनवण्यासाठी कॉनबॅक निवड झाली आणि ती देखील यशस्वी ठरली.

-कॉनबॅक’ ने मालदीव्ज येथे बांबूपासून बनवलेल्या रिसॉर्टला जगातील सर्वोत्तम तीनमध्ये स्थान

- ‘कॉनबॅक’ ने मालदीव्ज येथे बांबूपासून बनवलेल्या रिसॉर्टला जगातील सर्वोत्तम तीनमध्ये स्थान

-बांबू प्रक्रिया उद्योगात देश-परदेशात कॉनबॅकची किर्ती

१.प्रतिक्रिया बांबूची वाढ तीन महिन्यात होते. तीन वर्षात तो परिपक्व होतो. फर्निचरसाठी सागवान, शिसव यासह अनेक झाडांचा वापर केला जातो. त्यांची वाढ होण्यासाठी ५० ते ६० वर्षे लागतात. त्यांची तोड करण्याऐवजी बांबूचा वापर अधिक उपयोगी ठरतो. बांबूची तोडणी केल्यानंतर त्याला सातत्याने फुटवे येतात. पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास होत नाही. -मोहन होडावडेकर,संचालक, कॉनबॅक


२. बांबू प्रकिया उद्योगातून कोकणात शाश्वत विकासाची चळवळ संस्थेच्या माध्यमातून सुरू झाली. गेल्या १६ वर्षात संस्थेने सहकाऱ्यांच्या सहकार्याने यशाचे अनेक टप्पे पार केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शास्त्रीय आणि व्यावसायिक बांबू लागवडीकडे आम्ही वळवले.

-संजीव कर्पे, संचालक,कॉनबॅक







Updated : 20 July 2023 5:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top