News Update
Home > मॅक्स किसान > जनता कर्फ्यू शेतकऱ्यांच्या जीवावर उठला...

जनता कर्फ्यू शेतकऱ्यांच्या जीवावर उठला...

जनता कर्फ्यू शेतकऱ्यांच्या जीवावर उठला...
X

तीन ते चार महिने काळजी घेऊन पिकवलेला भाजपाला शेतकऱ्यांवर जनावरांना खाऊ घालण्याची वेळ, प्रशासनाच्या चुकीने शेतकरी हवालदिल, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची प्रतिभा शिंदे यांची मागणी

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने 11 मार्चपासून जळगाव शहरात जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. या जनता कर्फ्यूचा जोरदार फटका शेकडो भाजी उत्पादक शेतकरी बांधवांना बसला. प्रशासनाच्या विसंगत निर्णयामुळे गरीब शेतकऱ्यांना हे नुकसान सोसावे लागत आहे.

शेतात पिकलेला भाजीपाला शहरात जनता कर्फ्यू सुरु असला तरी कृषी उत्पन्न बाजार समिती व भाजीपाला ठोक खरेदी-विक्री सुरु राहणार असल्याने परिसरातील शेतकरी बांधवांनी आपापल्या गाड्या भरून नेहमीप्रमाणे भाजीपाला जळगावला आणला. परंतु प्रशासनाने सोमवारपर्यंत भाजी मार्केट बंद ठेवण्याचे आदेश दिले.


खरेदीसाठी कोणीही आले नाही. त्यामुळे वेगवेगळ्या गावांमधून विक्रीसाठी आणलेला लक्षावधी रुपये किंमतीचा भाजीपाला उन्हामुळे खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांना अखेर तो फेकून द्यावा लागला.

अनेक शेतकरी बांधवांनी गोशाळेमध्ये गुरांसाठी चारा म्हणून भाजीपाला देऊन टाकला. एकीकडे भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु आणि दुसरीकडे भाजी मार्केट पूर्णतः बंद अशा प्रशासनाच्या अत्यंत विसंगत निर्णयामुळे गरीब शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे आज प्रचंड नुकसान झाले. कोरोना महामारीमुळे भाजीपाला उत्पादक आधीच प्रचंड आर्थिक संकटाशी झुंजत आहेत.

त्यात प्रशासनाच्या चुकीमुळे एकाच दिवशी मजुरी, वाहतूक खर्च आणि माल फेकून द्यावा लागल्याने प्रत्यक्ष झालेले मोठे नुकसान यामुळे शेतकरी बांधव अक्षरशः हवालदिल झाले.

एकेका गावचा सरासरी ४ लाख रुपयांचा माल वाया गेला. यात जळगाव तालुक्यातील एकट्या वऱ्हाड गावच्या नरेंद्र महाजन व सोमनाथ पाटील ह्या शेतकऱ्यांनी सांगितले की,

आज आमच्या गावचा जवळ जवळ चार लाखांचा माल वाया गेला. परत गेल्यावर प्रत्येकी २००० रुपये मजुरी द्यायची आहे. ती कुठून द्यायची? असा संतप्त सवाल भाजी उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासनाला केला आहे.


कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी-विक्री सुरु ठेवणे आणि किरकोळ भाजी मार्केट बंद ठेवणे हे परस्पर विरोधाभासी निर्णय प्रशासनाने घेतलेय. यात प्रशासनाची चूक आहे. त्यामुळे सर्व भाजीपाला उत्पादकांना तात्काळ नुकसानभरपाई देऊन शासनाने संवेदनशीलता दाखवावी, व भरपाई दयावी. अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना वाढला असून असून 11 मार्चला 24 तासात 954 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रोज 500 च्या वर रुग्ण बाधित झाले आहेत. सरकारी आणि खाजगी रुग्णालय पूर्ण भरली आहेत .

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चार दिवस जनता कर्फ्यू जाहीर केला आहे .Updated : 2021-03-12T18:48:28+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top