Home > News Update > शेतकऱ्यांनो कसे घ्याल ऑनलाईन पीक कर्ज?

शेतकऱ्यांनो कसे घ्याल ऑनलाईन पीक कर्ज?

शेतकऱ्यांनो कसे घ्याल ऑनलाईन पीक कर्ज?
X

सोलापूर,दि. 26: कोरोनो विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पीक कर्जासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष बॅंकेत येणे टाळून https://solapur.gov.in संकेतस्थळावरील ऑनलाईन अर्ज भरुन पीक कर्ज मागणी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

या लिंकव्दारे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा अग्रणी बँकेमार्फत संबंधित बँकेकडे पाठविण्यात येणार आहे . एका आधारकार्ड धारकास एका बँकेतच पीक कर्ज मागणी करता येणार आहे. त्यामुळे आपले गाव ज्या बँकेला दत्तक आहे, त्या बॅंकेचे नाव ऑनलाईन अर्ज भरताना टाकणे आवश्यक आहे, असेही शंभरकर यांनी सांगितले.

याबाबत अग्रणी बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक अजय कडू यांनी सांगितले की, सदर अर्ज परिपूर्ण माहितीनिशी भरावा. त्यानंतर तो अर्ज जिल्हा अग्रणी बँकेमार्फत संबंधित बँकेच्या जिल्हा समन्वयक यांच्याकडे पाठवण्यात येईल. जिल्हा समन्वयक ती माहिती संबंधित शाखेकडे पाठवतील. यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक शाखेकडून पीक कर्ज घेण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना कळवण्यात येईल. अर्जदार शेतकऱ्याने अर्ज केल्यापासून तीन दिवसानंतर संबंधित शाखेत पुढील कागदपत्रासह संपर्क साधावा. आधारकार्ड, सातबारा, ८अ, फेरफार नक्कल, पॅनकार्ड, टोचन नकाशा, पासपोर्ट साईज २ फोटो, पास बुक.

अंतिम पीक कर्ज मंजुरी बँकेच्या नियमाप्रमाणे करण्यात येईल. सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व जिल्हा समन्वयकांनी व शाखाधिकारी यांनी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्या कडून प्राप्त करून घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे श्री. कडू यांनी सांगितले.

पीक कर्जाचे उद्द‍िष्ट्य पूर्ण करण्यास बँक आफ इंडियाचा पुढाकार- कडू

सोलापूर जिल्ह्यासाठी बँक ऑफ इंडिया अग्रणी बँक आहे. बँकेच्या जिल्ह्यात 56 शाखा आहेत. या पोर्टलव्दारे प्राप्त झालेल्या 3534 अर्जापैंकी 2403 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित अर्जांवर प्रक्रिया सुरू आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या शेतकरी खातेदारांना नवीन कर्ज देण्यासाठी सर्व शाखांना सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. पीक कर्जाबरोबरच खेळते भांडवल, शेती विकास कर्ज, पशु संवर्धन आदीसाठी लागणारे कर्जही दिले जाईल, असे कडू यांनी सांगितले. पीक कर्जाचे उद्द‍िष्ट्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

अर्ज करण्यासाठीच्या वेबसाईट लिंक

शेतकऱ्यांनी पीक कर्ज मागणी अर्ज भरण्यासाठी https://solapur.gov.in - दस्त ऐवज – ऑनलाइन अर्ज भरा - पीक कर्ज मागणी अर्ज 2020-2021 वर क्लिक करावे, अथवा https://solapur.gov.in – कोरोंना - पीक कर्ज मागणी अर्ज 2020-2021 लिंकवरील फॉर्म भरून पीक कर्ज मागणी नोंदणी करावी. नोंदणीमध्ये काही अडचण आल्यास दत्तक बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहनही कडू यांनी केले आहे.

Updated : 27 Jun 2020 9:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top