Home > मॅक्स किसान > फळशेती 'विदर्भासाठी' एक पर्याय

फळशेती 'विदर्भासाठी' एक पर्याय

विदर्भातील शेतकऱ्यांना संकटातून कायमचे बाहेर निघायचे असेल तर बेभरवाश्याच्या सोयाबीन व कापसाच्या पिकाचे क्षेत्र कमी करावे लागते व वातावरण अनुकूल सीताफळ, आंबा, पेरू या फळशेतीचे क्षेत्र वाढवावे लागेल यासाठी सरकार काही करेल या आशेवर न राहता स्वता शेतकऱ्यांना याची सुरवात स्वतःपासून करावी लागेल सांगताहेत तुषार कोहळे....

फळशेती विदर्भासाठी एक पर्याय
X

या वर्षी विदर्भातील प्रमुख पीक असलेल्या कापूस व सोयाबीन ने परत एकदा शेतकऱ्यांची निराशा केली. सोयाबीनची सततच्या पावसाने जवळपास शंभर टक्के नापिकी झाली व कापसाची परिस्थिती पण फार चांगली नाही. बोंंड अळीचा प्रादुर्भाव व कमी फळधारनेने उत्पादनात प्रचंड घट झाली, यामुळे यावर्षी कापसाची शेती ही शेतकऱ्यांना उत्पादन खर्चालाही न परवडणारी आहे. शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या मजुरीचा खर्च जर का उत्पादन खर्चात जोडला तर यावर्षी कापसाची शेती ही टक्के तोट्याची आहे. मागील काही वर्षांपासून विदर्भात असेच चित्र सत्याने पाहायला मिळते. कर्जमाफी, नुकसानभरपाई हे यावरचे तात्पुरते उपाय आहेत. यामुळे शेतकऱ्यांची कायमस्वरूपी परिस्थिती सुधारत नाही. या संकटातून शेतकऱ्यांना कायमचे बाहेर निघायचे असेल तर बेभरवाश्याच्या सोयाबीन व कापसाच्या पिकाचे क्षेत्र कमी करावे लागते व वातावरण अनुकूल दुसऱ्या पर्यायी पिकांचे क्षेत्र वाढवावे लागेल. यासाठी सरकार काही करेल या आशेवर न राहता स्वता शेतकऱ्यांना याची सुरवात स्वतःपासून करावी लागेल.

पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या संशोधनानुसार विदर्भाच्या वातावरणाला अनुकूल व कमी खर्चाचे पीक म्हणून विचार करायचं झाला तर आंबा, पेरू व सीताफळ या पिकांच्या शेतीचा पर्याय विद्यापीठाने सुचवला आहे. या पिकांच्या फळशेती साठी विदर्भातील वातावरण अत्यंत पोषक आहे. सीताफळ, पेरू व आंबा या पिकांच्या फळ शेतीचा आणखी एक फायदा हा आहे की, या तिन्ही फळांच्या शेती मध्ये आंतरपीक म्हणून इतर पीक घेता येते, त्यामुळे नापिकाचा संभाव्य धोका कमी होतो व शेतकऱ्यांची नियमित पीक साखळी देखील तुटत नाही.

पेरूचा विचार करायच झाला तर या पिकाला सुरवातीला फक्त एकदाच लागवड खर्च आहे. त्यानंतरचा वातावरण पोषक असल्याने उत्पादन खर्च शून्य येतो. पेरू पिकाची फुलधारण ही जून महिन्यात होते व फळ धारणा होऊन पीक हे साधारण ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये शेतकऱ्यांच्या हातात येते, त्यामुळे कमीजास्त पावसाचा व वातावरणाचा या पिकावर कोणताही फरक पडत नाही. सीताफळाचे पण तसेच आहे , सुरवातीला एकदाचा लागवड खर्च आहे त्यानंतर उत्पादन खर्च शून्य आहे. सीताफळाच्या पिकाची फळधारणा ही जून महिन्यात होते व ऑक्टोबर मध्ये पीक शेतकऱ्यांच्या हाती येते. वातावरणाचा सीताफळावर पण कोणताही परिणाम होत नाही. सीताफळाचा पण उत्पादन खर्च शून्य असतो. सीताफळ व पेरूला या पिकांना ना रासायनिक खत द्यावे लागते, ना पिकांना फवारणी करावी लागते, ना अतिवृष्टीची समस्या असते , ना दुष्काळाची भीती असते.

संपूर्ण विदर्भाचे वातावरण हे पेरू व सीताफळ यासाठी अत्यंत पोषक असून दरवर्षी हमखास येणारे पीक आहे. त्यामुळे या दोन पिकांचा विदर्भातील शेतकऱ्यांनी आपल्या पीक पद्धतीत समावेश केला तर विदर्भातील शेतीतील नापिकीचा संभाव्य धोका कमी होतो. पेरू व सीताफळाचे शेती मध्ये खर्च कमी व अधिक उत्पन्न असल्याने शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ होते. पेरू व सीताफळाच्या लागवड साठी जमिनीचे बंधन नाही कोणत्याची जमिनीवर दोन्ही पीक घेता येते, शेतीच्या बांधावर किंवा पडीक जमिनीवर देखील हे पीक घेता येते, सिंचनाच्या सोई नसलेल्या भागात सीताफळ व पेरूची शेती करता येते. इतक्या मोठ्या प्रमाणात सीताफळ व पेरू साठी विदर्भात अनुकूलता आहे.

'आंबा' देखील विदर्भात अत्यंत चांगले येणारे पीक आहे, विशेष करून पूर्व विदर्भात. कृषी संशोधन संस्थांनी व विद्यापीठांनी आंब्यांची नवनवीन वाण विकसित केली. आंब्यांची चव, रंग व आकार यावर संशोधन करून वाण शोधून काढली, सोबतच नैसर्गिक आपत्तीपासून बचाव व्हावा यासाठी कमी उंचीची झाडे विकसित करण्यात आली. रसांचा आंबा, खायचा आंबा, लोणच्याचा आंबा, मुराब्याचा आंबा अशी वेगवेगळी आंब्याच्या जातीची वाण आज बाजारात उपलब्ध आहे. त्यात 'केशर व 'दशरी' जातीची आंब्याची वाण विदर्भाच्या वातावरण अत्यंत अनुकूल असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले. आंब्याच्या शेती साठी पण जमिनीचे बंधन नाही कोणत्याही जमिनीत आंब्याची शेती करता येते. शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर आंबा उत्तम प्रकारे येतो. आंब्याच्या शेतीची पण विशेषता आहे की आंब्यामध्ये पण इतर आंतरपीक घेता येते. सोबत आंब्याच्या शेतीसाठी एकदाच खर्च करावा लागतो.त्यानंतर दरवर्षी उत्पादनच घेणे असते. इतर पिकांप्रमाणे दरवर्षीची शेतीची मशागत, लागवड, बी बियाणे, खते यावर खर्च करावा लागत नाही. काही भागात शेतकरी आंब्याच्या झाडावर थोडाफार प्रमाणात फवारणीवर खर्च करतात, नाहीतर आंब्याच्या शेतीला इतर खर्च नाहीच्या बरोबर असतो.

आंबा, सीताफळ व पेरू हे आवश्यक श्रेणीत येणारे पीक आहे. त्यामुळे या फळांची विक्री ही थेट ग्राहकांना करता येते, मोठ्या बाजापेठेत माल विकता येतो, बचत गटाच्या माध्यमातून प्रक्रिया करता येते, मोठ्या प्रक्रिया केंद्राशी करार करता येतो, या व्यतिरिक्त विक्रीचे अनेक पर्याय शेतकऱ्यांकडे उपलब्ध असतात जे कापूस व सोयाबीन च्या विक्री मध्ये पाहायला मिळत नाही. विदर्भात काटोल, नरखेड, वरुड, मोर्शी, अचलपूर, परतवाडा या मोजक्या तालुक्यात संत्रा व मोसंबीची फळ शेती केली जाते. जर का तुम्ही या भागात फिरले व शेतकाऱ्यांसोबत चर्चा केली तर तुमच्या लक्षात येईल की विदर्भातील कापूस ,सोयाबीन उत्पादक शेतकरी व संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकरी यांच्यात आर्थिक तुलना केली तर फळशेती ही अधिक नफ्याची आहे. फळशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर हा कापूस उत्पादक शेतकाऱ्यांपेक्षा किती पटीने उंचावला आहे.

फळ शेती मध्ये कापसासारखा दरवर्षीचा हंगाम पूर्व खर्च लागत नाही किंवा हंगाम पूर्व खर्चासाठी कर्ज घ्यावे लागत नाही. कापसाच्या शेतीचा व फळशेतीचा हा सर्वात महत्वाचा व मूलभूत फरक आहे. कारण कापसाचा एखादा हंगाम बुडाला तर हंगाम पूर्व खर्च व उत्पादन खर्च हे शेतकऱ्यांच्या डोक्यावर बसतो व पुढे शेतकरी कर्जबाजारीच्या चक्रव्यूहात अडकतो. पाच दहा वर्षात एखादा हंगाम असा असतोच की शेतकरी निश्चित बुडतो व तेव्हापासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कर्जबाजारी पणा सुरू होतो जो संपायचे नाव घेत नाही. फळशेतीत असे नसते फक्त एकदाच सुरवातीला लागवड खर्च येतो त्यानंतर दरवर्षीचा हंगाम खर्च नगण्य असतो. त्यामुळे दरवर्षी कर्ज घेण्याची व कर्जबाजारी होण्याची वेळ फळशेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर येत नाही वरून उत्पादन खर्च कमी असल्याने शेतकऱ्यांसाठी नफा अधिक वाचतो हा अत्यंत महत्वाचा फरक फळशेती व कापूस सोयाबीन शेतीत आहे.

विदर्भात ज्या भागात सिंचनाची सोय नाही त्या भागातील शेतकऱ्यांसाठी आंबा, पेरू व सीताफळ या फळशेतीचा उत्तम पर्याय आहे. कारण या पिकांना ओलिताची गरज नसते. जो बदल संत्रा व मोसंबीच्या शेतीमुळे विदर्भातील काही तालुक्यात पाहायला मिळाला तो उर्वरित विदर्भात निश्चित पाहायला मिळू शकतो. आज सीताफळाच्या शेतीने तेलंगणातील शेतकऱ्यांचे चित्र बदलले, महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सीताफळाची शेती केली जाते. आंब्यामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा मिळत आहे. पेरू मुळे उत्तर भारतात व महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यामध्ये मध्ये शेतकरी फायदा घेत आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या बेभरवशाच्या पिकांकडून सीताफळ, आंबा, पेरू या फळशेतीकडे वळायचा विचार करायला हवा. यामुळे निदान शेतीतील नुकसानीचा संभाव्य धोका कमी करता येईल व दोन पैसे अधिकचे शेतकऱ्यांना आपल्या पदरात पाडून घेता येईल.

तुषार कोहळे, नागपूर.
९३२६२५६५८५

Updated : 24 Nov 2020 1:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top