Home > मॅक्स किसान > अवकाळी पावसाच्या तडाख्यात द्राक्ष बाग उध्वस्त

अवकाळी पावसाच्या तडाख्यात द्राक्ष बाग उध्वस्त

सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पावसाचा मोठा फटका द्राक्ष बागांना बसला असून बागा पुन्हा उभ्या कशा करायच्या असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट

अवकाळी पावसाच्या तडाख्यात द्राक्ष बाग उध्वस्त
X


सध्या सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. यामध्ये जिल्ह्यातील अक्कलकोट, मोहोळ,सांगोला,बार्शी उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर,पंढरपूर तालुक्यात लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाच्या तडाख्यात सांगोला तालुक्यातील काही गावात घरावरील पत्रे उडून गेले आहेत तर काही ठिकाणी वीज पडून जनावरे दगावली आहेत. याच अवकाळी पावसात काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. अक्कलकोट तालुक्यात वीज पडून शेळ्या दगावल्याची घटना घडली आहे. तर दक्षिण सोलापूर तालुक्यात शाळेवरचे पत्रे उडून गेले आहेत. येथे शेती पिकांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाच्या तडाख्यात द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात हानी पोहचली आहे. सध्या द्राक्ष तोडणीचा हंगाम सुरू आहे. हातातोंडाला आलेला घास अवकाळी पावसाच्या तडाख्याने हिरावला असल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसले आहे. या अवकाळी पावसाच्या तडाख्यात पंढरपूर तालुक्यातील खर्डी गावातील शेतकरी समाधान जाधव आणि विठ्ठल जाधव या बंधूंची दोन एकर द्राक्ष बाग जमिनीवर कोसळली आहे. येत्या आठ दिवसात द्राक्ष बाग उतरवली जाणार होती. पण अवकाळी पावसाचा बागेला फटका बसल्याने या दोन्ही बंधूंचे जवळपास 25 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. या अवकाळी पावसाच्या तडाख्यात द्राक्ष बाग जमीनध्वस्त झाली आहे. त्यामुळे बाग पुन्हा कशी उभा करायची असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे.

पंधरा लाख रुपये खर्चून उभारली होती बाग




शेतकरी समाधान जाधव आणि विठ्ठल जाधव यांनी या द्राक्ष बागेची पहिल्याच वर्षी लागण केली होती. अँगल फाउंडेशन,ड्रीप,छाटणी, मजुरी यासाठी सुमारे 15 लाख रुपये खर्च केला होता. वर्षभर काबाडकष्ट करीत द्राक्ष बाग व्यवस्थित सांभाळली होती. या बागेसाठी वेळच्यावेळी औषध फवारण्या केल्या होत्या. या बागेतून पहिलेच द्राक्ष उत्पादन निघणार होते. त्यासाठी येत्या आठ दिवसात द्राक्ष बागेची तोडणी होणार होती. पण अचानक अवकाळी पावसाच्या तडाख्यात द्राक्ष बाग जमीनध्वस्त झाल्याने त्यांच्या आशेवत कष्ठावर पाणी फेरले आहे. त्यांची घोर निराशा झाली आहे. या बागेची उभारणी सावकाराकडून आणि इतरांकडून कर्ज काढून उभारणी केली होती. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

अवकाळी पावसाच्या तडाख्यात 25 लाख रुपयांचे नुकसान

शेतकरी समाधान जाधव आणि विठ्ठल जाधव यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले की, अवकाळी पाऊस भरपूर जोरात होता. यात मोठ्या प्रमाणात वारे वाहत होते. या वादळी वाऱ्यात दोन एकर बाग जमिनीवर कोसळली आहे. या बागेच्या उभारणीसाठी 15 लाख रुपये खर्च आला होता. यासाठी सावकाराकडून व बँकेकडून कर्ज काढण्यात आले होते. वादळी वाऱ्याच्या तडाख्यात जवळ-जवळ 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. येत्या 4 दिवसात बाग उतरवली जाणार होती. या दोन एकर क्षेत्रातून 50 ते 55 टन द्राक्षे निघाली असती. ती मार्केटमध्ये सुमारे 50 ते 55 रुपये किलोने विकली गेली असती. साधारण एका झाडाला 30 किलोच्या आसपास द्राक्षे निघाली असती. या दोन एकरात दोन हजाराच्या आसपास झाडे लावली होती. त्याची लागण 18 बाय 5 वर लागण केली होती. यासाठी पंधरा लाखाच्या आसपास खर्च केला होता. पण सध्या द्राक्ष बाग अवकाळी पावसामुळे जमिनीवर पडली आहे. आता या द्राक्षेला व्यापारी कमी भावात मागत आहेत. पण द्राक्षे विकली जाईल की नाही हा देखील प्रश्न उभा राहिला आहे. जर द्राक्षे विकली गेली तर कमीत-कमी 20 ते 25 रुपये किलोने विकली जाईल असे वाटते. यामध्ये द्राक्षेचे 70 टक्के नुकसान झाले आहे. या द्राक्षेत साखरेचे प्रमाण कमी असल्याने याचा बेदानाही करता येत नाही.




बागेचा तलाठ्याने केला पंचनामा

जमिनीवर कोसळलेल्या बागेचा पंचनामा तलाठ्याने केला असून त्याबाबतची माहिती वरिष्ठांना देण्यात आली असल्याचे शेतकरी समाधान जाधव यांनी सांगितले. अवकाळी पावसात नुकसान झालेल्या पिकांना नुसान भरपाई देण्यात यावी यासाठी शासनाचा जीआर आला नसल्याचे तलाठ्याने सांगितले असल्याचे शेतकरी समाधान जाधव आणि विठ्ठल जाधव यांनी सांगितले. त्यामुळे शासनाची मदत मिळते का नाही याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. बाग पुन्हा उभी करायची असल्यास शेतकरी जाधव बंधूंना सुमारे 6 ते 7 लाख रुपये खर्च येईल असे सांगितले जात आहे. एकीकडे सावकाराचे कर्ज तर बाग कशी उभी करायची या दुविधा मनस्थितीत शेतकरी समाधान जाधव आणि विठ्ठल जाधव अडकले आहेत. या पडलेल्या बागेची पहाणी विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी केली असून तातडीने मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याचे शेतकरी जाधव बंधू यांनी सांगितले. त्याचबरोबर कृषी अधिकारी,मंडल अधिकारी, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष यानी भेट देऊन पाहणी केली आहे. त्यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. असे शेतकरी जाधव यानी बोलताना सांगितले.




Updated : 15 April 2022 2:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top