Home > मॅक्स किसान > दापोलीतील तरुणाची यशोगाथा, गावरान कुक्कुटपालन

दापोलीतील तरुणाची यशोगाथा, गावरान कुक्कुटपालन

दापोलीतील तरुणाची यशोगाथा, गावरान कुक्कुटपालन
X

आपत्तीमध्ये कोणी ढासळतं… तर कोणी उभारी घेतं. 2020 च्या कोविडनंतर जगण्याचे संपूर्ण संदर्भ बदलले. अनेकांनी नोकऱ्या गमावल्या, तर अनेकांनी नव्या संधी शोधल्या. मुंबईतील नोकरी गमावून रत्नागिरीच्या दापोली, तामोण गावात परतलेल्या 28 वर्षांच्या संकेत वसंत महाडिक यांची कथा हेच सिद्ध करते की संकट म्हणजे संधीही असते—जर ती योग्य नजरेने पाहिली तर! मुंबईतील चांगली नोकरी कोरोनात गेल्यानंतर संकेत आपल्या गावी परतले. परंतु नोकरी गेल्यानं खचून न जाता त्यांनी शेतीसोबतच काहीतरी पूरक व्यवसाय करायचा ठरवला. कृषिक्षेत्राशी आपलं नातं असल्यामुळे संकेत यांनी भातशेतीसोबत गावरान कुक्कुटपालन सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांची ही छोटीशी सुरुवात एक प्रेरणादायी यशोगाथा ठरते आहे.

नोकरी सोडून कुक्कुटपालन सुरू केल्यावर आरंभी अनेकांनी टीका केली. पण न खचता तो उभा राहिला आज त्याच लोकांना संकेत यांचा प्रयत्न आणि मेहनत दिसते, आणि तेच त्यांचा अभिमानही बनले आहेत. “कोकणात आलात की फक्त नोकरी सोडून बसू नका. झाडं लावा, शेती करा, पर्यायी कुक्कुटपालन करा… आपल्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी निर्माण करा.” असा संदेश संकेतने तरुणांना दिला आहे.

एका कोंबडीपासून सुरू झालेला प्रवास…

संकेत सांगतात, “मी फक्त एक गावठी कोंबडी घेऊन आलो… आणि त्या एकाच कोंबडीपासून आज माझ्याकडे 35 ते 40 पक्षी आहेत.”

त्यांनी कुठलाही महागडा हायब्रिड न वापरता घरातले उरलेले अन्न, भात, तांदूळ किंवा गहू यावरच पक्ष्यांना वाढवलं.

आज त्यांच्याकडे 30 ते 35 प्युअर गावठी कोंबड्या आहेत आणि दररोज 5–6 अंडी मिळतात.

गावठी अंड्याची ओळख ते स्पष्ट सांगतात

थोडंसं तपकिरी कवच, लहान आकार, पण प्रोटीन भरपूर.

गावठी अंडं लहान बाळालाही सुरक्षित, तर बॉयलर अंडं अनेकदा इन्फेक्शनचं कारण ठरू शकतं.

गावठी कोंबडीला बाजारात मोठी मागणी

गावठी कोंबडीच्या किंमतीही आकर्षक आहेत

कोंबडी – 350 रुपये नग

कोंबडा – 600 रुपये नग

गावठी अंडं – 12 रुपये

बॉयलर अंडं – 6–7 रुपये

संकेत सांगतात, "माझ्या आसपासचे ग्राहक इतके आहेत की अंडी घरात टिकतच नाहीत. मागणी जास्त, उत्पादन कमी...म्हणून पुढे मोठा शेड उभारण्याचा विचार करतोय.”

आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कुक्कुटपालन केले जाते. पण बॉयलर कोंबड्यांच्या तुलनेत गावठी कोंबड्यांची गुणवत्ता, पोषणमूल्य आणि मागणी अधिक आहे. म्हणूनच हा व्यवसाय लाभदायक आणि टिकाऊ मानला जातो.

संकेतनं सांगितले की, “शेतकऱ्यांनी सुरुवात एक किंवा दोन कोंबड्यांपासून करावी. प्रशिक्षण न घेतल्यास नुकसान मोठं होतं. पिल्लं मरतात, खर्च वाढतो. आधी अनुभव घ्या, नंतरच मोठा प्रोजेक्ट उभारा.”

शासनाच्या योजना उपलब्ध, पण आधी अनुभव महत्त्वाचा

कुक्कुटपालनासाठी शासनाकडून अनेक योजना उपलब्ध आहेत. परंतु संकेत यांचा स्पष्ट सल्ला...

“सुरुवातीला योजनेच्या मागे धावू नका. आधी छोटी सुरुवात करा, अनुभव घ्या. 30–40 कोंबड्यांचा गट तयार झाल्यावरच प्रोजेक्ट वाढवा.”

समाजाची धारणा बदलली…

तरुणांसाठी संदेश

कुक्कुटपालन हा उत्तम पूरक व्यवसाय आहे.

पहिल्यांदा प्रशिक्षण घ्या.

थेट मोठ्या गुंतवणुकीत पडू नका.

घरच्या अंगणात 2–3 कोंबड्यांपासून सुरुवात करा.

संयम, शिस्त आणि स्वच्छता पाळा.

गावठी कोंबडीचे उत्पादन आणि बाजारमूल्य दोन्ही मोठे आहे.

निश्चय, मेहनत आणि स्वप्न—या तिन्हींचा सुंदर मिलाफ

गावातील एका कोंबडीपासून सुरू झालेला व्यवसाय… आज 40 पक्ष्यांपर्यंत पोहोचला आहे.

संकेत महाडिक यांच्या या लहानशा उद्योगाने अनेकांना रोजगाराची, प्रेरणेची आणि नव्या सुरुवातीची दिशा दाखवली आहे.

कोविडने नोकरी हिरावली… पण संकेतने संधीचं सोनं केलं!

Updated : 25 Nov 2025 5:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top