Home > मॅक्स किसान > "देशाचे भविष्य कृषिक्षेत्रात आहे; शेतकऱ्यांनी जमिनी विकू नये" : राज्यपाल रमेश बैस

"देशाचे भविष्य कृषिक्षेत्रात आहे; शेतकऱ्यांनी जमिनी विकू नये" : राज्यपाल रमेश बैस

देशाचे भवितव्य कृषिविकासात (Agri Development) आहे. देश कृषिप्रधान असल्यामुळे आर्थिक मंदीच्या काळात देखील देशाला त्याची झळ बसली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन कधीही विकू नये. आगामी काळात ज्याचेकडे शेती असेल त्याचेकडे पैसा असेल. कृषीच्या माध्यमातून देशाला फार पुढे नेता येईल. त्यामुळे कृषी स्नातकांनी शेतीकडे वळावे व कृषिविकासात मोठे योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

देशाचे भविष्य कृषिक्षेत्रात आहे; शेतकऱ्यांनी जमिनी विकू नये : राज्यपाल रमेश बैस
X

राज्यपाल बैस (Ramesh Bais) यांच्या प्रमुख उपस्थितीत दापोली (Dapoli) येथील डॉ. बाळासाहेब सावंत (Dr. Balasaheb Sawant) कोकण कृषि विद्यापीठाचा ४१ वा दीक्षांत समारोह आज संपन्न झाला, त्यावेळी स्नातकांना संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्रात राज्यपाल झाल्यावर आपला पहिला सार्वजनिक कार्यक्रम देशविकासात योगदान देणाऱ्या एका कृषी विद्यापीठात होत आहे याचा आनंद आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

पूर्वी लोक पैसे मिळाले तर दोन चार एकर जमीन घेत. परंतु आजकाल जमिनीला चांगला मोबदला मिळाला तर लोक शेतजमीन विकून टाकतात, त्या पैशातून घर, गाडी घेतात, अश्या प्रकारे अनेक गावातील लोकांनी आपल्या जमिनी गमावल्या आहेत आणि एकेकाळी शेतमालक असेलेले लोक आज शेतमजूर झाले आहेत. पूर्वी लोक जमीन कधीही विकत नसत असे सांगून शेतकऱ्यांनी जमीन जपली पाहिजे आणि त्यासोबतच पाण्याचे देखील योग्य नियोजन केले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

कृषी स्नातकांनी शिक्षण प्राप्त केल्यानंतर गावात जाऊन अनुकरणीय शेती करावी तसेच शेतीला उद्योगाची जोड द्यावी, असे सांगताना देशासाठी व्यापक हिताचे काम केल्यास लोक लक्षात ठेवतात असे राज्यपालांनी सांगितले. कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आपल्या भाषणातून शासनाने घेतलेल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध निर्णयांची व योजनांची माहिती दिली. कृषी स्नातकांना शेतीसाठी मदत करण्यासाठी आपण नेहमी खंबीरपणे पाठीशी उभे राहू असे त्यांनी सांगितले.

"कृषी विद्यापीठे ही अन्नब्रह्म मंदिरे": डॉ एस अय्यप्पन

देशातील कृषी विद्यापीठांच्या योगदानामुळे आज भारत अन्नधान्याच्या उत्पादनात केवळ स्वयंपूर्णच नाही तर निर्यातदार देखील झाला आहे. कृषि विद्यापीठांनी संशोधनातून निर्माण केलेल्या वाणांमुळे हे शक्य झाले आहे असे सांगताना देशातील ७५ कृषि विद्यापीठे ही अन्नब्रह्माची मंदिरेच आहेत असे प्रतिपादन भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक डॉ. एस अय्यप्पन (Dr. S. Ayyappan) यांनी आपल्या दीक्षांत भाषणात केले. हवामान बदल, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास, पाणी व ऊर्जेची वाढीव गरज ही कृषि क्षेत्रापुढील आव्हाने असून देशातील १६० कोटी जनतेला अन्नसुरक्षा देण्याकरिता सन २०४७ पर्यंत अन्नधान्य उत्पादन दुप्पट करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील कृषी विद्यापीठांमधून दरवर्षी १ लक्ष कृषी स्नातक तयार होत असून त्यांनी कार्यक्षम कृषी, स्मार्ट फार्मिंग व ज्ञानाधिष्ठित कृषी तसेच कृषी स्टार्टअप सुरु केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. दीक्षांत समारोहाला रत्नागिरीचे पालक मंत्री तसेच उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samantha), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय सावंत (Dr. Sanjay Sawant), विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, शिक्षक व स्नातक विद्यार्थी उपस्थित होते. सुरुवातीला राज्यपालांनी कृषी प्रदर्शनाला भेट दिली.

Updated : 15 March 2023 12:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top