Home > मॅक्स किसान > खतांचे नवीन दर जाहीर, किती रुपयांना मिळणार कोणतं खतं?

खतांचे नवीन दर जाहीर, किती रुपयांना मिळणार कोणतं खतं?

शेतकरी बंधूसाठी महत्त्वाची बातमी, केंद्र सरकारने जाहीर केल्या खतांच्या किंमती, कोणत्या खताची किती असणार किंमत? जाणून घेण्यासाठी वाचा...

खतांचे नवीन दर जाहीर, किती रुपयांना मिळणार कोणतं खतं?
X

पेरणीच्या हंगामामध्ये केंद्र सरकारने खताचे दर जाहीर केले आहेत. केंद्र सरकारच्या या दरपत्रकात शेतकऱ्यांसाठी कही खुशी कही गम पाहायला मिळत आहे. सध्या तरी सरकारने डीएपी आणि युरियाच्या किंमतीमध्ये कुठलीही वाढ केलेली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती पाहता अनेक कंपन्यांनी खतांचे दर वाढवले होते. मात्र, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने डीएपी आणि युरियाचे अनुदान वाढवत सरकारला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यंदाच्या हंगामात एनपीके 265 रुपयांनी महागणार आहे.

या संदर्भात केंद्रीय रसायने मंत्री मनसुख मांडवीया म्हणाले,

"सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किंमती खूप वाढल्या आहेत आणि आम्हाला अनेक प्रकारची खते आयात करावी लागणार आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम मोदींनी एमआरपी वाढवण्याऐवजी सबसिडी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे."

युरियामधील सबसिडी 1500 रुपयांवरून वाढवून 2000 रुपये करण्यात आली आहे, त्याचबरोबर डीएपीची सबसिडी 1200 रुपयांवरून 1650 रुपये करण्यात आली आहे, तसेच एनपीके 900 रुपयांवरून 1015 रुपये, एसएसपी 315 रुपयांवरून 375 रुपये करण्यात आल्याची माहिती मनसुख मांडवीया यांनी दिली आहे.

रब्बी हंगामातील पेरणीसाठी रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. मात्र, या वर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांना एनपीके (इफ्को) ची गोणी 265 रुपयांनी महाग मिळणार आहेत.

DAP वर 1650 रुपये आणि युरियावर 2000 रुपये प्रति बॅग सबसिडी

या पूर्वी 19 मे 2021 ला केंद्र सरकारने डीएपीच्या सबसिडीमध्ये प्रति बॅग 500 रुपयांची वाढ केली होती. खरं तर, मे 2019 पूर्वी डीएपीची वास्तविक किंमत प्रति बॅग मागे 1700 रुपये होती, ज्यावर सरकार प्रति बॅग 500 रु ची सबसिडी देत होतं, आणि कंपन्या 1200 रुपये प्रती बॅग विकत होते. परंतु जागतिक बाजारपेठेत डीएपीमध्ये वापरल्या जाणाऱ्या फॉस्फोरिक ऍसिड, अमोनिया इत्यादींच्या आंतरराष्ट्रीय किंमती वाढल्यानंतर, डीएपीची किंमत वाढली होती आणि प्रति बॅग किंमत सुमारे 2400 रुपयांपर्यंत पोहोचली होती, सरकारने 500 रुपयांची सबसिडी कमी केल्यानंतर, कंपन्यांनी खताची बॅग 1900 रुपयांनी विकली होती. त्यानंतर सरकारने अनुदानात 140 टक्के वाढ केली आणि डीएपीच्या प्रति बॅगमागे 1200 रुपयांपर्यत सबसिडी वाढवली होती.

मात्र, आता ऑक्टोबरच्या निर्णयानंतर डीएपीच्या एका बॅगवरील सबसिडी वाढून 1,650 रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच, शेतकऱ्याला या रब्बी हंगामात डीएपी च्या एका बॅगसाठी 1200 रुपये मोजावे लागणार आहेत.

डीएपी, एनपीके आणि युरियाचे नवीन दर...

दरम्यान, वाढलेल्या किंमती आणि सरकारकडून मिळणारी सबसिडी मिळून खतांचे दर पुढील प्रमाणे असतील. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कॉर्पोरेशन (इफको) ने नायट्रोजन-फॉस्फरस-पोटॅशियम आणि सल्फर (NPK-NP) खतांच्या किंमतीत 265 रुपयांनी वाढ केली आहे. इफ्को 2 प्रकारचे एनपीके तयार करते.

आता NPK (10:26:26 नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम गुणोत्तर) असलेली 50 किलोचं 1175 ऐवजी 1440 रुपयाला मिळेल. तर एनपीके (12:32:16) ची सध्याची किंमत रु 1185 वरून वाढून 1450 पर्यंत वाढली आहे. दरम्यान, हे नवीन दर 15 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत, परंतु जुना माल जुन्या दरानेच उपलब्ध होईल.

याशिवाय 45 किलोचं युरियाची बॅग 265 रुपयांना उपलब्ध होईल, तर 50 किलो डाय अमोनियम फॉस्फेटची किंमत 1200 रुपये प्रति बॅग असणार आहे.

Updated : 19 Oct 2021 6:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top