ऐकावं ते नवलंच! सांगलीत शेतकऱ्याने पिकवले “सफरचंद”

सफरचंद म्हटलं की, आपल्याला कश्मिरच्या खोऱ्याची आठवण होते. सफरचंद या फळाचे झाड कसे असेल? ते कोठे पिकते? असा प्रश्न अनेकांना पडतो.

सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यात खेराडे वांगी नावाचे गाव आहे. या गावाच्या नावात वांगी असा उल्लेख असला तरी येथील शेतकऱ्याने चक्क सफरचंदाची बाग फुलवली आहे. विटा येथील प्रयोगशील शेतकरी लक्ष्मण सूर्यवंशी या शेतकऱ्याला सफरचंद बाबत कुतूहल होते. हे फळ आपल्या भागात वठेल का? याचा त्यांनी विचार केला.

प्रयोग म्हणून त्यांनी व्हिएतनाम येथील रोपे आंध्रप्रदेश येथील मित्राच्या मदतीने मागवली. डाळिंबाच्या बागेत सव्वाशे रोपांची लागण केली. रोपे मोठी होऊ लागली. या रोपांना खते कोणत्या प्रकारची द्यायची? औषधे कोणती द्यायची? त्यावर रोग कोणता येतो? हे प्रश्न त्यांना सतावू लागले.

पुण्यातील एका शेती तज्ञाला त्यांनी यासाठी फोन करून याबाबत शेड्युल मागितले. त्यांनी इकडे सफरचंद येणे शक्य नाही. या फंदात पडू नका असा सल्ला दिला आणि शेड्युल दिले नाही. या उत्तरावर खचून न जाता त्यांनी डाळिंब बागेच्या अनुभवातून शेड्युल तयार केले.

अडीज वर्षात ही रोपे मोठी झाली. याबाबत लक्ष्मण सूर्यवंशी सांगतात

“मी आयुष्यात कधीही सफरचंदाचे झाड पाहिलेले नाही. मला मिळालेले रोप सफरचंदाचे आहे का? याबाबतही मला संशय होता. म्हणून मी पहिला बहर लवकरच पकडला. हळू हळू फुले येऊ लागली आणि या हंगामात लाल टपोरी सफरचंद झाडाला बहरली.

पुढे ते सांगतात आमचा प्रयोग ऐंशी टक्के यशस्वी झाल्याचा आम्हाला आता विश्वास आहे. आम्ही या प्रक्रियेचे रीडिंग घेत असून या भागात शेतकऱ्यांनी किमान दोन झाडे लाऊन हा प्रयोग करायला हरकत नाही.
सफरचंदाच्या झाडाचे फोटो त्यांनी माहिती नाकारलेल्या कृषी तज्ञाला पाठवली. तर त्याचा त्यावर विश्वास बसेना. तो आता त्यांना नव्याने या बागेचे शेड्युल द्यायला तयार झाला आहे.

काही वर्षापूर्वी ज्या माळावर केवळ कुसळे पाहायला मिळत होती. त्या भागात आलेल्या टेंबू योजनेमुळे आता सफरचंदाची बाग पाहायला लोक येत आहेत. लक्ष्मण सूर्यवंशी यांनी केलेला हा प्रयोग सध्या यशस्वी होताना दिसत आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन केवळ पारंपरिक पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनातही आता नवनवीन प्रयोगाच्या संकल्पना रुजत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here