Home > मॅक्स किसान > संकटात संधीचं सोनं..

संकटात संधीचं सोनं..

शेती म्हणजे संकट आणि चढ-उताराचा महामेरू. सर्व संकटांवर मात करून एक एकर कलिंगडाच्या विक्रीतून शेतकऱ्याला मिळाले तब्बल सात लाख रुपयांचे उत्पन्न घेणाऱ्या दीपक वैद्य यांच्या यशोगाथेचा प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट

संकटात संधीचं सोनं..
X

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आला आहे.लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांचा शेती माल शेतात पडून राहिला होता.तर काही शेतकऱ्यांनी गावोगावी फिरून कवडीमोल दराने विकला होता.अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले होते.काही महिन्यांपासून परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असताना पुन्हा एकदा वाढत्या ओमीक्रोन व्हेरियन्टच्या प्रभावाने निर्बंध कडक केले असल्याने लॉकडाऊन होते की काय ? या भीतीने शेतकरी वर्गात धास्ती भरली आहे.त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या अनेक महिन्यापासून सांभाळलेली पिके,फळबागा पुन्हा लॉकडाऊन लागल्यास वाया जातील व आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल असे शेतकऱ्यांना वाटत आहे.





गेल्या काही दिवसांपासून शेती व शेतकऱ्यांवर नैसर्गिक व मानव निर्मित संकटे एकामागून एक धडकत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते कोलमडू लागली आहेत.पण या सर्व संकटांवर मात करत बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथील शेतकरी दीपक वैद्य व त्यांच्या कुटूंबाने परिस्थिती समोर हार मानली नाही.तिच्याशी दोन हात करत एक एकरात तब्बल 7 लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे कलिंगडाचा माल विकला नसल्याने कलिंगडाच्या शेतीवर रोटर फिरवावा लागला होता.पण त्याच जिद्दीने पुन्हा या कुटूंबाने उभे राहत,या वर्षी एक एकरात कलिंगडची लागवड केली.त्यांना या कलिंगडाच्या विक्रीतून एक एकरात तब्बल 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.त्यांच्या या कलिंगडाच्या शेतीची आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांत जोरदार चर्चा सुरू असून शेतकरी कलिंगडाची शेती पाहण्यासाठी भेट देऊ लागले आहेत.

उपळाई ठोंगे येथील शेतकरी दीपक वैद्य व त्यांच्या कुटूंबाने साडेतीन एकरामध्ये मेलडी कलिंगडाची लागवड केली आहे.यावेळी बातचीत करताना त्यांनी सांगितले की,कलिंगड लावत असताना ट्रॅक्टरने आडवे-उभे फणून घेतले.त्याचे बोद तयार केले.त्यात पुन्हा 4 ते 5 ट्रॅक्टर शेणखत टाकून शेत रोटरने रोटरले.त्यानंतर शेतीला 10 ते 15 हजार रुपयांचा भेसळ डोस दिला.यामध्ये 18:46,10:26,15:15,मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचा समावेश आहे.ज्या प्रमाणे आपण चारी भरतो त्याप्रमाणे भेसळ डोस भरला गेला.गादी वाफा तयार करून त्यावर मल्चिंग पेपर अंथरण्यात आला.या पेपरला झिगझ्याग पद्धतीने सव्वा फुटावर होल करण्यात आली.लागवडीसाठी एक एकरात 5 हजार रोपे लागली.रोपांच्या लागवडीनंतर विविध शेतकऱ्यांशी चर्चा करून हवामानानुसार औषध फवारणी व खते दिली.याला पाण्याचे नियोजन ड्रीपने करण्यात आले.

खराब हवामानावेळी दिवसातून दोनदा फवारणी

अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे कलिंगडाच्या शेतीवर परिणाम जाणवत होता.त्यावेळी शेतकरी मित्रांचा सल्ला घेतला.त्यानुसार या कलिंगडावर दिवसातून दोनदा फवारणी केली जात होती.रोपांची योग्य निगा राखली गेल्याने.चांगले आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत झाली.असे दीपक वैद्य यांना वाटते.




57 दिवसात मिळाले 7 लाख रुपयांचे उत्पन्न

57 दिवसात कलिंगडाचा एक नग कमीत-कमी वजनाला 5 ते 6 किलो भरला.यावेळी कुर्डुवाडीचे व्यापारी एस.के.कदम यांनी कलिंगडाचा माल 32 रुपये किलो प्रमाणे खरेदी केला.कलिंगडाचा 22 टन माल मार्केटला गेला असून सर्व कलिंगडाचा आकार एकसमान होता.सरासरी 4 किलो वजनाप्रमाणे कलिंगडाचा एक नग होता.60 व्या दिवशी दुसरा तोडा करून थोडाफार माल मार्केटला विकला गेला.असे शेतकरी दीपक वैद्य यांनी सांगितले.





गेल्या वर्षी दोन लाख रुपयाला तोटा

गेल्या वर्षी अचानक लॉकडाऊन करण्यात आल्याने तोडणीला आलेल्या कलिंगडावर रोटर फिरवावा लागला.कलिंगड गावोगावी विकायला गेल्यास कोरोनाच्या भीतीने लोक विकत घेत नव्हते.त्यामुळे तब्बल दोन लाख रुपयांचा तोटा झाला.यावर्षी तो भरून निघाला आहे.शेतकऱ्यांवर कितीही संकटे आली तरी शेतकऱ्यांनी हार मानली नाही पाहिजे.जिद्दीने चालले पाहिजे.आज ना उद्या ही काळी माता आपल्याला धन दिल्याशिवाय राहणार नाही.एकवेळस उत्पन्न गेले,तर दुसऱ्या वेळेस पदरात काही तरी दिल्याशिवाय राहणार नाही.काळ्या आईची आपण लेकरे आहोत.त्याप्रमाणे ती आपल्याला धन देणार आहे.असे शेतकरी दीपक वैद्य वाटते.

शेतकऱ्यांनी हार मानायची नाही

गेल्या वर्षी 2 लाख रुपयाला तोट्यात गेलो.यावेळेस हार मानायची नाही म्हणून यावर्षी एक एकरात पहिल्यांदा कलिंगडाची लागवड केली.त्यानंतर पुन्हा 15 दिवसांनी अडीज एकरात कलिंगडाची लागवड केली.कलिंगडाचा पहिला तोडा 57 व्या दिवशी 22 टन विकला गेला तर दुसरा तोडा 60 व्या दिवशी तोडला गेला.असे मिळून माझे 7 लाख रुपयांच्या पुढे उत्पन्न गेले आहे असे शेतकरी वैद्य यांनी सांगितले.

लॉकडाऊन लागू होण्याच्या भीतीने कलिंगडाचा विकला माल

लॉकडाऊनमुळे शेती पूर्णपणे तोट्यात गेली होती.कलिंगडाचा माल पहिल्यादा 39 रुपये किलोने मागितला होता.पण लॉकडाऊनच्या बातम्या आल्याने भाव कमी-जास्त होऊ लागले.त्यामुळे आम्ही भीतीपोटी 32 रुपये किलोने माल विकला व त्याचा आम्हाला फायदा झाला.असे दीपक वैद्य यांचे म्हणणे आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून वैद्य कुटूंब करतात वेगवेगळे व्यवसाय

दीपक वैद्य यांचे वडील जमीन-जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात.या व्यवसायावर लॉकडाऊनचा परिणाम झाला असून शेतीला जोडधंदा म्हणून मळणी-मशीन घेतले आहे.गावातील शेतकऱ्यांची शेती भाड्याने कसता यावी यासाठी ट्रॅक्टरचा व्यवसाय सुरू केला आहे.ऊसतोडण्यासाठी ऊसतोड मजुरांच्या टोळीची निर्मिती केली असून हे सर्व व्याप सांभाळत वैद्य कुटुंब स्वतःची शेती कसत आहे.

अडीज एकरात 16 ते 17 लाख रुपयांचे उत्पन्न निघण्याचा अंदाज

कलिंगडाचे अडीज एकर क्षेत्र मार्केटला जाण्यासाठी आणखीन बाकी आहे.भाव असाच राहिला तर अंदाजे 16 ते 17 लाख रुपयांचे उत्पन्न निघणे अपेक्षित आहे.लॉकडाऊनमुळे भाव कमी-जास्त होऊ लागले आहेत.येणाऱ्या काळात मार्केटचा भाव कसा मिळतो यावर सर्व अवलंबून आहे.कमीत-कमी 10 ते 15 रुपये किलो दराने कलिंगड विकले गेले तरीही आर्थिक फायदा होईल असे दीपक वैद्य यांना वाटते.

कोबी,कांदा,केळी याची शेतात लागवड

कलिंगडाबरोबरच वैद्य कुटुंबाने शेतात कोबी,कांदा,केळी याची लागवड केली आहे.सध्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे कांदा काढत आहोत.त्यात लॉकडाऊनचे काही सांगता येत नाही.त्यामुळे लवकर कांदा विकणे जरुरीचे झाले आहे.कोबीला चांगला भाव आला असून ही पिके आर्थिक लाभ मिळवून देतील असे शेतकरी आशाबाई वैद्य यांना वाटते.





लेकरांनी काबाडकष्ट करून पिकवली शेती

यावेळी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना दीपक वैद्य यांच्या आई आशाबाई वैद्य म्हणाल्या की,शेतीला पाणी देण्यासाठी रात्री-बेरात्री उठतो.कधी मी मोटार चालू करायचे तर कधी मुले.शेतीला पाणी देत असताना कुठे पाईप निसटला तर लक्ष द्यावे लागते.माझी मुले लोकांच्या शेतात सालगडी म्हणून काम करत होती.आता स्वतःची शेती चांगल्या प्रकारे करू लागली आहेत.यावर्षी पाऊस झाला म्हणून चांगले झाले आहे.गेल्या दोन वर्षांपासून कलिंगडाची लागवड करीत आहोत,पण लॉकडाऊनमुळे काहीच फायदा झाला नाही.लागवडीचा खर्च देखील निघाला नाही.त्यावेळी मुलांनी कलिंगडाचा माल जागेवरच रोटरून टाकला.आता कलिंगडाला भाव मिळाल्याने समाधान वाटत आहे.

Updated : 10 Jan 2022 3:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top