News Update
Home > मॅक्स किसान > वीस गुंठा मिर्चीच्या उत्पन्नातून शेतकऱ्याने कमावले पाच लाख रुपये

वीस गुंठा मिर्चीच्या उत्पन्नातून शेतकऱ्याने कमावले पाच लाख रुपये

वीस गुंठा मिर्चीच्या उत्पन्नातून शेतकऱ्याने कमावले पाच लाख रुपये
X

शेतीमधील भरमसाठ संकटांमुळे शेती शाश्वत राहिले नाही परंतु नाविन्यपूर्ण प्रयोग फायदेशीर ठरत आहेत.पंढरपूर तालुक्यातील उपरी गावच्या आण्णा लोखंडे शेतकऱ्याने अशाच नाविन्यपूर्ण प्रयत्नातून आपल्या वीस गुंठा शेती क्षेत्रात मिर्चीची लागवड केली आहे. या मिर्चीच्या उत्पादनातून त्यांना तब्बल पाच लाख रुपयांचा फायदा झाला, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट

शेती क्षेत्रावर सातत्याने वातावरण बदलाचा परिणाम होत असून हवामान विभागाने मान्सून च्या आगमनाचे भाकीत करूनही त्यांचे अंदाज फोल ठरले आहेत. हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रात वेळेत दाखल होईल यायाचे भाकीत केले होते परंतु मान्सून रेंगाळल्याने सद्या शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांना निसर्ग कधी हसवेल तर कधी रडवेल हे सांगता येत नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे सातत्याने शेती क्षेत्र अडचणीत येत असून एकामागून एक अशी नैसर्गिक संकटे शेती क्षेत्रावर सातत्याने आदळत आहेत. परंतु अशाही परिस्थितीत असंख्य अडचणींना तोंड देत शेतकरी शेती क्षेत्रात विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण प्रयोग करताना दिसत आहेत. त्यातून आपली आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न शेतकरी करत असून सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने उसाची शेती केली जात आहे. या उसाच्या शेतीला शेतकरी वर्ग कंटाळला आहे. त्यामुळेच शेतकरी वर्ग इतर शेती पिकांकडे वळला आहे. असाच प्रयोग पंढरपूर तालुक्यातील उपरी गावच्या आण्णा लोखंडे या शेतकऱ्याने केला असून त्याने आपल्या वीस गुंठा शेती क्षेत्रात मिर्चीची लागवड केली आहे. या मिर्चीच्या उत्पादनातून त्यांना तब्बल पाच लाख रुपयांचा फायदा झाला असून त्यांच्या या अनोख्या मिर्ची उत्पादनाची सर्वत्र चर्चा होत आहे.

भाजीपाला विकणारा झाला मालामाल

शेतकरी आणा लोखंडे यांना दोन एकर शेती आहे. त्यात त्यांनी 20 गुंठा मिर्चीची लागण केली आहे,तर बाकीच्या उरलेल्या शेतात त्यांनी ऊस लावला आहे. या व्यतिरिक्त शेतकरी आणा लोखंडे गेल्या अनेक वर्षांपासून उपरी गावच्या स्टँडवर भाजीपाला विकत आहेत. दररोजचा घर खर्च भागावा म्हणून ते गेल्या अनेक वर्षापासून आपल्या शेतात तरकारी पिकांची लागवड करत असून त्यातून मिळणाऱ्या पैशावर घर खर्च भागवत आहेत. नेहमीप्रमाणे त्यांनी याही वर्षी तरकारी पीक म्हणून शेतात मिर्चीची लागवड केली. सुरुवातीच्या काळात या मिर्चीला भाव मिळत नव्हता,पण दोन महिन्याच्या कालावधीनंतर मिरची भावाने मार्केटमध्ये उसळी घेतली आणि याच काळात शेतकरी आणा लोखंडे यांच्या मिर्चीला 120 ते 160 रुपये भाव मिळाला. या काळात एक भाजी विकणारा विक्रेता असलेला आणा लोखंडे लखपती झाला असून त्यांच्या या मिर्ची शेतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिर्ची उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या युरोप देशात आणा लोखंडे यांनी केला अभ्यास दौरा

मिर्ची उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या युरोप देशात शेतकरी आणा लोखंडे यांनी अभ्यास दौरा केला असून हा दौरा मिर्ची बियाणे उत्पादक कंपनीने आयोजित केला होता. त्यांनी युरोप मधील मिर्ची उत्पादनाचा अभ्यास केला असून त्याचा फायदा त्यांना त्यांच्या शेतात मिर्ची लागवड करताना झाला असल्याचे ते सांगतात. त्यामुळेच चांगल्या प्रकारचे मिर्ची उत्पादन घेता आले असून मिर्चीचा तोडा पंधरा दिवसातून एकदा केला जात आहे. तोड्यातून सुमारे एक क्विंटल मिर्ची निघत असून आतापर्यंत जवळजवळ चार क्विटल मिर्ची विकली आहे. या मिर्ची उत्पादनातून पाच ते साडेपाच लाख रुपयाचे उत्पादन मिळाले असल्याचे शेतकरी आणा लोखंडे सांगतात.

मिर्ची उत्पादनातून कमावले पाच लाख रुपये

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना शेतकरी आणा लोखंडे यांनी सांगितले,की 10 जून 2021 रोजी शिवग्रामीण या जातीच्या मिर्चीची लागवड करण्यात आली होती. मिर्चीची लागवड करत असताना सुरुवातीला 5 बाय 6 वर बेड सोडले. त्या बेडवर शेणखत,10:26,18:46 आणि युरिया अशी खते टाकून बेड बुजवून घेतले. त्यानंतर चार दिवस बेडला पाणी देण्यात आले. या भिजलेल्या बेडवर दोन बाय अडिज वर शिवग्रामीण मिर्चीची लागवड करण्यात आली. या मिर्चीवर जास्त प्रमाणात रोग पडत नसल्याने शेतकऱ्यांना ही मिर्ची लागवडीस योग्य आहे. या मिरचीचे उत्पन्न ही चांगले निघत असून त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत. या मिरचीवर रोगांचा प्रादर्भाव होऊ नये,यासाठी कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या जात असून सामान्यतः इतर मिर्ची पिकांना चार दिवसाला कीटकनाशकांची फवारणी करावी लागते,पण शिवग्रामीण मिरचीला दहा ते पंधरा दिवसाला कीटकनाशकांची फवारणी करावी लागते.

या मिरचीच्या लागवडीनंतर 90 दिवसात मार्केटला विकण्यासाठी येते. मिर्ची तोडण्याच्या सुरुवातीला वीस गुंठे शेती क्षेत्रात पहिला तोडा शंभर किलोच्या आसपास निघाला होता. परंतु हळूहळू हा तोडा वाढत जावून पंधरा दिवसाला दुसरा तोडा केला,त्यावेळी दोनशे ते अडीचशे किलो मिर्ची निघाली. आता पंधरा दिवसाला एक टनाच्या आसपास मिर्ची निघत आहे. या मीरचीवर अवकाळी पावसाचा परिणाम होत नाही,परंतु वाऱ्यामुळे मिरचीला नुकसान होऊ शकते. त्यासाठी मिर्ची दोरीने बांधून घेतली पाहिजे. या मिर्ची लागवडीसाठी एकूण एक लाख रुपयांपर्यंत खर्च आला होता व मिरचीच्या उत्पादनातून जवळजवळ पाच ते साडेपाच लाख रुपयांचे उत्पन्न निघाले असून एक लाख रुपये खर्च सोडला तर चार ते पाच लाख रुपयांच्या आसपास फायदा झाला आहे. असे शेतकरी आणा लोखंडे यांनी बोलताना सांगितले.

ऊस क्षेत्रात घेतले मिरचीचे भरघोस उत्पन्न

शेतकरी आण्णा लोखंडे यांचे उपरी गाव पंढरपूर तालुक्यात असून या तालुक्यात उसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे या भागात इतर पिकांची लागवड कमी प्रमाणात दिसते. पण अलीकडच्या काळात ऊस कारखान्याला जाण्यास होणाऱ्या विलंबामुळे शेतकरी इतर पिकांकडे वळू लागला असल्याचे दिसते. ऊस कारखान्याला जाईपर्यंत शेतकऱ्यांचा जिवात जीव नसतो. दोन वर्षाच्या कालावधीनंतर ही शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याने नेहला नसल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न या वर्षी या तालुक्यात निर्माण झाला होता. ऊस कारखान्याला जावून ही त्याचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला असल्याचे दिसते. ऊस तोडून नेहत असताना ऊस टोळ्या आणि ट्रॅक्टर ड्रायव्हर पैसे घेतात. या सर्व कटकटीतून मुक्तता व्हावी या हेतूने शेतकरी आपल्या शेतात विविध पिकांचे प्रयोग करू लागले आहेत. त्यांचे हे प्रयोग यशस्वी होताना दिसत आहेत. शेतकरी आणा लोखंडे यांनी केलेल्या मिर्ची प्रयोगाच्या शेतीची सद्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Updated : 2022-06-12T19:37:14+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top