Home > मॅक्स किसान > नोकरी सोडत तरुण शेतकऱ्याने पिकवली सफरचंदाची शेती

नोकरी सोडत तरुण शेतकऱ्याने पिकवली सफरचंदाची शेती

सोशल मिडीया सर्वत्र अतिरेक होत असताना नोकरी असलेल्या तरुणाने नोकरीला रामराम ठोकत सोशल मिडीयावरुन सफचंदाच्या शेतीचं ज्ञान घेऊन यशस्वी सफरचंद उत्पादक शेतकरी असा प्रवास केला आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...

नोकरी सोडत तरुण शेतकऱ्याने पिकवली सफरचंदाची शेती
X

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुका ऊस बागायतदारांचा तालुका म्हणून ओळखला जातो. ऊस कारखान्याला जाण्यास सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागत असल्याने तालुक्यातील शेतकरी इतर पिकांच्या उत्पादनाकडे वळू लागला आहे. ऊस कारखान्याला जाऊनही ऊसाच्या बिलाची रक्कम वेळेवर मिळत नाही. त्यामुळे या तालुक्यातील शेतकरी ऊसाच्या पिकाला कंटाळला असल्याचे दिसते. या तालुक्यातील एक साखर कारखाना बंद असल्याने काही दिवसांपूर्वी या तालुक्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न ऐरणीवर होता. या तालुक्यातून भीमा नदी वाहते.

उजनी धरणातून या नदीला बारमाही पाणी सोडले जाते. त्यामुळेच या नदीकाठचा बराचसा भाग ओलिताखाली आला आहे. याच नदीच्या खोऱ्यात देगाव ता. पंढरपूर येथील शेतकरी धनंजय शेळके या तरुण शेतकऱ्यांने सहकारी बँकेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडत सफरचंदाची बाग शेतात फुलवण्याची किमया साधली आहे. त्यांच्या या बागेतील झाडांना सफरचंदाची चांगल्या प्रकारची फळधारणा झाली आहे. त्यांनी आपल्या शेतात सफरचंदाच्या चार वेगवेगळ्या व्हरायटीच्या झाडांची लागवड केली असून त्याची बाग सध्या दीड वर्षांची असून सुस्थितीत आहे. या सफरचंदाच्या शेतीतून सफरचंद पिकवून त्यांना भविष्यात स्वतःच्या सफरचंदाचा ब्रँड तयार करायचा आहे. असा मनोदय त्यांनी बोलताना व्यक्त केला. त्यांनी या सफारचंदाच्या बागेत आंतरपिके घेतली असून त्याचाही फायदा सफरचंदाच्या झाडांच्या वाढीसाठी झाल्याचे शेळके सांगतात. त्यांच्या या सफरचंदाच्या शेतीची पंढरपूर तालुक्यात सध्या जोरदार चर्चा असून आजूबाजूचे शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देऊन त्यांचे मार्गदर्शन घेऊ लागले आहेत.





सोशल मीडियाच्या माध्यमातून सफरचंदाच्या शेतीची मिळाली माहिती

शेतकरी धनंजय शेळके यांचे शिक्षण एम.ए. पर्यंत झाले असून त्यांनी पुण्यातून हार्डवेअर अँड नेटवर्किंगचा कोर्स पूर्ण केला आहे. पंढरपूरातील एका सहकारी बँकेत 5 ते 6 वर्षे नोकरी करून काही कारणास्तव त्यांनी नोकरी सोडली व शेती करण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडत असताना त्यांनी ठरवले होते,की आपल्या शेतामध्ये काहीतरी नवीन प्रयोग करायचा. जेणेकरून या नवीन शेती प्रयोगाचा शेतकऱ्यांना फायदा होईल. या शेतीतून शेतकऱ्यांना थोडेफार पैसे मिळतील. यासाठी फेसबुक आणि गूगलवर त्यांनी शोध सुरू केला. शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पन्न कसे वाढेल याचा शोध सुरू असताना फेसबुकवर सफरचंदाच्या शेतीची माहिती मिळाली. त्यामध्ये उष्णकटिबंधीय वातावरणात येणाऱ्या सफरचंदाची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे सफरचंदाच्या इतर वाणाची माहिती गुगलवरून घेण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या शेतातील मातीत कोणत्या सफरचंदाची झाडे चांगल्या प्रकारे येऊ शकतात याचा शोध त्यांनी घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्यांना सफरचंदाच्या विविध जातीची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी शेतात सफरचंदाच्या चार व्हरायटीच्या रोपांची लागवड करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी तशी रोपी मागवली.

चार प्रकारच्या सफरचंदाच्या झाडांची लागवड

शेतकरी धनंजय शेळके गुगलवर सर्च करत असताना त्यांना सफरचंदाच्या 11 व्हरायटी मिळून आल्या. त्यामध्ये उष्णकटिबंधीय वातावरणात येणाऱ्या एनएचआरएम-99 या सफरचंदाच्या व्हरायटीचा समावेश होता. शेतकरी धनंजय शेळके यांनी आपल्या शेतामध्ये एनएचआरएनएम-99 या सफरचंदाच्या व्हरायटी बरोबरच त्यांच्या बागेमध्ये आण्णा व्हरायटी, डोरासेट गोल्डन व्हरायटी,ट्रॉपिकल स्वीट या सफरचंदाच्या झाडांची लागवड करून त्यांची चांगल्या प्रकारची जोपासना केली आहे. सध्या त्यांची बाग दीड वर्षाची आहे. या चार प्रकारच्या व्हरायटीची झाडे चांगली आली असून त्यांना उत्तम फळधारणा ही झाली आहे. या सफरचंदाच्या झाडांवर वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळ्या प्रकारचे रोग पडतात. त्यामुळे यावर फवारणीचे स्प्रे घ्यावे लागतात.

शेतकरी धनंजय शेळके यांनी शेतात 10 टक्के केमिकल्स औषधांचा वापर केला आहे तर 90 टक्के सेंद्रिय आणि जैविक औषधांचा उपयोग केला आहे. सुरुवातीच्या काळात पाने कोवळी असताना या झाडांवर अळी वगैरे येते. त्यानंतर झाडे जसजशी मोठी होऊ लागतात तसतसे त्यांच्यावर मार्श मेनू,कॉलर रॉट, अँपल स्कॅबो,कँन्कर या सारखे रोग पडू लागतात. या रोगाचे व्यवस्थापन करण्याचे योग्य शेड्युल ठेवले तर रोग कव्हर होतात. या बागेची छाटणी वेळच्यावेळी करणे आवश्यक आहे. झाडे लहान असतानाच झाडांचे वेडेवाकडे येणारे आकार टाळता येतात. या झाडांना लहानपणीच योग्य शेफ देता येतो. मोठयापणी झाडांना काहीही करता येत नाही. असे शेतकरी धनंजय शेळके यांनी सांगितले.




सफरचंदाच्या बागेत घेतली विविध प्रकारची आंतरपिके

शेतकरी धनंजय शेळके यांनी या बागेत कलिंगड,कोबी,लसूण,मुळ्याची शेंग,कोथिंबीर या पिकांचे उत्पादन घेतले आहे. या आंतरपिकांचे फायदे सांगताना त्यांनी सांगितले,की उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. झाडे मोठी झाली असून त्यांची पाण्याची भूक वाढली आहे. त्यांच्या मुळ्या झाडांच्या आजूबाजूला पसरल्या आहेत. त्यामुळे त्यांना जास्त पाण्याची आवश्यकता असून त्यांना दंडाने पाणी द्यावे लागते. जर बागेला ड्रीप असेल तर शेतकरी आवर्जून शेतीला पाणी देणार नाही. त्यामुळे या आंतरपिकांच्या नादाने तो शेतीला दंडाने पाणी देईल. त्यामुळेच या पिकांचे बागेत नियोजन केले असून सध्या या पिकांना दंडाने पाणी देत आहे. त्यामूळेच सफरचंदाच्या झाडांची पाण्याची भूक भागू लागली आहे. या आंतरपिकांमुळे बागेचे तापमान मेंटेन राहण्यास मदत झाली असून मल्चिंग होण्यास पण मदत झाली आहे. तसेच कलिंगडाचे उत्पादन निघण्यास मदत झाली आहे. प्रत्येक सफरचंदाच्या झाडासोबत तुळशीचे झाड पण लावले आहे. याचाही उपयोग सफरचंदाच्या शेतीला झाला असल्याचे शेतकरी धनंजय शेळके यांनी सांगितले.

वादळी वाऱ्यातही टिकून राहू शकते बाग

शेतकरी धनंजय शेळके यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले,की चांगली इमारत बनवायची असेल तर त्याचे फाउंडेशन मजबूत असले पाहिजे. मग त्यावर तुम्ही कितीही मजले चढवू शकता. त्यामुळे झाडांची वाढ बघून त्यांचे जे मार्ग आहेत. ते झाडाच्या चारही बाजूने डेव्हलप झाले पाहिजेत. त्यामुळे येणाऱ्या पाऊस आणि वादळ वाऱ्यात बाग उपसून निघणार नाही. झाडाच्या मुळ्या चारही बाजूने पसरल्या तर झाड मजबूत होते. त्याचा फायदा झाडांना असून झाडे जास्त अन्न शोषण करतात. त्यांची स्टोरेज क्षमता वाढली आहे. सध्या या बागेतील फळांचे वजन 133 ग्रॅमच्या आसपास पोहचले आहे. या बागेवर पुढील काळात आणखीन ही रोग येऊ शकतात. त्यामुळे बाग व्यवस्थित सांभाळणे आवश्यक आहे. माझी बाग 15 महिन्याची असून भविष्यात चांगली उत्पन्न देणारी शेती म्हणून या सफरचंदाच्या शेतीकडे पहायला काही हरकत नाही असे वाटते.





सफरचंदाचा स्वतःचा ब्रँड तयार करणार

सफरचंदाच्या फळांच्या उत्पादनातून सफरचंदाचा स्वतःचा ब्रँड निर्माण करणार आहे. याची विक्री व्यापाऱ्यांना करणार नाही. स्वतःच बाजाराचे हे सफरचंद विकणार आहे. सध्या फळांसाठी बाग धरली नाही. पण येणाऱ्या काळात उत्पादन घेणार आहे. सफरचंदाचे फळ जिल्ह्यात उत्पादित झाले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांबरोबरच ग्राहकांनाही होणार आहे. असे शेतकरी धनंजय शेळके यांना वाटते.

Updated : 21 April 2022 3:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top