Home > मॅक्स किसान > जगात डेटाला सोन्यापेक्षा जास्त महत्त्व

जगात डेटाला सोन्यापेक्षा जास्त महत्त्व

जगात डेटाला सोन्यापेक्षा जास्त महत्त्व
X

महिनाभरापूर्वी निसर्गाने बाग पिकू दिली नाही. आता जास्त पिकून आल्या. पुरवठा वाढला. रेट नाहीत. कोरोनामुळे मंदी. शहरात पाहिजे तसा अजून उठाव नाही. पेपरवाले उलटसूलट छापतात. ग्राहकी नाही.

पाऊसमान नि सरकारची लहर कोणीच नियंत्रित करू शकत नाही. तसेच बाजारभावाचेही आहे. जे जे एक्स्पोर्ट होते, त्याचे भाव बाहेर ठरतात.

युरोपची पडतळ येईल तसा भाव ठरतो. बाजारभाव पडतळ तुम्ही आम्ही चेक करू शकतो. बाजारभाव रोज खालीवर होतो. शेतमालाचा बाजारभाव सेंसेक्सपेक्षा जास्त सेन्सेटिव. इतिहास साक्षी आहे. आपण एकमेकांचे शत्रू नाहीत. दुसऱ्याला शिवी दिली तरी ती आपल्यालाच लागेल. कारण सगळ्यांची माय एकच असते. शिवीबद्दल तक्रार नाही, राग नाही. संवाद नसला तर गैरसमज होवू शकतो. पण मार्ग काढावाच लागेल.

उपाय आहेत, मार्ग आहेत. राज्यात - जिल्ह्यात बागेखालचं नेमकं क्षेत्र किती. देशाची, जगाची गरज किती याचा अंदाज देणारी संस्था बांधावी लागतील. क्षेत्र जास्त झाले असेल तर तसे सांगावे लागेल. नेमकं सांगितले तर लोक नक्की ऐकतात. आठ एकराचे नियोजन चार एकरात आणतात. कोणी ऐकले नाही तर त्याची मर्जी. पण दर हंगामाला संदेश - डाटा पोचलाच पाहिजे. लागवडी, हवामान, मागणी-पुरवठा, बाजारभाव असा डाटा उभा करावा लागेल.

समोर डिमांड नेमकी, निश्चित आहे. वाढली तर थोडीफारच, पण संकट आली तर गायबच होते. इकडे पुरवठा मात्र अफाट, अनियंत्रित. अशाने सारेच अडचणीत येतोय. म्हणून पुरवठा नियंत्रित झाला पाहिजे. त्यासाठी आकडेवारी, डाटा पुरवणारी संस्था पाहिजे. हे सरकार नाही, तर आपल्यालाच उभे करावे लागणार आहे.

जगात डाटाला सोन्यापेक्षा जास्त महत्त्व आलंय. धन्नासेठ तर म्हणतो की डाटा हे नवं पेट्रोल आहे. धन्नासेठच्या भाऊबंधकीतही होतात भांडणे. पण ते एकमेकांना संपवण्याची भाषा नाही करत. ते एकत्र येतात. समस्या समजून घेतात. उपाय शोधतात. एक एक पाऊल टाकत, हजार पावले पुढे निघून जातात. धन्नासेठ कुणी व्यक्ती नाहीये, एक प्रवृत्ती आहे. सतत बेरीज करणारी. एकाला एक जोडून अकरा म्हणणारी. तुमच्यात तर एक दाण्याचे हजार दाणे करण्याची क्षमता आहे.


Updated : 3 March 2021 3:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top