Home > मॅक्स किसान > कोबीनं शेतकऱ्याला दिला डबल‌‌ फायदा

कोबीनं शेतकऱ्याला दिला डबल‌‌ फायदा

सदैव नैसर्गिक संकटाशी सामना करणारे शेती कधी फायदा देईल हे सांगता येतं नाही खत तयार करण्याच्या उद्देशाने आंतरपीक म्हणून लावलेल्या कोबीने शेतकऱ्याला लाखो रुपये मिळवून दिले, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट...

कोबीनं शेतकऱ्याला दिला डबल‌‌ फायदा
X

शेती मालाला हमी भाव नसल्याने कधी कोणत्या मालाला भाव मिळेल तर कधी कोणते शेती पीक कवडी मोल भावाने विकले जाईल सांगता येत नाही.गेल्या दोन वर्षात लॉकडाऊनमुळे शेतकरी कोलमडून पडला आहे.शेती मालाला हमीभाव देण्यात यावा अशी मागणी शेतकरी सातत्याने करत आहेत.त्याबाबतचा कायदा काही होईना गेला आहे.त्यामुळे कोणते पीक कधी लाखो रुपये देऊन जाईल हे सांगता येत नाही.सध्या कोबी या भाजीचा बाजारात तुडवडा आहे.त्यामुळे 30 ते 40 रुपये किलो प्रमाणे शेतकऱ्यांकडून व्यापारी कोबी विकत घेऊ लागले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा नफा होऊ लागला आहे.





सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोडनिंब येथिल शेतकरी कैलास तोडकरी यांनी उसात कोबीचे आंतरपीक खत तयार करण्यासाठी लावले होते.परंतु अचानक कोबीचा भाव वाढल्याने व्यापाऱ्यातून कोबीची मागणी वाढली.तोडकरी यांच्या शेतात व्यापारी येऊन स्वतः कोबीची तोडणी,वजन करून 30 रुपये किलो प्रमाणे पैसे देऊन माल खरेदी करत आहेत.उसाला खत तयार करण्याच्या उद्देशाने लावलेल्या कोबी पिकाने त्यांना लाखो रुपये कमवून दिले आहेत.सध्या या शेतकऱ्याने दीड लाख रुपयांची कोबी विकली आहे.एकूण 17 टनाच्या आसपास कोबीचा माल निघणार असून त्यातून सुमारे 4 लाख रुपयांचा कोबीतून नफा होणार आहे.उसाचे पीक वर्षभर सांभाळून सुद्धा एवढे पैसे मिळत नाहीत.सहज म्हणून खत करण्यासाठी लावलेल्या कोबीने अवघ्या तीन महिन्यात उसापेक्षा जास्त पैसे मिळवून दिल्याने मोडनिंब परिसरात या कोबी पिकाची जोरदार चर्चा सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

पारंपरिक पिकाला छेद देत उसात कोबीची केली लागवड

कैलास तोडकरी यांनी शेतात आंतरपीक म्हणून सेंट जातीच्या कोबीची लागवड केली आहे.ऊसाची बांधणी होईपर्यंत सुरवातीच्या काळात यामध्ये आंतरपीक घेतले जाते.पारंपारिक पद्धतीने उसात आंतरपीक म्हणून गहू,मका,कांदा याचे उत्पादन घेतले जाते.या पिकांचा ऊसाच्या शेतीला फायदा होतो असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.परंतु या सर्व गोष्टींना फाटा देत कैलास तोडकरी यांनी ऊसाची चांगली वाढ व्हावी यासाठी 30 गुंठ्यात कोबीची लागवड केली आहे.कोबीच्या पालापाचोळ्याचा चांगल्या प्रकारे खत तयार होतो असे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तोडकरी यांना सांगितले.त्याप्रमाणे कृषी अधिकारी व शेतकऱ्याच्या सल्ल्याने कोबीवर योग्य त्या फवारण्या केल्या.या कोबीला ड्रीपने पाणी देण्याची सुविधा केली आहे.कोबीवर कीड पडून कोबी कुजला जाण्याची शक्यता असल्याने त्याच्यावर दर 10 ते 15 दिवसाला फवारण्या केल्या जात आहेत.त्यामुळे कोबीवर रोगराई कमी झाली आहे.या शेतकऱ्याने 65 दिवसाच्या कालावधीत कीटकनाशकाच्या 6 फवारण्या केल्या आहेत.उसाच्या निम्या भागात आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली आहे.





तोडणी व मार्केटला कोबी नेण्याचा वाहतूक खर्च वाचल्याने आर्थिक फायदा झाला

या शेतकऱ्याने कांदा व कोबीची उसात लागवड केली आहे. सध्या कांद्याचा भाव अडीज हजारच्या आसपास आहे.पण या शेतकऱ्याचा कांदा मार्केटला जाण्यास काही दिवसाचा अवधी आहे.कोबीला सध्या चांगला भाव असल्याने व्यापारी तोडकरी यांच्या शेतात येऊन कोबीची तोडणी,वजन करून शेतकऱ्याला पैसे देतात.त्यामुळे या शेतकऱ्याचे तोडणी व कोबी मार्केटला घेऊन जाण्याचे पैसे बचत झाले आहेत.यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडण्यास मदत झाली आहे. आतापर्यंत या शेतकऱ्याने 5 टनाच्या आसपास कोबी विकला आहे.चार ते आठ दिवसाच्या कालावधीत आतापर्यंत शेतातील 40 टक्के कोबी विकला आहे.त्यामुळे या शेतकऱ्याला दीड लाख रुपये मिळाले आहेत. आणखीन 60 टक्के माल शेतात असल्याने 4 लाखाच्या जवळ आर्थिक नफा होईल असे शेतकरी कैलास तोडकरी यांना वाटते.

शेतकऱ्यांनी सर्रासपणे एकाच पिकाची लागवड करू नये

आपल्याकडे एका शेतकऱ्याने एखादे पीक लावले तर सरासपणे सर्व शेतकरी तेच पीक लावतात.त्यामुळे मार्केटला जास्त आवक वाढल्याने भाव पडतात.टोमॅटोचे असेच झाले असल्याचे पहायला मिळाले होते.भाव अचानक वाढल्याने भाज्या परिपक्कव होऊ न देता त्या मार्केटमध्ये आणल्या जात आहेत. कोबीच्या बाबतीत ही सध्या तेच सुरू आहे.लहान कोवळ्या कोबीच्या गड्डी विकल्या जात आहेत.त्यामुळे त्यांना कमी प्रमाणात भाव मिळत आहे.शेतकऱ्यांनी शेतीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. कोणीतरी एखादे पीक घेत आहे,म्हणून ते पीक घेऊ नये.त्यासाठी कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शेती कधी ही तोट्यात जाणार नाही.असे तोडकरी यांनी सांगितले.





सोळा लाख रुपयांची विकली पपई

योग्य नियोजन करीत या शेतकऱ्याने एक एकरमध्ये 16 लाख रुपयांच्या पपईचे उत्पादन घेतले होते.शेतात तैवान जातीच्या पपईची लागवड केली होती.त्यावेळी एक दिवसाआड 3 ते 4 टन पपई मार्केटला जात होती.त्यावेळेस 28 रुपये किलोने भाव मिळत होता.वयाच्या 21 व्या वर्षापासून शेती करत असून मला शेती करण्याची आवड आहे. उत्पादनातून सारखे पैसे मिळत नाहीत.त्यासाठी शेतकऱ्यांनी चिकाटी धरली पाहिजे.शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. व्यापारी व शेतकरी वेगळा आहे. व्यापारी 5 ते 10 टक्के फायदा मिळाल्याशिवाय व्यापार करीत नाही.पण शेतकऱ्याला काबाडकष्ट करावे लागते.त्याच्या कष्टाचे मोजमाप होत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याला परवडेल तेच पीक शेतात घ्यावे.असे शेतकरी कैलास तोडकरी यांना वाटते.

शेतीला दंडाने पाणी देणे चुकीचे

शेतकरी कैलास तोडकरी यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले की,शेतकऱ्यांनी ड्रीपवर शेती करणे गरजेचे आहे.आपल्याला भूक आहे, तेवढेच आपण खातो.त्याप्रमाणे शेतीचे देखील आहे.पिकाला जेवढे पाणी पाहिजे तेवढेच दिले पाहिजे.पिकाला जास्त पाणी झाल्यास पीक चांगले येत नाही.ड्रीपने शेतीला पाणी दिल्यास पाण्याची बचत होते.पाणी देण्यासाठी कामगार लागत नाही.शेतीचे उत्पन्न वाढवण्यास ड्रीप महत्वाचे आहे.त्याचबरोबर शेतकऱ्यांनी शेतजमीन सुपीक व्हावी यासाठी शेणखताचा वापर करणे आवश्यक आहे.त्यासाठी शेतकऱ्यांनी देशी जनावरे पाळणे आवश्यक आहे.





उसात आंतरपीक म्हणून बीट लावणार

सध्या शेतात ऊसाची लागण करण्यात येणार आहे.त्या ऊसाच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून बीट लावणार आहे.कारण की ज्या भाज्यांचा मार्केटमध्ये तुटवडा असतो त्यांनाच भाव मिळतो.त्यामुळे येणाऱ्या काळात बीटाची लागवड शेतात करणार आहे.त्यातूनही आर्थिक फायदा होईल असे शेतकरी कैलास तोडकरी यांना वाटते.

Updated : 3 Jan 2022 7:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top