Home > मॅक्स किसान > भारतीय कांद्याला आशियाई ग्राहकांची पहिली पसंती!

भारतीय कांद्याला आशियाई ग्राहकांची पहिली पसंती!

भारतीय कांद्याला आशियाई ग्राहकांची पहिली पसंती!
X

भारताच्या आयात निर्यात धोरणासह नियंत्रणाचा कांद्याला फटका बसत असताना देशात सर्वात मोठा उत्पादक असलेल्या महाराष्ट्राच्या कांद्याला आशियन मार्केटमध्ये सर्वांत पहिली पसंती असते. त्यानंतर पाकिस्तान, तुर्कस्तान, इजिप्त असा क्रम असून सर्वांत शेवटी नेदरलॅंडच्या कांद्याचा नंबर येतं असं महत्वपूर्ण निरिक्षण नेदरलॅंडच्या ट्रेडिंग फर्मनं नोंदवलं आहे.

भारतात नापिकी झाल्याशिवाय नेदरलॅंडच्या लाल कांद्याला जागतिक मार्केटमध्ये उठाव मिळत नाही, असे 'अ‍ॅग्रो सेंटर हॉलंड'चे कार्ल व्हॅन डी विएल यांचे म्हणणे आहे. 'फ्रेशप्लाजा' या हॉर्टिकल्चरविषयक वेबसाईटला कार्ल यांनी सांगितले, "सलग दोन वर्ष आशिया मार्केटमध्ये नेदरलॅंडचा कांदा मोठ्याप्रमाणावर निर्यात झालाय. खासकरून, बांगलादेश आणि श्रीलंकेतील व्यवसाय वाढलाय."

"पण अडचण अशी की, आशियायी ग्राहकांच्या पसंतीत नेदरलॅंडच्या कांद्याच्या शेवटचा क्रमांक आहे. भारतीय कांद्याला सर्वांत पहिली पसंती असते. त्यानंतर पाकिस्तान, तुर्कस्तान, इजिप्त असा क्रम असून सर्वांत शेवटी नेदरलॅंडच्या कांद्याचा नंबर येतो," असे कार्ल सांगतात.

'अ‍ॅग्रो हॉलंड सेंटर'च्या वेबसाईटवरील माहितीनुसार ऑगस्टच्या मध्यापासून नेदरलॅंडचा लाल कांदा उपलब्ध व्हायला सुरवात होते. जून जुलैचा अपवाद वगळता वर्षभर अ‍ॅग्रो हॉलंड सेंटर स्थानिक लाल कांदा पुरवू शकतो. जून – जुलैत इजिप्शियन कांदा अ‍ॅग्रो हॉलंड पुरवू शकते.

विशेष असे की ऑगस्टच्या मध्यापासून नेदरलॅंडचा कांदा उपलब्ध होतो, ती वेळ भारतीय स्टॉकमधील उन्हाळ आणि नव्या लाल कांद्यासाठी अत्यंत निर्णायक असते. गेली दोन वर्ष नैसर्गिक प्रतिकुलतेमुळे 15 ऑगस्ट दरम्यानच बाजारात सुधारणा झाली. त्यामुळे निर्यात पडतळ उंचावली आणि नेदरलॅंडसारख्या स्पर्धक देशांना पुढे आशियायी कांदा मार्केटमध्ये प्रवेश मिळाला!

Updated : 9 March 2021 6:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top