Home > मॅक्स किसान > कापसाचे भाव वाढताच 'सेबी'ने कमोडिटी मार्केटमधील कापूस व्यवहारांना दिली स्थगिती

कापसाचे भाव वाढताच 'सेबी'ने कमोडिटी मार्केटमधील कापूस व्यवहारांना दिली स्थगिती

कापसाचे भाव वाढताच सेबीने कमोडिटी मार्केटमधील कापूस व्यवहारांना  दिली स्थगिती
X

महाराष्ट्रासह हरियाणा, पंजाब, गुजरात कर्नाटक राज्यातून नवीन कापसाची आवक सुरू झाली असून 11 हजारांवर प्रति क्विंटल वरच सरासरी भाव शेतकऱ्याला मिळत असतांनाच शेअर बाजारातील नियामक संस्था असलेल्या 'सेबी'ने कमोडिटी म्हणजे एमसीएक्स वायदे बाजारातील कापूस व्यवहारांना तडकाफडकी महिनाभराची स्थगिती दिली आहे. वस्त्रोद्योग कंपन्या, व्यापारी आणि सटोडियांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याची टीका करत शेतकरी संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यंदा कापसाला उच्चांकी दर राहणार असल्याचा अंदाज तंज्ञाकडून व्यक्त केला जातोय. यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची घाई करू नका तसेच एकाच टप्प्यात सर्व कापूस विकू नका असा संदेशही दिला जात आहे.


खऱ्या अर्थाने कापसाची आवक पुढील महिन्यात प्रचंड प्रमाणात वाढणार आहे सद्या अल्प प्रमाणात कापूस येत आहे मात्र कमोडिटी मार्केट मध्ये ऑनलाईन पद्धतीने खरेदी विक्री व्यापारी तसेच सट्टा बाजार खेळला जात आहे. कापसाच्या यंदाच्या भावामुळे संभ्रमाअवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ नये, शेतकऱ्यांच आणि कापूस व्यापाऱ्यांचही नुकसान होऊ नये

म्हणून सेबीने निर्णय घेतला असावा असा अंदाजही जाणकार व्यक्त करत आहे याच दरम्यान वस्त्रोद्योग कंपन्या, व्यापारी, सटोडियांच्या हितासाठी सेबीने निर्णय घेतला जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.

यंदा कापसाचे दर चढेच राहणार

गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मोठी मागणी , तसेच गुलाबी बोंड अळीच्या हल्ल्याने देशात कापसाचे उत्पादन घटल्याने दर चांगलेच तेजीत राहिले होते. तेव्हापासूनच वस्त्रोद्योग कंपन्यांची ओरड सुरू झाली होती. यंदाही देशात अळीच्या भीतीने कापूस लागवड क्षेत्र घटले आहे. त्यातच अमेरिकेतील टेक्सास, चीन आणि पाकिस्तान या प्रमुख कापूस उत्पादक देशात नैसर्गिक आपत्तीने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे जागतिक बाजाराचीही भिस्त भारतीय कापसावर अवलंबून राहणार आहे. देशांतर्गत घटलेले उत्पादन आणि घरगुती तसेच जागतिक बाजारातून मोठी मागणी यामुळे यंदा कापसाचे भाव चढेच राहतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

खान्देशातील जळगाव जिल्ह्यात गणेश चतुर्थीच्या मुहूर्ताला धरणगाव येथे 11,153 तर बोदवड मध्ये 15 हजारांच्या वर प्रति क्विंटल भाव मिळाला आहे यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत हेच भाव राहिले तर शेतकऱ्यांची यंदा दिवाळीच साजरी होणार आहे.

शेतकऱ्यांनी कापूस विकण्याची घाई करू नये-

"सेबी"ने महिनाभरासाठी कापूस वायदा व्यवहारांवर बंदी घालून कापसाचे भाव खाली आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे. खालावलेल्या भावात शेतकऱ्यांकडे आलेला कापूस माल खरेदी करून घेण्याचा हा कापूस व्यापारी, दलाल, सटोडिये आणि वस्त्रोद्योग कंपन्यांचा "सिंडिकेट" प्रयत्न असल्याचाही शेतकरी संघटनांचा आरोप आहे. वायदा बाजारातील तज्ञ आणि कृषी क्षेत्रातील जाणकारही अशा स्थितीत शेतकऱ्यांना धीर धरण्याचा सल्ला देत आहेत. तेव्हा शेतकऱ्यांनो धीर धरा, कापूस विक्रीची घाई करू नका तसेच घरात आलेला सर्व कापूस एकाच वेळी विकू नका.

Updated : 3 Sep 2022 11:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top