Home > मॅक्स किसान > आत्महत्या मुक्त शेती हेच कृषी विभागाचे उद्दिष्ट: कृषीमंत्री धनंजय मुंडे

आत्महत्या मुक्त शेती हेच कृषी विभागाचे उद्दिष्ट: कृषीमंत्री धनंजय मुंडे

महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या हा अत्यंत चिंतेचा विषय असून यापुढे महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यांपासून मुक्त करणे हे प्रमुख उद्दिष्ट ठरवून त्याला अनुसरूनच कृषी विभागाचे कार्य असले पाहिजे.. कृषी मंत्री

आत्महत्या मुक्त शेती हेच कृषी विभागाचे उद्दिष्ट: कृषीमंत्री धनंजय मुंडे
X

महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या हा अत्यंत चिंतेचा विषय असून यापुढे महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यांपासून मुक्त करणे हे प्रमुख उद्दिष्ट ठरवून त्याला अनुसरूनच कृषी विभागाचे कार्य असले पाहिजे असे स्पष्ट आदेश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय रब्बी हंगाम पूर्व आढावा बैठकीत दिले आहेत.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील साखर संकुल येथे रब्बी हंगाम 2023 24 चे नियोजन करण्यासाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.


राज्यात मराठवाडा व विदर्भासह वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाची परिस्थिती वेगवेगळी आहे त्यामुळे यावर्षी सरासरी पेक्षा रब्बीचे क्षेत्र कमी असेल असा अंदाज आहे. यावर्षी रब्बी हंगामातील पेरणीचे क्षेत्र जवळपास 58 लाख हेक्टर इतके असून, यात आणखी किमान 5 लाख हेक्टर क्षेत्राची वाढ करण्यात यावी, तसेच यासाठी आवश्यक बाबींचे नियोजन करून घ्यावे, असे निर्देश धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत.

रब्बी हंगामात पारंपरिक ज्वारी, गहू, मका, हरभरा आदी पिके घेतली जातात. त्याचबरोबर करडई, मसूर, राजमा, पावटा, वाल, मोहरी, जवस आदी पिकांच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठीचे नियोजन केले जावे, अशाही सूचना धनंजय मुंडे यांनी केल्या.

प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत ज्वारीच्या मिनिकीट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर बी-बियाणे, खते यांची कुठेही कमी पडणार नाही. खतांचे कुठेही लिंकेज होणार नाही, याबाबतही काळजी घेतली जाईल, असेही ना.मुंडे म्हणाले. जिल्हा निहाय खते, बी -बियाणे आदींच्या उपलब्धीची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर डॅश बोर्ड विकसित करावेत, असे निर्देशही धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.


दरम्यान रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटपाचे आयुक्त स्तरावरून दर आठवड्याला संनियंत्रण केले जावे, तसेच कृषी यांत्रिकीकरण योजनेतील जिल्हा निहाय मागणी व निधीची मागणी याबाबतही दर आठवड्याला नियोजन केले जावे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे हित जोपासत असताना गरज भासल्यास कॅनव्हासच्या बाहेर जाऊन काम करावे, शेतकरी हितास प्राधान्य देऊन काम करणारी यंत्रणा आपण राबवत आहोत, असा विश्वास शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला पाहिजे, असे मतही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.


या बैठकीस कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांसह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Updated : 18 Oct 2023 5:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top