Home > मॅक्स किसान > Ground Report: बर्ड फ्लूचा फटका, सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन

Ground Report: बर्ड फ्लूचा फटका, सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन

कोरोनाच्या संकटाबरोबर देशात बर्ड फ्लूचे संकट आले. राज्यातही अनेक ठिकाणी बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे सिद्ध झाले आहे. पण याचा सगळ्यात मोठा फटका नंदुरबार जिल्ह्याला बसलाय. तिथे सध्या देशातील सगळ्यात मोठे किलिंग ऑपरेशन सुरू आहे. पाहा आमचे सीनिअर करस्पाँडन्ट संतोष सोनवणे यांचा ग्राऊंड रिपोर्ट....

Ground Report: बर्ड फ्लूचा फटका, सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन
X

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर बाधित 16 कुक्कुटपालन केंद्रांमधील पक्षी शास्त्रीय पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी ४० हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. दुसर्‍या दिवशी एक लाख ५ हजार ३०३, तिसऱ्या दिवशी ८४ हजार ७८७ कोंडबड्यांची कत्तल करण्यात आली आहे. ३ दिवसात एकूण तीन लाखांपर्यंत कोंबड्या नष्ट करण्यात आल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली. बर्ड फ्लू प्रभावित क्षेत्रातील तोंबड्या केद्रांतील अंडी मोजण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी तलाठी ग्रामसेवक व पशुसंवर्धन विभागातील अधिकारी काम पाहत आहेत.

बर्ड फ्लू आणि बेरोजगारी दुहेरी संकट

एकट्या नवापूरचा विचार केला तर इथे मोठे 22 पोल्ट्री फार्म आहेत तर काही लहान पोल्ट्री फार्मही आहेत. यात हजारच्यावर तरुणांना रोजगार मिळत. मात्र आज सर्व ठप्प झाले असल्याने नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. नवापूरमधील पोल्ट्री व्यवसायातून चिकन, अंडी, पशूखाद्य पुरवठा राज्यासह शेजारील गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये मोठया प्रमाणात होत होता. मात्र सर्व ठप्प असल्याने कोट्यवधींचे व्यवहारही बंद जाले आहेत. अजूनही बाधित कोंबड्यांचे कलिंग सुरूच आहे. हे ऑपरेशन किती दिवस चालेल ते सांगता येत नाही,. त्यामुळे या संकटातून पुन्हा पोल्ट्री व्यवसाय रुळावर कधी येणार हे अजूनही निश्चित नाही. त्यामुळे प्रति कोंबडी 410 रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी नवापूर येथील पोल्ट्री चालकांनी केली आहे.


यामध्ये प्रति कोंबडी, अंडी आणि पशूखाद्य अशा तिन्ही घटकांचा समावेश आहे. मात्र बाधित पोल्ट्री फार्मचालकांना सध्या सरकारकडून प्रति कोंबडी फक्त 90 रुपये, पशुखाद्य 12 रुपये, अंडी प्रति नग 3 रुपये अशी भरपाई दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र ही भरपाई खूपच तुटपुंजी असल्याचे पोल्ट्री फार्म चालकांचे म्हणणे आहे. आधीच लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यात पोल्ट्री फार्म चालवण्यास प्रचंड खर्च येतो बर्ड फ्लूमुळे आधीच आर्थिक संकट आले असताना आता कोंबड्यांची कत्तल झाल्याने मोठे नुकसान झाल्याचे पोल्ट्री चालकांचे म्हणणे आहे.

पथकातील कर्मचाऱ्यांना पीपीई किटमुळे उलट्या

कोंबड्या नष्टच करण्याचा मोहीमेत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट घातल्याने घामामुळे मोठा त्रास होत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना उलट्यांचा त्रास झाला आहे. आमलीवाला पोल्ट्रीतील चार कर्मचाऱ्यांना त्रास झाल्याने त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. त्यासाठी सर्व पोल्ट्री फार्ममध्ये आरोग्य पथकाचे डॉक्टर नर्स अशी टीम कार्यरत आहे. राज्यातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन सध्या नवापूरात सुरू झाले आहे.


सुरवातीला नवापूरमधील न्यू डायमंड पोल्ट्री फार्म, परवेझ पोल्ट्री फार्म, अरिफभाई पालवाला वासिम पोल्ट्री फार्म आणि मोहम्मदभाई अब्दुल सलाम आमलीवाला पोल्ट्री फार्म अशा चार पोल्ट्रीमधील नमुना अहवाल पॉझिटीव्ह आले होते. मात्र त्याचे लोण इतरही पोल्ट्री फार्ममध्ये पसरल्याने आतापर्यंत 16 पोल्ट्री फार्म बाधित झाले आहेत. अजून काही पोल्ट्री फार्ममधील रिपोर्ट येणे बाकी आहे.


9 लाख कोंबड्याची लागणार विल्हेवाट

बर्ड फ्लूमुळे 31 हजार 833 कोंबड्यांचा मृत्यू झाला असून सुमारे 8 लाख 74 हजार 598 कोंबड्या नवापूर तालुक्यातील विविध पोल्ट्री फार्ममध्ये आहेत. बाधित क्षेत्रातील सर्व कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे तसेच अंडी, पक्षीखाद्य नष्ट करून त्याचीदेखील विल्हेवाट लावण्याचे निर्देश जलद कृती दलाला देण्यात आले आहेत. बाधित क्षेत्रातील कत्तल केलेल्या कोंबड्या आणि नष्ट करण्यात आलेल्या कुक्कुट पक्षांची अंडी व पक्षी यांचा त्याच ठिकाणी जलद कृती दलासमक्ष पंचनामा करण्यात येऊन त्याचा अहवाल जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाला सादर करून नुकसान भरपाईची प्रक्रिया तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात सर्वाधिक पोल्ट्री फार्म असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये 15 वर्षांपूर्वी म्हणजे 2006 साली भारतात पहिल्यांदा बर्ड फ्लूचा प्रादुर्बाव आढळून आला होता. यामुळं पोल्ट्री फार्म व्यवसाय पूर्णतः कोलमडला होता. मात्र बर्ड फ्लूमुळे नुकसान झालेल्या पोल्ट्री फार्म चालकांनी पुन्हा हा व्यवसाय उभारणीसाठी मोठे प्रयत्न केले. 2006 च्या बर्ड फ्लूचा धडा घेत पोल्ट्री चालकांनी पोल्ट्री विम्याचे कवच घेतल्याने यंदा अनेक पोल्ट्री चालकांना जीवदान मिळणार आहे. काही पोल्ट्री चालकांना ह्या विम्यामुळे पुन्हा नव्याने पोल्ट्री फार्म चालू करता येणार आहेत.


या बर्ड फ्लूचा मानवाला धोका आहे का?

बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये वेगाने पसरणारा आजार आहे. मानवाला संसर्ग होण्याचे प्रमाण नगण्य आहे. भारतात पक्षांपासून मानवास फ्लू होण्याचं प्रमाण दिसून आले नाही. आतापर्यंत जगामध्ये केवळ 862 लोकांना याची बाधा झाली असून त्यात 455 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र 70 ते 80 अंश सेल्सियस तापमानाच चिकन, अंडी उकळल्यास ते सुरक्षित राहते. तरीही नवापूरमध्ये पक्षी नष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतली जात आहे. कर्मचाऱ्यांना टॉमी फ्लूचा डोस नियमित दिला जातोय,अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

तीन महिने प्रतिबंध-

बाधित क्षेत्रातील कुक्कुट पक्षी, अंडी व पक्षीखाद्य यांची वाहतूक, खरेदी-विक्री, तसेच बाजार, जत्रा व प्रदर्शने आयोजित करण्यास 90 दिवसांपर्यंत प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच 10 किमी परिसरातील गावे प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

पोल्ट्री फार्म चालक, नागरिकांना सूचना

कोंबड्या नष्ट करण्याच्या प्रक्रियेत बाधित क्षेत्रात रिकामे करण्यात आलेले सर्व पोल्ट्रीफार्मचे आवश्यक जैवसुरक्षेसह 2 टक्के सोडियम हायपोक्लोरेट, पोटॅशिअम परमँगनेटद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

बाधित क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांची ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या ठिकाणची खासगी वाहने बाधितक्षेत्राच्या बाहेर लावण्यात यावी. निगराणी क्षेत्रातील जिवंत अथवा मृत पक्षी, अंडी, कोंबडी खत, पशुखाद्य व अनुशांगिक साहित्य व उपकरणे यांच्या वाहतुकीस मनाई करण्यात यावी. व्यावसायिक पोल्ट्री फार्ममध्ये मालक व कर्मचारी यांनी योग्य ती खबरदारी घेऊन कामकाज करावे. पोल्ट्री फार्म सोडतांना स्वत:चे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.

बाधित क्षेत्रात नगारिकांच्या हालचाली तसेच इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीवर नियंत्रण असावे. उघड्यावर मृत पक्षी किंवा कोंबड्या टाकू नये. तसेच त्यांची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांनी लावावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Updated : 2021-02-20T19:08:22+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top