Home > मॅक्स किसान > बिन तोलाचं सौंगडी....

बिन तोलाचं सौंगडी....

बिन तोलाचं सौंगडी....
X

चल सर्जा चल राजा... बिगी बिगी बिगी जायाचं...

जायाचं!

बिन मोलाचं बिन तोलाचं सौंगडी...

शेतकऱ्याचं!!

आज या ओळी सारख्या गुणगुणाव्याशा वाटत आहेत. पोळा नि बैलांच्या शर्यतींच्या खटल्याची चर्चा गेले काही दिवस चालली आहे. त्यामुळे बैलांशी संबंधित गप्पागोष्टी आमच्या मित्रमैत्रिणींमध्येही रंगल्या. आमचं शिक्षण शहरात, वडिलांची नोकरीही इथे... त्यामुळे शेत, बैल यांचा सहवास केवळ सुट्ट्यांमध्ये मिळाला. पोळा सण असतो तेव्हा शाळा सुरू असायची. पण सुट्टीच्या दिवसांत गावाला निघालो की बैलगाडीची सैर कधी एकदा होईल असं सगळ्यांना वाटायचं.

आजोबांनी बैल जोडून आमच्यासाठी तयार केलेल्या गाडीची ती सैर... ती मज्जा-मस्ती... तो मिळणारा आनंद लाँग ड्राइव्हपेक्षा काही कमी नसायचा. धम्माल वाटायची. गावी गेल्यानंतर शेतात, रानात अगदी बाजारातही काही आणायला जायचं असलं तरी बैलगाडीचा वापर व्हायचा. गाडीवर बसल्यानंतर नाना (म्हणजे आमचे चुलते ) छानसं गाणं म्हणत आम्हाला गावात, रानात फिरवायचे.

मग वडील गोष्टी सांगायचे, ‘पूर्वी बैलगाड्यांशिवाय येण्या जाण्याचा पर्याय नसायचा. बळीराजाचे जिवाभावाचे साथी त्याचे बैल. गाडीवान दादाला गाणं आपोआप सुचायचं. त्याच्या सुरांच्या तालावर, घुंगराच्या आवाजात दुडक्या चालीत चालणारी बैलगाडी ही गावाची खासियत असायची. ज्याच्या घरी बैलगाडी व बैलजोडी तो श्रीमंत, असं मानलं जायचं.’

पूर्वीच्या सजवलेल्या, लाकडाच्या बैलगाड्या फार क्वचित पाहायला मिळतात. शेतकऱ्यांना बैल पोसणं जड जातं म्हणून नि प्रवासासाठी चांगली वाहनं आली म्हणून आता बैलगाडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यांत्रिकीकरणानं शेती सोपी झाली खरी, पण एखाद्याच्या दारात ट्रॅक्टर दिसतो पण दारापुढे बैलजोडी दिसणं मुश्कील झालं तेव्हा गावही ओळखीचा वाटत नाही.

असं असलं तरी अनेक शेतकरी आपल्या शेतीची मशागत बैलांकडून करून घेतात, असं गावाकडून मुंबईत आलेल्या मित्रमैत्रिणींनी सांगितलं. अहमदनगर जिल्ह्यात अकोले, एकदरे इथं शिवाय सांगली- सातारा भागात कोळे, निमवडे आदी गावांचा उल्लेख झाला. पणबैलजोड्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच असल्याचंही बोललं गेलं.

गावाकडून करियरसाठी मुंबईत आलेले सहकारी तर आजही तिथे तसंच चित्र असल्याचं सांगतात. शेणाने सारवलेलं अंगण व त्या अंगणात रिकामी सोडलेली बैलगाडी असल्याशिवाय घराचं चित्र पूर्णच होत नाही, असं ते सांगतात. नांगरणीला ट्रॅक्टरची सोय उपयुक्त आहे पण शेतातल्या बाकीच्या कामांचं काय... मळणी, धान्याची वाहतूक यासाठी आजही बैलांचीच आठवण येते, असं बरेच जण सांगतात.

बैलगाड्यांची संख्या कमी होत चालल्याची खंत काही दिवसांपूर्वी अगदी जवळून अनुभवली. माझा तीन वर्षांचा मावसभाऊ आरव हा बैलगाडीत बसायचंय, असा हट्ट करू लागला. त्याला बैलगाडी काय असते हे कसं माहीत झालं देव जाणे पण आम्हाला हा हट्ट पुरवाचा कसा, हा मोठाच प्रश्न पडला. शहरात कुठे सापडणार बैलगाडी! गावीही बैलगाड्या दिसत नाहीत सहजासहजी. मग आम्ही त्याला दादर चौपाटीवर असलेल्या घोडागाडीची सैर करायला घेऊन गेलो. आणि तोही मस्त एन्जॉय करत होता. आम्हाला वाटलं की याला आता बैलगाडीचा विसर पडला आहे.

पण ही आमची समजूत होती. एक दिवस मोठ्या मावशीचा फोन आला. ती म्हणाली, ‘मी गावी जत्रेला चाललीय...’ त्या वेळी आरव बाजूलाच खेळत होता. त्याने पटकन त्याच्या आईला म्हटलं, “आक्काला सांग, मला बैलगाडी आण!” त्याच्या या बोलण्यानं आम्ही म्हटलं, अजूनही ‘बैलगाडी’ त्याच्या डोक्यातून गेलेली नाही. मग मोठी मावशी साताऱ्यातील म्हसवड सिद्धनाथ यात्रेला गेली. यात्रेच्या बाजारात तिला खेळण्यातली बैलगाडीही कुठेच मिळेना. भाच्याच्या प्रेमाखातर ती दोन तास फिरत होती. अख्खा बाजार पालथा घातल्यावर एका दुकानात तिला बैलगाडी मिळाली.

मावशी यात्रेवरून परतल्यानंतर तिनं आणलेली ती बैलगाडी बघून आरव खूप खूश झाला. दिवसभर तो त्या गाडीसोबत खेळत होता. तो असाच रहावा, त्याला व्हिडिओ गेमचं वेड कधीही न लागो, असं मनात आलं.

या नॉस्टेल्जिक भावनेचा उपयोग व्यावसायिकांनी करून घेतलेला दिसतो. मुंबईलगतच्या, कोकणातल्या नि टूरिस्ट स्पॉट असलेल्या ठिकाणी अनेक रिसॉर्ट्समध्ये अलीकडे बैलगाडी असते. त्यांच्या आकर्षणांमध्ये त्यांनी स्वीमिंग पूल, नेचर ट्रेल रूट यांच्याबरोबर ‘बैलगाडीची सैर’ हाही एक घटक ठेवलेला असतो. रिसॉर्टमालक खिलारी बैलांची एक जोडी कायमची आणून ठेवतो. हे बैल पोसणं, जुन्या पद्धतीने बनवलेली लाकडी गाडी मेंटेन करणं, एक गाडीवान (तो मल्टीटास्किंग करत असतो...) पगार देऊन ठेवणं त्याच्यासाठी फारसं खर्चिक नसतं. पण हा व्यवसाय मोबदला मात्र चांगलाच मिळवून देतो. शहरात नोकरीनिमित्त आलेल्या लोकांची मनं गावच्या जुन्या दिवसांना शोधत असतात. ती बैलगाडीच्या या फेरीकडे सहज ओढली जातात. बालपणाचा अनुभव पुन्हा घेण्यासाठी आणि आपल्या मुलांनाही तो फील मिळवून देण्यासाठी ते वाटेल ती किंमत मोजायला तयार होतात.

अॅग्रो टूरिझम, थीम गार्डन्स या ठिकाणी आता खिलारी बैलांची भेट होते. बैलगाडी पैसे मोजून का होईना, अनुभवायला मिळते. एका अर्थानं व्यावसायिकांनी आपल्यासाठी हे चांगलंच केलं, असंही म्हणता येईल!

प्रियंका आव्हाड

awhad.priyanka11@gmail.com

Updated : 21 Aug 2017 6:17 AM GMT
Next Story
Share it
Top