हापूस आंबा लागवड किफायतशीर
X
हापूस आंबा लागवड
पाण्याचा निचरा होणारी जामिन किंवा ज्या प्रदेशाला समुद्र किनारपट्टी लाभली आहे, अशा प्रदेशात उत्तम हापुस आंबा पिक घेता येते. आंबा बागेच्या लागवडीसाठी निवडलेल्या शेतात उन्हाळ्यात एप्रिल मे महिन्यात 10x10 (भारी जमिनीत) मीटर अंतरावर किंवा 9x9 (मध्यम जमिनीत) किंवा अतिघनता पध्दतीने लागवडीसाठी 5*5 मीटर अंतरावर (जमिनीच्या प्रकारानुसार अंतर ठरवावे) 1 मी. लांब 1 मी. रूंद 1 मी. खोल आकाराचे खड्डे तयार करून घ्यावेत. म्हणजे खड्डे काही दिवस ऊन्हात तापतील. खड्डे खोदताना जमिनीचा 25-30 से.मी. चा वरचा थर वेगळा ठेवावा आणि खालचा थर वेगळा ठेवावा. वरच्या थरातील चांगली माती किंवा नदीच्या गाळाची माती आणि उत्तम कुजलेले 4-5 घमेली (10 kg) शेणखत किंवा कंपोस्ट खत 1 ते 2 किलो सुपर फाँस्फेट ह्यांचे मिश्रण करुन ते खड्डा भरण्यासाठी वापरावे. खड्डे मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात भरावेत. खड्डयाच्या तळाशी वाळलेल्या पाला-पाचोळ्याचा 15 से.मी. जाडीचा थर द्यावा लागतो त्यावर 100-150 ग्रॅम कार्बारील भुकटी टाकावी, 1-2 किलो सुपर फाँस्फेट घालावे. यानंतर खड्डा अर्धा भरुन झाल्यावर पुन्हा पाला पाचोळ्याचा 10-15 से.मी. जाडीचा थर देणे फायदेशीर ठरते. खड्डा जमिनीपर्यंत किंवा जमिनीच्या किंचीत वरपर्यंत भरावा. खड्डा भरताना खड्डाच्या मधोमध कलम लावावे ही काळजी घ्यावी.
हापूस आंब्यामध्ये लागवडीसाठी लँटेराईट जमिनीत १ बाय १ बाय १ मिटर आकाराचा खड्डा घ्यावा. यामुळे कलमाची योग्य वाढिस मदत होते. आंबा बागेत १० X १० मिटर अंतर ठेवले जावे. उत्पादन वाढीसाठी ५ X ५ मिटर अंतरावर लागवड करावी.
लाल जमिनीमध्ये देवगड भागात आंब्याची लागवड हापूस जातीत ५ X ५ मिटर ठेवून करावी. नारळ-सुपारी-केळी किंवा आंबा-काजू अशा प्रकारचा मिश्र पिक पध्दतीत निव्वळ फायदा कोकणातील समुद्र किनारी दक्षीणेस जास्त मिळतो.
हापुस आंब्याची जातिवंत कलमे शासकीय मान्यता प्राप्त नर्सरीमध्ये खरेदी करावीत किंवा कृषि विद्यापीठांना भेट द्यावी. तेथून खरेदी करता येतात. लागवडीसाठी अधिक माहिती कृषि विभाग मधूनही मिळते. आंबा पिक जर सेंद्रिय घेतले तर अशा पिकास मोठी मागणी आहे. आवश्यक जागा असेल तर आंबा शेतीला प्राधान्य दिले पाहिजे.
फवारणी -
आंब्याच्या हापूस जातीत ५० पी.पी.एम.जी.ए. फुलोरा आल्यानंतर फवारल्यास पुढचा फुलोरा येत नाही. त्यामुळे उत्पादन चांगले मिळते. आंब्यामध्ये जास्त फळधारणेसाठी हापूस जातीत गोवा-मानकूर, रत्ना किंवा केशर १० ते १५ टक्के वेगवेगळ्या ठिकाणी लावावेत. एन.ए.ए. किंवा आय.ए.ए. २०० पी.पी.एम. १५ दिवसाचा अंतराने तीन वेळा रोपाच्या अवस्थेमध्ये फवारल्यास गुच्छाची विकृती आढळत नाही. हापुस आंब्याची फळधारणा व उत्पन्न वाढणपयासाठी दोन वेळा 2 % युरीया + 20 PPM NAA + 50 PPM सुक्ष्म अन्नद्रव्य किंवा 2 % युरीया + 5 PPM ट्राय कंटॅनॉल + 50 PPM सुक्ष्म अन्नद्रव्य हे वाटाण्याच्या दाण्याच्या आकाराचे आंबे लागल्यानंतर आणि त्यानंतर 10 दिवसांनी फवारावे. आंब्यामध्ये फळांचा कळ्या तयार होण्यापुर्वी ९० ते १२० दिवस अगोदर (१५ जुलै ते १५ ऑगस्ट) पँक्लोब्युट्रॉझॉल ५ ग्रँम प्रती झाड जमिनीमध्ये द्यावे. त्यासाठी २० मि.ली. कल्टार घेऊन त्यात ३ लिटर पाणी घ्यावे. आणि ३० छिद्रामध्ये ३ ते ४ इंच खोल झाडाच्या बुंध्याशी खते दिलेल्याचा आतील बाजूस द्यावीत. हापुस आंब्यांच्या फांद्यांची एकसारखी वाढ होण्यासाठी तसेच एकसारखा मोहोर व फळे येण्यासाठी आणि तुडतुड्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक 3 वर्षानंतर विश्रांतीच्या काळामध्ये (ऑक्टो) साधी छाटणी करून घ्यावी. (50 cm) शेंड्याकडुन आडव्या फांद्यांची.
खते व पाणी व्यवस्थापन -
नेहमीपेक्षा जास्त खतमात्रा (उदा. १.५ किलो नत्र ०.५ किलो स्फुरद ०.५ किलो पालाश प्रती झाड) आंब्याचा झाडास दिल्यास वाढीमध्ये काहीही फरक पडत नाही म्हणून त्यापेक्षा जास्त मात्रा कोकणात हापूस जातीस देऊ नयेत.
हापूस आंब्याच्या मातृवृक्षांना १०० लिटर पाण प्रती झाड १५ दिवसाच्या अंतराने ठिबक सिंचनामार्फत दिल्यास ४५.५ टक्के कलम काड्या जास्त मिळतात. तण काढणे आणि आंब्याचे उत्पादन करणे यासाठी डायरॉन २.४ किल प्रतीहेक्टर जमिनीत आणि तण उगवल्यानंतर ग्लायफोसेट फवारणी ०.८ किलो प्रती हेक्टर ३५ ते ७० दिवसांनी तणावर फवारावी.
किड व रोग नियंत्रण -
आंब्याचा कोयकलमांची मर थांबविण्यासाठी २५० पी.पी.एम. पँक्लोब्यट्रॉझॉल नर्सरी अवस्थेमध्ये फुट आल्यानंतर ४ ते ५ दिवसांनी फवारल्यास चांगले परीणाम मिळतात. खोडकीडीच्या नियंत्रणासाठी कार्बारील किंवा एन्डोसल्फान फांद्यावर धुरळावी.
घनदाट लागवडीसाठी आणि तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी मधल्या फांद्या छाटाव्यात आणि इतर फांद्याच्या शेंड्यापासून ३० ते ४० टक्के फांद्या नवीन फुटी आल्यानंतर ऑक्टोबरमध्ये छाटाव्यात त्यानंतर पँक्लोब्युट्रॉझॉल ०.७५ ग्रँम प्रती मिटर व्यासासाठी द्यावे.
आंब्यावरील बांडगुळ काढल्यानंतर ते पुन्हा वाढू नये म्हणून फांदीच्या छाटलेल्या ठिकाणी १ टक्का ग्लायफोसेट फवारावे. त्यानंतर २ किंवा त्यापेक्षा जास्त फवारण्या १५ दिवसाच्या अंतराने घ्याव्यात. बांडगुळ नियंत्रणात आणण्यासाठी ते नष्ट करावे. त्यानंतर बुटँक्लोर ०.३ टक्के किंवा व्हँसलीन ०.३ टक्के किंवा ०.५ टक्के छाटलेल्या ठिकाणी फवारावे.
झेल्यांच्या साह्याने काढलेल्या फळांच्या वजनातील घटी पेक्षा कमी आढळते. हातांनी काढलेली फळे देठाजवळ कुजलेली आढळतात.
कृष्णकांत साळगांवकर