Home > मॅक्स किसान > हंगामाच्या सुरुवातीलाच ७९ टक्के जास्त साखर उत्पादन

हंगामाच्या सुरुवातीलाच ७९ टक्के जास्त साखर उत्पादन

हंगामाच्या सुरुवातीलाच ७९ टक्के जास्त साखर उत्पादन
X

या वर्षी पडलेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा राज्यातील ऊस कारखाने आधीच सुरू झाले असून पहिल्या ४५ दिवसातच गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल ७९ टक्के जास्त साखर उत्पादन झाल्याची माहिती समोर येत आहे. या वर्षी देशभरातील साखर कारखाने १ नोव्हेंबर पासून सुरू झाले आहेत. गेल्या वर्षी २२२ साखर कारखान्यांनी ऊसाचे गाळप सुरू केले होते तर या वर्षी १५ नोव्हेंबर अखेर ३१३ कारखान्यांनी ऊसाचे गाळप सुरू केले आहे. या हंगामाच्या पहिल्या ४५ दिवसांत आतापर्यंत १३.७३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात फक्त ७.६७ लाख टन साखर निर्मिती झाली होती. साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ होण्यात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे.

गेल्या वर्षी राज्यातील ९५ साखर कारखान्यांनी १५ नोव्हेंबर पर्यंत गाळपास सुरूवात करून १.९२ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. त्या तुलनेत या वर्षी १३७ कारखान्यांनी गाळपास सुरूवात केली असून आतापर्य़ंत ३.२६ लाख टन साखर निर्मिती केली आहे. उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनीही गेल्या वर्षाच्या १.९३ लाख टन च्या तुलनेत या हंगामात १५ नोव्हेंबर पर्यंत ५.६७ लाख टन साखर निर्मिती केली आहे. या वर्षी तेथे ७८ साखर कारखाने सुरू झाले आहेत. गेल्या वर्षी फक्त ५५ कारखाने सुरू झाले होते. देशातील अन्य राज्यांमध्येही अशीच परिस्थिती आहे. साखर उत्पादनात तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या कर्नाटक मधील कारखान्यांनी गेल्या वर्षा इतकेच उत्पादन १५ नोव्हेंबर अखेर केले आहे.

राज्यात मार्च २०१७ ते सप्टेंबर २०१७ या काळात घाऊक बाजारातील साखरेचे दर पडलेले होते. देशभरात साखरेला क्विंटलमागे सरासरी ३६०० दर जाहीर झाला होता. मात्र त्या वेळीही अनेक राज्यांत क्विंटल मागे १०० ते २०० रूपये कमी दर मिळाला होता. यामागे सन २०१५ मध्ये शिल्लक राहिलेल्या साखरेचे कारण होते. नव्या हंगामातील साखर बाजारात आल्याने जुन्या साखरेच्या दरात सवलत देण्यात आली होती. या वर्षीही साखरेचे बंपर उत्पादन होण्याची शक्यता लक्षात घेता सरकारने व्यापार्‍यांच्या साखर साठवण्याच्या मर्यादा कालावधीत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे.

मात्र सप्टेंबर ते ऑक्टोबर २०१७ या दोन महिन्यांच्या सणासुदीच्या काळात साखरेची विक्री वाढण्याऐवजी मागणी घटल्यामुळे कमी झाली होती. सप्टेंबर ते ऑक्टोबर २०१६ या काळात ४२ लाख टन साखरेची विक्री झाली होती तर या वर्षी ४१ लाख टन साखरेची विक्री झाली. या वर्षीही साखरेचे बंपर उत्पादन होण्याची शक्यता लक्षात घेता साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी आणि बाजारात चलनाचा वापर कायम ठेवण्यासाठी साखरेच्या विक्रीत वाढ होणे अपेक्षित आहे.

या वर्षी साखरेचे अतिरिक्त उत्पादन होणार असल्यामुळे साखर व्यापार्‍यांच्या साखर साठ्यावरील मर्यादा तात्काळ हटवण्यात यावी, अशी मागणी आय.एस.एम.ए. (इंडियन शुगर मिल्स असोसिएशन) ने सरकारला केली आहे. एकीकडे साखरेचे अतिरिक्त उत्पादन आणि दुसरीकडे अपेक्षेपेक्षा कमी मागणी असल्यामुळे साखर साठ्यावरील मर्यादा कायम ठेवल्यास व्यापारी साखरेकडे पाठ फिरवतील. त्यामुळे बाजारातील चलनाच्या वापरावर मर्यादा येतील आणि परिणामी साखर कारखान्यांना ऊस उत्पादकांना किंमत चुकवणे अशक्य होईल, अशी भीती आय.एस.एम.ए.ने व्यक्त केली आहे.

Updated : 21 Nov 2017 4:47 AM GMT
Next Story
Share it
Top