Home > मॅक्स किसान > 'या' कांदयाला का आहे इतकी मागणी?

'या' कांदयाला का आहे इतकी मागणी?

या कांदयाला का आहे इतकी मागणी?
X

देशभरात कांद्याचे दर गगनाला भिडल्यामुळे आता सुक्या म्हणजेच वाळवलेल्या कांद्याला मोठी मागणी होत आहे. वाळवलेल्या कांद्याची निर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या तीन महिन्यांपासून सुक्या कांद्याच्या मागणीत दुप्पट वाढ झाली आहे. विशेष करून ही मागणी कांद्याच्या भूकटीसीठी आहे. गेल्या वर्षी डिसेबर अखेर १० हजार टन सुका कांदा विकला गेला होता. मात्र या वर्षी डिसेबर अखेर २० हजार टन इतकी सुका कांदा विकला जाईल, असा अंदाज आहे.

भारतात दर वर्षी ७० ते ७५ हजार टन सुक्या कांद्याची निर्मिती केली जाते. यापैकी १५ टक्के कांदा देशात वापरला जातो. उरलेल्या ८५ टक्के कांद्याची रशिया, युरोप आणि मध्य पूर्व देशांमध्ये निर्यात केली जाते. या कांद्याला हॉटेल्स, केटरर्स आणि तयार खाद्य पदार्थ बनवणाऱ्या कंपन्यांकडून मोठी मागणी असते. भारतात सुका कांदा निर्माण करणारे ९५ प्रक्रिया उद्योग आहेत. त्यापैकी ७५ उद्योग गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील महुवा येथे आहेत.

ओल्या कांद्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. याच काळात तयार खाद्य पदार्थ निर्माते, हॉटेल्स आणि मसाला निर्मात्यांकडून सुक्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. याच काळात आता सर्वसामान्यही सुक्या कांद्याची मागणी करत असल्यामुळे या वर्षी खप दुप्पट होईल, अशी माहिती महाराजा डिहायड्रेशन चे व्यवस्थापकीय संचालक विठ्ठल कोराडीया यांनी दिली.

जेव्हा ओल्या कांद्याचे भाव वाढतात, तेव्हा सुका कांदा उपयोगी पडतो. एक किलो सुका कांदा १० किलो ओल्या कांद्याइतका प्रभावी असतो. मात्र लोकांना याची माहिती नसल्याने स्थानिक बाजारात याला फारशी मागणी नसते. याउलट युरोप आणि अमेरिकेत ४० टक्के लोक घरात सुका कांदा वापरतात. भारतातील नागरिक ताज्या पदार्थांबाबत जागरूक असल्यामुळे येथे सुका कांदा फारसा खपत नाही, असेही त्यांनी सांगितले.

Updated : 2 Dec 2017 6:07 AM GMT
Next Story
Share it
Top