Home > मॅक्स एज्युकेशन > नापास झाल्यामुळे आत्महत्या केलेली विद्यार्थिनी फेर तपासणीत पास.

नापास झाल्यामुळे आत्महत्या केलेली विद्यार्थिनी फेर तपासणीत पास.

नापास झाल्यामुळे आत्महत्या केलेली विद्यार्थिनी फेर तपासणीत पास.
X

मुंबई विद्यापीठाच्या पेपर तपासणीतील भोंगळ कारभारामुळे एका विद्यार्थिनिला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादयक घटना उघडकीस आली आहे. परीक्षेत नापास झाल्यामुळे आत्महत्या केलेली विद्यार्थिनी फेर तपासणीमध्ये पास झाली आहे. रिद्धी परब असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून या प्रकरणी तिच्या वडिलांनी विद्यापीठाच्या कुलगुरुंकडे परीक्षा विभागातील अनागोंदी कारभाराबाबत व पेपर तपासणीतील गोंधळाबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.रिद्धी कॉमर्सच्या तृतिय वर्षात अंधेरीच्या एमपीव्ही वालिया कॉलेजमध्ये शिकत होती. मुंबई विद्यापीठाने सहाव्या सत्राचा निकाल जाहीर केला आणि तिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. कारण रिद्धीला फायनान्स मॅनेजमेंट विषयात 75 पैकी फक्त 20 गुण मिळाले होते. या अगोदरच्या परीक्षांमध्ये तिला 80 टक्क्यांपेक्षा कमीगुण कधी मिळाले नव्हते, त्यामुळे पास होण्याइतकेही गुण मुख्य परीक्षेत न मिळाल्याने ती निराश झाली होती. या नैराश्यातून तिने आत्महत्या केली. मात्र तिच्या निधनानंतर जेव्हा कुटुंबीयांनी पेपर फेर तपासणीसाठी अर्ज केला, त्याचा निकाल आल्यानंतर त्यांना धक्काच बरला. रिद्धिला 20 नव्हे तर 31 गुण मिळाले होते. त्यामुळे पेपर तपासणीच्या गलथानपणामुळे आपल्या मुलीचा हकनाक जीव गेल्याचे तिचे कुटुंबीय सांगतात.रिद्धीला तृतीय वर्षात पास होण्याचा पूर्ण खात्री होती, म्हणूनच तिने चार्टर्ड अकाउंटंटच्या कोर्ससाठी देखील प्रवेश घेतला होता. मात्र विद्यापीठाच्या निकालाने तिच्या स्वप्नांवर पाणी फिरले. निकालाबाबत पेपर फेर तपासणीसाठी अर्ज करणार असल्याचे रिद्धीने तिच्या मित्रांना सांगितले होते. मात्र तिच्या मनात आत्महत्येचा विचार येईल याची पुसटशी कल्पना देखील आम्हाला नव्हती असे तिचे वडील रमेश परब यांनी सांगितले. रमेश परब हे रिक्षाचालक असून कसाबसा आपला उदरनिर्वाह करून मूलीला शिकवत होते.दरम्यान, रिद्धिच्या वडिलांनी विद्यापीठाच्या पेपर तपासणीच्या भोंगळ कारभाराचा मुद्दा उचलल्यानंतर मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांनी 17 ऑक्टोबर रोजी रिद्धिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी ज्या प्राध्यापकाने रिद्धीचा पेपर तपासला असेल त्याला त्याच्याचुकांचे कोणते परिणाम होऊ शकतात याची जाणीव करून द्यावी, अशी मागणी तिच्या वडिलांनी केली.

Updated : 26 Oct 2018 2:12 PM GMT
Next Story
Share it
Top