Top
Home > मॅक्स एज्युकेशन > दहावी, बारावी परीक्षेची तारीख अखेर निश्चित: शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाडांची घोषणा

दहावी, बारावी परीक्षेची तारीख अखेर निश्चित: शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाडांची घोषणा

कोरोना संकटात गेल्या मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे शिक्षण व्यवस्था अस्थिर झाली होती. परंतू लाखो पालक आणि विद्यार्थांपुढे मात्र दहावी-बारावीची परीक्षा कशी होणार, कधी होणार हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला होता. मात्र याबाबतची माहिती शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर केली.

दहावी, बारावी परीक्षेची तारीख अखेर निश्चित: शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाडांची घोषणा
X

बारावीची लेखी परीक्षा येत्या 23 एप्रिल पासून सुरु होणार आहे आणि निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे दरम्यान घेतली जाईल आणि निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा 1 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. तर दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. ऑनलाइन वर्गावर भिस्त ठेवून आता परीक्षांची तयारी विभागाने सुरू केली होती. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या. त्यानंतर आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. कोरोनामुळे यंदा शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. तर, मुंबई आणि परिसर वगळता राज्यातील इतर भागात नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या, तरी विद्यार्थी आणि पालकांचे परीक्षा कधी होणार, याकडे लक्ष होते. या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा तीन मेनंतर आणि बारावीची परीक्षा पंधरा एप्रिलनंतर घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली. त्याचप्रमाणे पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भात आणखी काही दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.

तसेच, राज्यातील करोनाची परिस्थिती आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडून माहिती घेऊनच शाळा सुरू करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. मुंबई-पुणे व्यतिरिक्त अनेक भागांमध्ये शाळा सुरू झाल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

Updated : 21 Jan 2021 10:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top