Home > मॅक्स एज्युकेशन > तासिका, कंत्राटी प्राध्यापक की वेठबिगार?

तासिका, कंत्राटी प्राध्यापक की वेठबिगार?

राज्यातील प्राध्यापक भरती MPSC मार्फत करणं शक्य आहे का? प्राध्यापक भरतीमध्ये संस्थाचालक कसे कमावतात लाखो रुपये? काय आहे राज्यातील प्राध्यापकांच्या समस्या? वाचा शिक्षणक्रांती संघटनेचे राज्य समन्वयक डॉ. विवेक कोरडे यांचा प्राध्यापकांच्या प्रश्नांचा वेध घेणारा विशेष लेख

तासिका, कंत्राटी प्राध्यापक की वेठबिगार?
X

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो पिणार तो गुर गुरल्याशिवाय राहणार नाही. परंतु आजची परिस्थिती ही वेगळी आहे. शिक्षण हे आता वाघिणीचे दूध राहिले नसून ते आता पुढाऱ्यांच्या ताटा खालचे मांजर झाल्याचं आपल्याला दिसून येतंय. यामधून असंख्य लाचार व कणाहीन बेरोजगारांच्या झुंडी च्या झुंडी दरवर्षी मार्केट मध्ये येत आहेत.

कोरोना काळात तर आपल्या शिक्षण व्यवस्थेचे अक्षरशः धिंडवढे निघाले आहेत. यामध्ये जास्तीत जास्त भरडलया गेला तो म्हणजे तासिका तत्वावर व कंत्राटी तत्वावर काम करणारा सहाय्यक प्राध्यापक वर्ग. त्याच बरोबरीने नेट, सेट पी. एचडी. असून सुद्धा सहाय्यक प्राध्यापक भरतीच बंद असल्यामुळे हा पात्रता धारक याच काळात रोजगारहमीच्या कामावर जाताना दिसून आला.

कुणी चहाची टपरी टाकली, कुणी भाजीपाल्या ची गाडी लावली. तसे बघितले तर कोणतेही काम छोटे नसते. परंतु आज आपल्या समाजाने विचार करायला पाहिजे की, या पात्रता धारकांनी एव्हढे शिक्षण काय पकोडे विकण्यासाठी घेतले असेल काय?

आज त्यांना पकोडे विकावे लागतात याला जवाबदार कोण आहे?

हे प्रश्न आपल्याला पडत नाही का? तर उत्तर येईल की प्रश्न पडतात. परंतु सध्याच्या व्यवस्थेने आम्हा सर्वांच्या डोळ्यावर एक पट्टी ओढून ठेवली आहे. दुर्लक्ष्य करण्याची हो दुर्लक्षच म्हणूया कारण आपण तालिबान अफगाणीस्थान यावर भर भरून बोलू. परंतु आमच्या देशात सुद्धा या पात्रताधारक उच्चशिक्षीत लोकांना तालिबान पेक्षाही वाईट परिस्थितीला आज सामोरे जावे लागत आहे. ह्यावर मात्र, आम्ही सोईस्कर मौन बाळगून असतो. मग तुम्ही म्हणाल की, शासनाने पात्रता धारक लोकांसाठी तासिका प्राध्यापकाची सोय केलेली आहे. ते हा जॉब स्वीकारू शकतात की! हो तुमचे म्हणणे एकदम रास्त आहे. परंतु हे तासिकातत्व तुम्ही समजावून घेतले का? घेतले नसेल तर मी तुम्हाला समजावून सांगतो.

CHB म्हणजे तासिका तत्व ही व्यवस्थेने दीलेली एक शिवी...

मी वरील वाक्य हे अतिशय वैफल्य ग्रस्तेतून लिहीत आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून उच्चशिक्षित पात्रता धारकांच्या आयुष्य मातीमोल या तासिका तत्व प्रणालीने केलेले आपल्याला दिसून येते. आजही कधीना कधी तरी येणाऱ्या काळात शासनाला व संस्थाचालक म्हणजे शिक्षण क्षेत्रातील दहशतवादी (सर्वच नाहीत याला काही अपवाद आहेत) यांना आपली दया येईल व ते आपल्याला कायमस्वरूपी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी रुजू करून घेतीलय या आशेवर दहा दहा पंधरा वर्षांपासून तासिकातत्त्वावर काम करतात. तासिकातत्त्वावरील प्राध्यापकाला महाविद्यालयात कवडीचीही किम्मत नसते. महाविद्यालयाचा चपराशी सुद्धा त्याला हीन दर्जाची वागणूक देते.

याला कारण म्हणजे आर्थिक असमानता कारण त्या चपराश्याला माहीती असते की, याच्या पेक्षा पगार आपला जास्त आहे. कारण या तासिका तत्त्वावरील काम करणाऱ्या प्राध्यापकाला महिन्याला पगार मिळतो सात ते आठ हजार आणि तेही पैसे मिळवण्यासाठी त्याला दोन वर्ष वाट बघावी लागते. कारण याचे पैसे देण्यासाठी शासनाकडे फंड नसतो. काही काही संस्थाचालक यामधला पैसे सुद्धा खातात. जर कदाचीत vacancy निघालीच तर हे संस्थाचालक नामक दहशतवादी दुसऱ्या candidate कडून लाखो रुपये घेवुन ती जागा भरतो. म्हणूनच आज प्राध्यापक होण्याचे दर आपल्याला 40 ते 50 लाख झाल्याचे बघायला मिळतात.

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची परिस्थीती आज एव्हढी वाईट आहे की, वयाची 35 ते 40 वर्ष उलटून गेली आहेत. परंतु यांची लग्न व्ह्यायची आहेत. कारण कुणी यांना मुली द्यायला तयार नाही. यापूर्वी आपण ऐकलं असेल की फक्त शेतकऱ्यांना लोक मुली देत नाहीत. तसेच आता या CHB प्राध्यापकाची स्थिती तशीच आहे.

किंबहूना त्यांच्याही पेक्षा वाईट आहे. असे म्हटले तरी चालेल. त्याशिवाय या CHB प्राध्यापकाचा काम करण्याचा अनुभव कुठेही ग्राह्य धरल्या जात नाही. आणि अजुन त्यापेक्षाही अचंबीत करणारी गोष्ट म्हणजे CHB प्राध्यापक हा विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. मात्र, तो विद्यापीठ परिक्षाच्या उत्तर पत्रिकेचे मुल्यांकन करु शकत नाही. आहेना अचंबीत करणारी गोष्ट. म्हणून कुठल्याही लेबर लॉ चे पालन होत नसलेला व कुठल्याही प्रकारच्या भविष्याची निछीती नसलेला हा काळा कायदा रद्द होणे अतिशय आवश्यक आहे.

प्राध्यापक भर्ती आंदोलन व सरकारची उदासीनता.

आज घडीला प्राध्यापक भर्ती व्हावी. यासाठी अनेक संघटना आंदोलन करीत आहेत. या आंदोलनकाची भुमिका अशी आहे की, 100 टक्के प्राध्यापक भरती व्हायला हवी. तासिकातत्व प्रणाली रद्द व्हावी अश्या काही मुद्द्यावर ही मंडळी आंदोलन करत आहेत. परंतु यामध्ये पात्रता धारकांमध्ये साशंकता आहे. कारण दीड वर्षापुर्वी महाराष्ट्रात जी 40 टक्यांमधील काही पदाची भर्ती झाली होती. त्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता.

त्याचमुळे सामान्य घरातील मुले ज्याची ऐपत 40 ते 50 लाख देण्याची नाही. ते गुणवत्ता असुन सुद्धा नोकरी पासून वंचित राहीले आहेत. म्हणून या वर्गामध्ये हे जे आंदोलन करत आहेत. यांच्या विषयी थोडी साशंकता आहे. कारण भर्ती जरी भविष्यात सुरु झाली तरी पारदर्शक भर्ती विषयी या लोकांजवळ कुठलाही रोड मॅप नाही. म्हणजे भर्ती जरी सुरु झाली तर येणाऱ्या काळात यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होणार ही काळ्या दगडा वरची रेघ आहे.

म्हणून या आंदोलनला कुणी एव्हढे सीरियस घेत नाही आहे. कारण पात्रता धारकामध्येच बरेच गैरसमज यांच्या विषयी आहेत.

हतबल उच्चतंत्र शिक्षण मंत्री

या सर्व गंभीर परिस्थीतीत सर्व पात्रता धारकाचे मनोरंजन करण्याचे काम आपले उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यानी केले आहे. सामंत साहेब जेव्हा प्रथम उच्च तंत्र शिक्षण मंत्री झाले तेव्हाच त्यांनी जाहीर करुन टाकले होते. मी आठ दिवसात प्राध्यापक भरती करतो. त्यापासून त्यांनी प्रत्येक महिन्यात सात ते आठ वेळा आठ दिवसात प्राध्यापक भर्ती करतो हे वाक्य म्हटले आहे. नंतर त्यांनी काही दिवसांनी पुन्हा मी आता सोमवारी भर्ती करतो असे वाक्य फेकले आणि आता पर्यंत तो सोमवार निघाला नाही.

पुन्हा मध्येच साहेब म्हणाले होते. तीन दिवसात प्राध्यापक भर्ती करतो... मात्र, ते ही तीन दिवस अजुन पर्यंत निघाले नाहीत. आता साहेबांनी प्राध्यापक भर्तीचा विषय जरी काढला तरी पात्रता धारक हसुन मोकळे होतात. पारदर्शक प्राध्यापक भर्ती विषयी विचारले तर साहेब पुरावे मांगतात. असे काहीना काही सतत पात्रता धारकाचे मनोरंजन साहेबांकडून सुरु असते.

यावर ऊपाय काय?

आपण जर बघितले तर मागच्या दशकात जे नेट, सेट पीएचडी झाले. ते बहुतांशी गरीब घरातील मुले होती. ज्यांची पहीली पिढी इथं पर्यंत शिकलेली आपल्याला बघायला मिळाली. परंतु या मुलांना शासन आज रोजगार द्यायला कमी पडत असेल तर हे जे आज त्यांच्या येणाऱ्या पिढीसमोर रोल मॉडल म्हणून उभे आहेत. त्यांचे हाल बघुन कुणीही गरीब होतकरू मुलगा प्राध्यापक होण्याचे स्वप्न बघणार सुद्धा नाही. म्हणून यावर एकच उपाय आहे ती म्हणजे प्राध्यापक भरती ही भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक आणि एका विशिष्ट यंत्रणे (mpsc) मार्फतच व्हायला हवी, CHB म्हणजे तासिका तत्त्व कायम स्वरुपी बंद व्हायला हवे. असे जर झालेच तर समाजातील प्रत्येक स्थरातील होतकरू गरीब पात्रता धारकांना न्याय मिळेल..




डॉ. विवेक कोरडे

राज्य समन्वयक

शिक्षणक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य

Updated : 30 Aug 2021 10:58 AM GMT
Next Story
Share it
Top