Home > मॅक्स एज्युकेशन > नवीन शैक्षणिक धोरण: कोणाचं चांगभलं होणार?

नवीन शैक्षणिक धोरण: कोणाचं चांगभलं होणार?

नवीन शैक्षणिक धोरण नक्की कोणत्या वर्गासाठी आहे? नवीन शैक्षणिक धोरणाचे लाभधारक कोण असणार वाचा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचे विश्लेषण

नवीन शैक्षणिक धोरण: कोणाचं चांगभलं होणार?
X

"नवीन शिक्षण धोरण" (New Education Policy NEP) मधील फक्त एका दगडाने अनेक पक्षी मारले जाऊ शकतात. एनईपी मध्ये बरेच प्रस्ताव आहेत; पण शिक्षणसंस्थाना वित्तीय स्वयंपूर्ण (Financial Self Sustainable) व्हायला लावण्याचा आग्रहामुळे विश्वविद्यालयीन क्षेत्र पायावर नाही डोक्यावर उभे केले जाईल.

कोणाला शिकायला मिळणार, नक्की काय शिकवले जाणार, कोणत्या शिक्षकांना / प्राध्यापकांना किती पगार मिळणार, संशोधन कशावर होणार, शिक्षण मिळालेच तर उरलेल्या आयुष्यात त्या तरुणांची मानसिकता काय असणार?

या साऱ्या प्रश्नांवर कोणतीही जोर जबरदस्ती न करता, तुम्हाला कळणार पण नाही अशा बेताने, निर्णायक प्रभाव पाडला जाईल.

(अ) शिक्षण संस्थांचा सर्वात हुकमी वित्तीय स्रोत असतो. कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या फियांचा; सरकारकडून मिळणारी अनुदाने कमी होत जाणार त्या प्रमाणात आधीच जास्त असणाऱ्या फिया वाढत जाणार आहेत.

विद्यार्थी वाढीव फिया भरून शिक्षण घेऊ शकणार की नाही हे त्यांच्या आईवडिलांच्या मासिक वा वार्षिक उत्पन्नांवर ठरणार; देशात वेतन पातळीला संरक्षण नसणे, अनौपचारिक क्षेत्राचे प्राबल्य यामुळे आईवडिलांचे मासिक / वार्षिक उत्पन्न दबावाखाली राहणार

(ब) अपरिहार्यपणे कोट्यावधी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जे काढावीच लागतील; त्यातून शैक्षणिक कर्जाची मोठी बाजारपेठ विकसित होऊ शकते; अमेरिकेत रिटेल क्षेत्रात गृह कर्जाखालोखाल ट्रिलियन्स डॉलर्सचे शैक्षणिक कर्जाचे क्षेत्र आहे.

(क) कर्ज काढून कॉलेजचे शिक्षण घेतांना विद्यार्थ्यांच्या मनात आपल्याला हे कर्ज फेडता आले पाहिजे. हा एकमेव विचार असणार; विद्यार्थी असेच कोर्स निवडणार ज्याला एम्प्लॉयमेंट मार्केट आहे आणि बऱ्यापैकी पगार मिळू शकतात; विद्यार्थांची विषयातील आवड हा दुय्यम मुद्दा असेल.

(ड) विद्यार्थी त्या वयात कोणाचा मुलाहिजा न ठेवणारे असतात; बंडखोरी त्यांच्या रक्तात असते. पण कर्जाच्या सततच्या जाणिवेमुळे विद्यार्थी कोणत्याच सामाजिक / राजकीय आंदोलनात सहभागी व्हायला तयार नसतील.

(इ) कॉलेजसना वाढीव फियांमधून भांडवली खर्च भागवता येणार नाही; त्यासाठी त्यांना देणग्यावर अवलंबून राहावे लागेल; या देणग्या प्रायः कोर्पोरेट्स किंवा श्रीमंत व्यक्ती देऊ शकतात. त्यांची राजकीय विचारसरणी नेहमीच उजवी, भांड्वलकेंद्री असते; त्यामुळे आपण देणगी दिलेल्या कॉलेज मध्ये काय शिकवले जाणार, कोणती मूल्ये शिकवली जाणार यावर त्यांचा अप्रत्यक्ष पण निर्णायक प्रभाव असेल.

(ई) आणि सगळ्यात महत्वाचे; डोक्यावर कर्ज घेऊन दर महिन्याला ईएमआय भरण्याच्या एकमेव उद्देशाने नोकऱ्या / व्यवसाय करणारी पिढी त्यांच्या नोकरी / व्यवसायात किंवा आजूबाजूला झापडे लावून जगेल. आपल्याला कोणतीच गोष्ट खटकणार नाही याची काळजी घेईल. होयबा, येस सर वाली पिढी होईल. त्याचे समाजावर, राष्ट्रावर होणारे परिणाम रुपयात मोजता येणारे नाहीत.

अजून खोलात जाऊन विचार करा; तुमचे तुम्हालाच कळेल की सार्वजनिक पैसे काढून घेऊन "तुमचे तुम्ही बघा" या एका मेसेजने किती मूलभूत होऊ शकतात.

संजीव चांदोरकर (१३ जुलै २०२१)

Updated : 15 July 2021 5:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top