Home > मॅक्स एज्युकेशन > जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा ऑनलाईन प्रयोग, सरकार धडा घेणार का?

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा ऑनलाईन प्रयोग, सरकार धडा घेणार का?

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा ऑनलाईन प्रयोग, सरकार धडा घेणार का?
X

देशात गेल्या दीड वर्षात लॉकडाऊनमुळे शाळा ऑनलाईन सुरू आहेत. काही भागात शाळा सुरू करण्याचा निर्णय़ घेण्यात आला. पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना कोरोनामुळे अस्तित्वात आली. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. पण दुसरीकडे ग्रामीण भागातील एका शिक्षकाने ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करत 10 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा अनोखा उपक्रम राबवला आहे.


गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेपासून दूर राहावे लागले आहे. केवळ ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून घरच्या घरी शिक्षणाचे घडे गिरवावे लागत आहेत. या दीड वर्षांच्या काळात 'मुलांशी गप्पा' हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून संतोष राऊत या उपक्रमशील शिक्षकाने आपला हा उपक्रम दहा जिल्ह्यातील विद्यार्थापर्यंत पोहचवला आहे. या उपक्रमाची सर्वदूर चर्चा होत असताना ,थेट प्रधानमंत्री कार्यालयाने याची दखल घेतली आहे. पंतप्र्धान नरेंद्र मोदी यांनी मन की बात'मध्ये राऊत सरांना चर्चा करण्याची संधी दिली.


संतोष राऊत हे नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यातील कारवाडी येथे जिल्हा परिषद शाळेत सहशिक्षक म्हणून काम करतात. विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम राबवणाऱ्या राऊत सरांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोरोनाच्या काळात सर्व शाळा बंद होत्या. सरकारी शाळांमधील शिक्षकांना सुरूवातीला तर ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यासंदर्भात कोणत्याही सूचना नव्हत्या. नंतर युट्यूब लिंक विद्यार्थ्यांना पाठवण्यात आल्या. यामुळे सरकारी शाळांमधील ऑनलाईऩ शिक्षण मुख्य प्रवाहात येण्यास वेऴ लागला. या तुलनेत खासगी शाळांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन शिक्षण सुरू केले. आता बहुतांश खासगी शाळा सुरळीतपणे ऑनलाईन सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर संतोष राऊत यांनी केलेला प्रयोग अनोखा ठरतो.

*ऑनलाईन शिक्षणाचा अनोखा प्रयोग*

संतोष मारुतीराव राऊत यांनी कोविडच्या काळात 'वर्क फ्रॉम होम' च्या माध्यमातून गेल्या ३७८ दिवसांपासून हा प्रयोग सकेला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयोग आहेत. यामध्ये केवळ कारवाडी शाळेतील विद्यार्थी नाहीत तर राज्यभरातील १० जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी जोडले आहेत .
जुलै २०२० या महिन्यापासून या उपक्रमाला त्यांनी सुरुवात केली. लॉकडाऊनच्या परिस्थितीत ऑनलाइन शिक्षणाचे आव्हान लक्षात घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक प्रयोग सुरू केला. त्यांनी पारंपरिक पद्धतीच्या शिक्षणा पलिकडे जाऊन नवीन अभ्यासक्रमच तयार केला. दररोज सकाळी झूम व गुगल मीटिंगच्या मदतीने अर्धा तास योग सराव सुर करण्यात आला. त्यानंतर आठ ते नऊ या वेळेत शैक्षणिक अभ्यासाच्या तासिका ठरवण्यात आल्या. संध्याकाळी एक तास माहिती तंत्रज्ञानाची तासिका घेतली जाते. यामध्ये केवळ शैक्षणिक अभ्यास करुन घेतला जात नाही. तर गेल्या अनेक महिन्यापासून या समूहातील विद्यार्थ्यांना उत्तम तंत्रस्नेही बनवण्याचा प्रयत्नही केला गेला आहे. आज अनेक विद्यार्थी स्वतः झूम, गुगल मिटची मीटिंग स्वतःहुन घेत आहेत. एवढेच नव्हे तर इतरही अनेक अँपची माहिती ते इतरांना मीटिंगमध्ये समजावून सांगत आहेत.

या उपक्रमा दरम्यान २०० च्यावर टेस्ट सुद्धा झाल्या आहेत. तिसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांनीच विद्यार्थ्यांसाठी त्यांनी य़ा टेस्ट तयार केल्या आहेत. विशेष सांगायचे तर प्रकाश चव्हाण यांच्या मार्गदर्शक तासिकेतून दोन विद्यार्थ्यांनी स्वतःचे एप्स बनवले आहेत. मुलांशी गप्पा समूह करत कोरोनाच्या लॉकडाऊन काळातील शिक्षणासाठी मुलांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

अभ्यासाबरोबर विविध एप्सचे निर्माते, कवी, लेखक, गायक, सैनिक, वैमानिक, मंत्रालय कक्ष अधिकारी, चित्रपट कलाकार, लघुपट निर्माते, शिल्पकार, चित्रकार, पत्रकार, शेतकरी, भजनी, मातीचे किल्ले निर्मिती करणारे अशा अनेक व्यक्तींच्या मुलाखती व मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या गेल्या आहेत. पुस्तकाबाहेरचा अभ्यास विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. विना दप्तराची शाळा, बांधावरील शाळा आदी २८ उपक्रम, मुलांशी गप्पा आदी उपक्रमही राबविले गेले आहेत.

या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्याची इच्छा पूर्ण होत असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद चे शिक्षक संतोष राऊत यांनी व्यक्त केली आहे. चांगले काम केले तर त्याची दखल पंतप्रधानही घेतात, हा संदेश राऊत यांच्या कार्यातून मिळाला आहे. लॉकडाऊनचे संकट येऊन आता दीड वर्ष उलटून गेले आहे. या संकटाने शिक्षणक्षेत्रात बदल करण्याची गरज आहे. पण सरकारने याबाबत सकारात्मक पाऊलं उचललेली नाहीत. संतोष राऊत यांच्यासारख्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने दाखवलेला हा नाविन्यपूर्ण मार्ग सरकारला उपयुक्त आहे. याचा विचार का केला पाहिजे याचे कारण महत्वाचे आहे.

शिक्षणातील चार भिंतींची शाळा ही पद्धत बदलून आता शिक्षणाच्या पर्यायी रचनासुद्धा आता तयार ठेवाव्या लागणार आहेत. ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा आणि मोबाईल घेणे शक्य नाही म्हणून विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या यांचा विचार केला तर ऑनलाइन शिक्षण हा कायमस्वरुपी पर्याय असू शकत नाही. पण विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका छापून त्या वितरित करणे, विद्यार्थ्यांना स्वयम् अध्ययनाची साधने देण, स्वयम् अध्ययनाची मानसिकता तयार करणे असे स्वरूप आता बदलावे लागणार आहे. त्याचबरोबर कोरोना काळात झालेले स्थलांतर, लॉकडाऊनमुळे वाढलेली गरीबी, यामुळे या वर्गातील मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर पडून बामजुरीला लागल्याची उदाहरणं आहेत.

कोविड काळातल्या शिक्षण पद्धतीचा विचार होण्याची गरत आहे. भविष्यात असे संकट आले तर काय उपाय असावेत, संतोष राऊत यांनी राबवलेले उपक्रम आणि पद्धती कदाचित सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सोयीचे नसेल. पण यामधून एक विचार घेऊन सरकारला धोऱण निश्चित करावे लागणार आहे. इतर राज्यांची मुलं स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे का असतात, याचा अभ्यास केला तर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमा व्यतिरिक्त इतर कोणकोणत्या गोष्टींचे ज्ञान देणे गरजेचे हे समजते. हे ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासाठी त्यांच्यावर कोणताही अतिरिक्त ताण न टाकता देता येऊ शकते हे सुद्धा सिद्ध झाले आहे. संतोष राऊत यांच्या या प्रयोगाने खासगी शाळा किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येच प्रतिभा असते असे नाही तर जि.प. च्या शाळांमधून शिक्षण क्षेत्रातील क्रांतीकारक उपक्रम तयार होऊ शकतात हे सिद्ध केले आहे.


Updated : 31 July 2021 6:12 PM GMT
Next Story
Share it
Top