Home > मॅक्स एज्युकेशन > मोदीजी जरा थांबा... ! काळाला तुमचं मुल्यमापन करू दे

मोदीजी जरा थांबा... ! काळाला तुमचं मुल्यमापन करू दे

मोदीजी जरा थांबा... ! काळाला तुमचं मुल्यमापन करू दे
X

नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित लघुपट शाळांमध्ये दाखवण्याची सक्ती केली जातेय. या आधी त्यांचं मन की बात असंच जबरदस्ती ऐकवलं गेलं. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातूनही मोदी शाळां-शाळांमध्ये पोहोचले. पाठोपाठ नरेंद्र मोदी किती महान आहेत याचा लघुपट आता विद्यार्थ्यांना पाहावा लागणार आहे. एकूणच शिक्षण व्यवस्था किती रसातळाला जातेय हे सध्या पाहावं लागतंय.

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी किती महान आहेत याचं विवेचन इतिहास करेलच, पण आपल्याच जीवंतपणी आपलं चरित्र शिकवण्याचा अट्टाहास हा विकृत मनोवृत्तीचं दर्शन घडवतो. आज सर्वत्र इतिहासाचं विकृतीकरण होताना दिसतंय. नेहरू-गांधी-आंबेडकर यांच्या बाबत खोटा इतिहास पसरवला जातोय, इतका खोटा की तरूण पिढीला आता या दिग्गजांची लाज वाटायला लागलीय. अनेक तरूण तर जाहीरपणे या जागतिक नेत्यांची खिल्ली उडवताना दिसतात. रोज नवनवीन किस्से सोशल मिडीयावर पसरवले जातात. या कामांमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पक्ष, अनेकदा ते स्वत: आघाडीवर असलेले दिसतात. या देशाच्या उज्ज्वल परंपरांना छेद देण्याचं षडयंत्रच या पक्षाने रचलंय.

जुना इतिहास मोडून काढायचा. जुनी प्रतिकं पळवायची,त्यांता सोयीस्कर अर्थ लावायचा. असा धंदा ज्यांनी अवलंबला आहे त्यांना नवा इतिहास रचायचा आहे. हा नवा इतिहास त्यांच्या विचारधारेतील जुन्या नेत्यांचा ही नाही. त्यांना स्वत:ला इतिहास बनायचंय. अशा प्रचंड आत्मकेंद्री असलेल्या नेत्याचा उदो-उदो नवीन पिढीने का पाहायचा.. हो मोठा प्रश्न आहे.

काळाच्या पडद्याआड गेलेल्या व्यक्तिंचा इतिहास आज बदलून सांगितला जातो. जीवंत व्यक्तींबाबत द्वेष पसरवला जातो. ज्यांचं राजकारणच द्वेषमूलक आहे अशा व्यक्तीचा नेमका काय इतिहास आपण पाहणार आहोत. जीवंत व्यक्तींचं चरित्र बदलू शकतं, बिघडू शकतं. अशा वेळी बदललेल्या परिस्थितीत आपण विद्यार्थ्यांच्या मनावर-मेंदूवर कोरलेल्या स्मृती पुसून टाकू शकत नाही. मोदींना आपला संघर्षच जर देशापर्यंत पोहोचवायचा असेल तर थोडं थांबलं पाहिजे. थोडा संयम ठेवला पाहिजे.

तुमचाही इतिहास-संघर्ष वाचायला-बघायला लोकांना आवडेल. घाई कसली आहे. इतिहासाचा हिस्सा किंवा इतिहास बनण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. तसं ऐतिहासिक काम ही करावं लागेल. सध्या तुमच्या नावावर जी जमा आहे ती तितकीशी उज्ज्वल नाहीय. पैशाच्या भाषेत ज्याला काळा पैसा म्हणतात, तसं तुमच्याही कर्तृत्वात बरंचसं काळं कर्तृत्व आहे. तुमच्या लघुपटाला हा विरोध नाहीय. आज तुम्ही आहात, उद्या कुणी दुसरं असेल. जीवंत माणसं जर सत्तेच्या जोरावर आपला इतिहास रेटायला लागली तर अनर्थ होईल. आज तुमचा इतिहास शिकण्याची-शिकवण्याची जी घाई चालवलीय त्याला विरोध केला नाही तर कदाचित इतिहास या देशाला माफ करणार नाही. इतिहासाला निष्पक्षपणे, काळाच्या कसोटीवर तुमचं मुल्यमापन करू दे.

Updated : 12 Sep 2018 6:49 AM GMT
Next Story
Share it
Top