Home > मॅक्स एज्युकेशन > शिक्षणक्षेत्रातील आधुनिकता : फायदे आणि तोटे

शिक्षणक्षेत्रातील आधुनिकता : फायदे आणि तोटे

शिक्षणक्षेत्रातील आधुनिकता : फायदे आणि तोटे
X

'न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते' अर्थात ज्ञानासारखी पवित्र गोष्ट जगात कोणतीही नाही. असं आजही ज्ञानाबद्दल बोलले जाते. 'तेवो सदा ज्ञानमय प्रदीप' या विचाराला साकार करण्यासाठी आपला देश, शासन व शिक्षणक्षेत्रातील विविध तज्ञ मंडळी पुष्कळ कष्ट घेत आहेत.

आजच्या विज्ञान युगाला तंत्रज्ञानाची जोड न दिल्यास आधुनिक युगाची परिपूर्ण व्याख्या होत नाही. विविध शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे यांमध्ये एक नवीनच पद्धत उदयास आली आहे. आपण त्याचा online classes, virtual classes, flipped classes, मूडल (MOODLE), स्वयम (SWAYAM), NPTEL , साक्षात (SAKSHAT), A-View, NMEICT किंवा उत्प्रेक्षी वर्ग या गोंडस नावाने गौरव करतो.

आज विज्ञान तंत्रज्ञानामुळे सर्व ज्ञान बोटांच्या साहाय्याने अगदी चुटकीसरशी क्षणार्धात मिळते. या तंत्रज्ञानाचा वापर आजची शिक्षणप्रणाली विकसित करण्यासाठी केला जातो आहे. यामध्ये आपली कामगिरी उत्तम व्हावी. यासाठी दिलेले प्रशिक्षण असते. Online classes ही पद्धती आज खूप लोकप्रिय झाली आहे. या उत्प्रेक्षी वर्ग संकल्पनेत आपल्याला इंटरनेट, LCD/संगणक या उपकरणांद्वारे एक शिक्षक व विदयार्थ्यांना उत्साहपूर्वक एका जागी खिळून ठेवण्याची सोय दिलेली असते. आजच्या प्रगत काळात गुरुकुल मधील पारंपारिक शिक्षणाबरोबरच आजच्या online classes ची जोड देणे अत्यावश्यक ठरले आहे.

सध्या online courses चे वाढते, प्रस्थ पाहून आज घडीला महाविद्यालये, विद्यापीठांनी Flipped Classroom ची सुविधा सुरु केली आहे. या वर्गात अभ्यास करताना पाठ्य-पुस्तक किंवा संदर्भ ग्रंथाची तसेच कोणत्या नोट्स किंवा इतर अभ्यासेत्तर साहित्य शोधण्यासाठी तारांबळ उडत नाही. अध्ययनकर्ता स्वेच्छेने जगाच्या कानाकोपऱ्यातील काहीही, कधीही, कितीही वेळा शिकू शकतो. अशी ही काळ, वेळ, स्थळ असे निर्बंध नसलेली मुक्त सुविधा आहे.

विविध संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, वृत्तपत्रे, संशोधन पत्रिका त्वरित खरेदी करणे शक्य नसते, किंवा आर्थिकदृष्टया परवडणारे नसते. online वर्ग ही या बाबतीत परवडणारी गोष्ट आहे. विद्यार्थी आवश्यकतेनुसार ज्ञानाची खोली, ज्ञानाची उजळणी, कुवतीनुसार गृहपाठ, प्रगतीसाठी आवश्यक सूचना, सर्वंकष मूल्यमापनासाठी आवश्यक त्या चाचण्या, एखादा कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्यांचे प्रमाणपत्र देणे, एखाद्या कौशल्याची निर्मिती करणे, यातून व्यावसायिक वृद्धीस मदत करणे. याचबरोबर भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य, गरजेनुरूप विश्रांती, आवश्यकतेनुसार अध्यापनात लवचिकता आणणे व विद्यार्थ्यांवरील कामाचा बोझ कमी करणे. इत्यादी सुविधांचा विचार उत्प्रेक्षी वर्गामध्ये केला जातो.

क्लिष्ट, किचकट वाटणाऱ्या संकल्पना सहज सोयीचे करणे यामुळे सोपे जाते. विद्यापीठ स्तरावर देखील मूडल, स्वयम, NPTEL, साक्षात, A-View, NMEICT यांसारख्या शासनाने सुरु केलेल्या स्तुत्य उपक्रमांचा वापर करून IIT सारख्या शिक्षण संस्थांमधील प्राध्यापकांची तसेच शिक्षणतज्ञ, विशेषज्ञ व्याख्याने, प्रात्यक्षिके, संशोधने यांचे व्हिडिओ, त्यासंबंधित असणारी नियतकालिके, संदर्भ ग्रंथ विद्यार्थ्यांना पोचवतात.

या स्रोतांद्वारेच त्यांना गृहपाठ देणे, विविध चाचण्या घेणे व तिथेच त्यांचे मूल्यमापन करणे इत्यादी गोष्टी केल्या जातात... नक्कीच याद्वारे अथांग अश्या ज्ञानसागराची गोडी विद्यार्थी चाखू शकतो, निश्चितपणे विद्यार्थी प्राध्यापक यांचा वेळ वाचतो आहे...

थोडक्यात विद्यार्थ्यास केंद्रस्थानी ठेवून या सुविधेची निर्मिती केली आहे. 'अति सर्वत्र वज्यते' ही उक्ती लागू होतेच . हेच तंत्रज्ञान शापयुक्त ठरते. जेव्हा विद्यार्थी अभ्यासाव्यतिरिक्त इतर वेबसाइट सर्च करतात, त्याचे घातक परिणाम त्यांच्या जीवनावर होतात. 'The Flipped Classroom is mindset not a method'. असं कोणीतरी म्हटलेच आहे .या विधानाचा विचार करणं आवश्यक वाटतं, खरंच Online classes ची नित्यनियमित जीवनात आवश्यकता भासते काय?

Online Classes म्हणून यांचा स्क्रीन वेळ भरमसाठ वाढणार.... त्याचा विपरीत परिणाम मुलांच्या डोळे व मेंदूवर होणार. आम्ही ऑनलाइन अभ्यास करतो याचे समाज माध्यमावर फोटो टाकले जातात. एकंदरीत काय, ' रात्र थोडी सोंगे फार ' अशी अवस्था आजच्या विद्यार्थ्यांची झाली आहे. सर्व गोष्टी 'युट्यूब 'वर मिळतात. कशाला लक्षात ठेवा.. त्यामुळे सहाजीकच मुले आपली बुद्धी वापरतच नाहीत. आजच्या पिढीला सर्वकाही त्वरित तयार गोष्टी पुरवून त्यांना संयमाचे धडे देण्याकडे आपण साफ दुर्लक्ष करत आहोत.

मूडल, स्वयम, NPTEL, साक्षात, A-View, NMEIC, Zoom, Youtube, यांमुळे शिक्षकांची गरजच संपते साहजिकच विद्यार्थी गैरहजेरीचे प्रमाण वाढते. फक्त शासन निर्मित शैक्षणिक पोर्टल्स चा वापर विद्यर्थ्यांसाठी उपलब्ध करून प्राध्यापक थांबता काम नयेत. चांगल्या शिक्षकाची जागा तंत्रज्ञान कधीच घेऊ शकत नाही परंतु चांगले शिक्षक या तंत्रज्ञानात उत्तम वापर करू शकतात. याचा विसर शिक्षकच मुलांना पाडत तर नाहीत ना? अशी चिंता वाटते.

अनेक तज्ञांचे असे मत आहे की, शांततेत सृजनशीलता फुलते. त्यांना वेळ देऊन नवीन कल्पना प्रत्यक्ष उतरवण्याचे कार्य घडू शकते. स्वतःच्या चुकांतून अनुभवातून शिक्षण मोलाचे ठरते. ऑनलाइन अभ्यास नाही केला तरी आपली मुले अभ्यासात मागे राहतील. अशी बिनबुडाची भीती पालकांच्या मनात निर्माण करून काही लोक पैसे कमवण्यासाठी असे करत नसतील ? दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटची सुविधा नसते, गरिबीमुळे इंटरनेट प्लॅन खरेदी करणे ते आवाक्याबाहेरचे असते.

याचबरोबर ग्रामीण भागात वीज तुटवडा ही गंभीर समस्या असते. व्यक्ती वर्गातील शिस्त नियम येथे राखली जात नाही. विज्ञान, कला यांची प्रात्यक्षिके उपकरणांशिवाय करणे निव्वळ अशक्य आहे. वर्गातील साहचर्ययुक्त अध्यापनाच्या आनंदाला आजचा विद्यार्थी मुकतो आहे. नक्कीच सध्या संपूर्ण जग कोरोना सारख्या महामारीला धैर्याने तोंड देत आहे. या काळात उत्प्रेक्षी वर्ग विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरणार आहे.

जुजबी कालावधीसाठी ही गोष्ट उपयुक्त असली तरी सातत्यपूर्ण चिरकाल प्रगती साधण्यासाठी ही आधुनिकता पुरेशी नाही. एकंदरीतच अज्ञान रुपी अंधार दूर करावयाचा असेल तर ज्ञानरूपी ज्योती प्रज्वलित करणे अनिवार्य ठरेल. या करिता एकाच पद्धतीचा अवलंब न करता त्यामध्ये -साहचर्य युक्त अध्यापन, विचारविमर्ष पद्धती, सामाजिक कौशल्य वृद्धी, विद्यार्थ्यांना प्रेरणा, आवड उत्सुकता निर्माण करणारे शिक्षण, विद्यार्थी गरजेनुरूप शिक्षण पद्धती वापरून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक लवचिक, प्रभावी, सक्रिय, मनोरंजक तसेच विद्यार्थी विकासास उपयुक्त ठरेल.

प्राध्यापक, राजेंद्र सोनकवडे

भौतिकशास्त्र अधिविभाग,

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

भ्रमनध्वनी: 8329375247 / 9763041193

www.sonkawade.com

(लेखक उच्च शिक्षण क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत आहेत.)

Updated : 19 May 2020 12:32 PM GMT
Next Story
Share it
Top