Home > मॅक्स एज्युकेशन > मोदी आणि पुतळ्यापेक्षा मेधा पाटकर उंच..!

मोदी आणि पुतळ्यापेक्षा मेधा पाटकर उंच..!

मोदी आणि पुतळ्यापेक्षा मेधा पाटकर उंच..!
X

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं मोठ्या थाटात उदघाटन करत आहेत. नर्मदा जिल्ह्यातील केवडिया कॉलनी परिसरात उभारलेल्या या पुतळ्यासाठी तब्बल 2989 कोटी खर्च करण्यात आले आहेत. मात्र या पुतळ्यासाठी नर्मदा जिल्ह्यातील शेतकरी आदिवासींसह डांग परिसरातील अनेक लोक विरोध करत आहेत. करोडो रुपये खर्च करून पुतळा उभारण्यापेक्षा या भागातील सर्वसामान्यांचे जगण्याचे प्रश्न सोडवले असते तर बरं झालं असतं अस अनेक विरोध कारणाऱ्यांचं म्हणणं आहे. ज्या नर्मदा नदीच्या पत्रात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा आहे. किंवा ज्या नर्मदा नदीवर सरदार सरोवर उभं आहे त्याच नर्मदा नदीच्या खोऱ्यात मात्र सर्वसामान्य आदिवासींची जगण्याची लढाई खूप कठीण आहे.

फोटो दत्ता कानवटे

आॅक्टोबर महिन्यातली 19 तारखेची सकाळ उलटून जात असताना मी नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे गाव माघे टाकून जेंव्हा घाट उतरू लागलो तेंव्हा आॅक्टोबर हिटचे तडाखे बसू लागले होते. तोरणमाळ या गावापासून 2 किलोमीटर अंतरापर्यंतच काय तो डांबरी रस्ता आहे. तिथून पुढे नर्मदेच्या खोऱ्यातल्या शेकडो एकर परिसर आणि हजारो आदिवासी पाडे असे आहेत की त्यांनी अजून रस्त्यावरल डांबर पाहिलेलं नाही. चढ उतराचे डोंगर उतरून मी जेंव्हा दोन दोन तीन पुंजक्याचे असंख्य पाडे पाहू लागलो तेंव्हा प्रश्न पडला की ही माणसं इथं जगत कशी असतील. रस्ते नाही, पाणी नाही, वीज नाही, शाळा नाहीत, रुग्णालये नाहीत, सरकारी सुविधा म्हणून इथे काहीच नाही. देशात सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात असूनही इथले लोक हे सरकारी व्यवस्थांशीवाय जगत आहेत.

फोटो दत्ता कानवटे

इथे मला सर्वात वाईट गोष्ट आढळली ती शाळांची, भलेही तुम्ही एखाद्या परिसराला कुठलीच सुविधा पुरवू नका पण किमान त्या परिसरात शाळा तरी दिल्या पाहिजेत मुलांना शिकवलं पाहिजे. पण हजरो कोटी रुपये खर्चून सरदार सरोवर आणि सरदार पुतळा उभं करणारं हे बलाढ्य सरकार या भागात साधी अंगणवाडी उभारू शकत नाही याची मला कीव वाटली. सरकार हे पुतळे उभारण्यासाठी असतं की सर्वसामान्यांना जगवण्यासाठी असतं हा प्रश्न आहे. या भागातल्या आदिवासींना सरकारने वाऱ्यावर सोडलं असलं तरी नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांनी मात्र या आदिवासींचे दुःख वाटून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मेधा पाटकर या आपल्याला फक्त सरदार सरोवराला विरोध करणाऱ्या आंदोलक म्हणूनच माहिती आहेत. सत्तेत असलेल्या सरकारने त्यांची विकास विरोधी म्हणून छबी रंगवली आहे. पण आदिवासी पट्ट्यात मेधा पाटकर यांची ओळख नेमकी या उलट आहे. या भागाचा थोडाफार विकास करण्याचा प्रयत्न जर कुणी केला असेल तर तो मेधा पाटकर यांनी... ज्या भागात सरकारने अंगणवाडी दिली नाही, शाळा उभारल्या नाहीत त्या भागात मेधा पाटकर यांनी नर्मदा जीवन शिक्षण शाळा उभ्या करून गरीब आदिवासींच्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

मी जेंव्हा झारखंड नाला ओलांडून मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आलो तेंव्हा सूर्य डोंगरखाली बुडू लागला होता. झारखंड नाल्याच्या वरच्या बाजूला डोंगरावर भाबरी हे गाव आहे. पाच किलोमीटर परिसरात पसरलेल्या असंख्य पाड्याचं ते एक गाव, या गावाच्या एका छोट्या पण पसरट उंचवट्यावर जीवन शिक्षण शाळा दिमाखात उभी आहे.

फोटो दत्ता कानवटे

ही शाळा मी जेंव्हा पहिली तेव्हा मला धक्का बसला की सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चून ज्या देशात निव्वळ एक पुतळा उभारला जातो त्या देशात शाळा या आशा असू शकतात? जंगलातून आणलेली लाकडं नीट बांधून घेऊन त्याला शेण आणि लाल मातीने लिंपण दिलेलं. वर गवत, पळसपाने आणि कौलारू छप्पर... अशी ही शाळा..! या शाळेत सगळ्या मोसमांचा मुक्त संचार असतो. पाऊस आला तर तो आरपार जातो. थंडी अली तरी सगळ्यात जास्त याच शाळेत खेळत असते. आणि उन्हाळा तर इथे घर करूनच राहतो. पण थंडी ऊन वाऱ्याशी मैत्री करणाऱ्या आदिवासींची पोरं इथे आनंदाने शिकत आहेत. एक छोट्याशा गावात चौथी पर्यंत असलेल्या या शाळेत आज घडीला तब्बल 100 विद्यार्थी शिकत आहेत. पाच किलोमीटर पासून ते शंभर किलोमीटरचे विद्यार्थी या शाळेत आहेत. मुळात ही नुसतीच शाळा नाही तर ही निवासी शाळा आहे. दिवसभर ज्या खोलीत शिकवण्या सुरू असतात, त्याच खोलीत रात्री झोपण्यासाठी हाताऱ्या पसरल्या जातात... आपली मोडकी तोडकी संदुक घेऊन आलेले आदिवसी पोरं त्या संदकावरच डोकं ठेऊन झोपी जात असतात. मुलींची अवस्थाही अशीच आहे.

फोटो दत्ता कानवटे

ही शाळा पाहिल्यानंतर मला सगळ्यात पहिला प्रश्न पडला तो हा की इतक्या दुर्गन गावात कोण शिक्षक येऊन शिकवत असावेत? तेंव्हा माझी तिथे सतीश लेहऱ्या पावरा आणि उत्तम रोहिदास पावरा या दोन शिक्षकांची भेट झाली. हे दोघेही डीएड झालेले. नर्मदा बचाव आंदोलनाच्या संपर्कात आले आणि त्यांनी मोठ्या खुशीने या शाळेत शिक्षक म्हणून रुजू व्हायला होकार दिला आज दोघांनाही या शाळेत शिकवायला येऊन 7 वर्षे उलटलीत पण त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह जराही ढळलेला नाही.

फोटो दत्ता कानवटे

ज्या गावात लाईट नाही, रस्ता नाही, मोबाईलला रेंज नाही आशा गावात ही चांगली शिकलेली पोरं कशी काय रमली असतील.? पूर्णवेळ या शाळेत राहून मुलांना शिकवण्याचा त्यांना पगार किती मिळत असेल तर तो फक्त 5600 रुपये..! इतक्या कमी पगारात ते मुलांना शिकवतात याचं मला खूप कौतुक वाटत होतं. पण हा 5600 रुपये पगार या शिक्षकांना सरकार देत नाही तर टाटा फाउंडेशन कडून मिळत असतो. आणि इथं जी मुलं निवासी शिकतात त्यांच्या जेवणाची सोय मात्र समाजातील दानशूर व्यक्तींकडून केली जाते. दरवर्षी बालक मेळावा भरवला जातो आणि त्यातून निधी जमलवला जातो. आणि वर्षभराच्या जेवणाची सोय केली जाते. ज्या देशातल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ही सरकारची असते त्याच देशात मुलांना भीक मागून शिकावं लागणं ही नरेंद्र मोदी यांच्यासाठी लाज आणणारी बाबा आहे. पण आम्हाला लाज वाटते कुठे?

फोटो दत्ता कानवटे

सरकारच्या तिजोरीत असलेली हजारो कोटी रुपये उधळून सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा करणारे नरेंद्र मोदी कुठे आणि नर्मदा खोऱ्यातल्या आदिवासींना शिकवण्यासाठी दारोदार पदर पसरणाऱ्या मेधा पाटकर कुठे..! आज आदिवासी पट्ट्यात गरीब आदिवसीला देशाचे पंतप्रधान कोण आहेत विचारलं तर उत्तर देता येत नाही पण मेधा पाटकर कोण आहेत विचारलं तर पटकन उत्तर देतात दीदी हमारी है..! या दोन व्यक्तिमत्वांची मी जेंव्हा आदिवासींच्या नजरेतून तुलना करतो तेंव्हा मला मेधा पाटकर या सरदारांच्या पुतळ्यापेक्षाही उंच वाटतात..!

Updated : 31 Oct 2018 7:09 AM GMT
Next Story
Share it
Top