Home > मॅक्स एज्युकेशन > लाखो पालकांना दिलासा, खासगी शाळांच्या फीबाबत सरकारचा मोठा निर्णय

लाखो पालकांना दिलासा, खासगी शाळांच्या फीबाबत सरकारचा मोठा निर्णय

लाखो पालकांना दिलासा, खासगी शाळांच्या फीबाबत सरकारचा मोठा निर्णय
X

कोरोना संकटामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटली आहे, अनेकांचे रोजगार गेले आहेत. या पार्श्वभूमीवर खासगी शाळांमध्ये फी साठी पालक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. पालकांना फी भरणे शक्य नसतानाही शाळांतर्फे फी साठी तगादा लावण्यात येत आहे. तर सर्व शाळा ऑनलाईन असतानाही शाळांमध्ये अनेक सुविधांची फी घेत असल्याचा काही पालकांचा आक्षेप आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यातील लाखो पालकांना दिलासा देण्यासाठी सरकारने खासगी शाळांची फी १५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे अडचणीत आलेल्या पालकांना मोठा दिलासा यामुळे मिळाला आहे. शालेय शिक्षण विभागाने फी कपातीला मंजुरी दिली आहे. शालेय शिक्षण शुल्क १५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खासगी शाळांची फी १५ टक्के कमी होणार आहे. आता पालकांना ८५ टक्के फी भरावी लागणार आहे. राज्य सरकार लवकरच अध्यादेश काढणार, असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राजस्थानच्या सरकारच्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. यावर्षी ज्या पालकांनी पूर्ण फी भरलेली आहे, त्यांना यातील काही फी परत मिळेल का याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

Updated : 28 July 2021 4:33 PM GMT
Next Story
Share it
Top