Home > मॅक्स एज्युकेशन > औरंगाबाद विद्यापीठात दलित बहुजनांची दमकोंडी?

औरंगाबाद विद्यापीठात दलित बहुजनांची दमकोंडी?

औरंगाबाद विद्यापीठात दलित बहुजनांची दमकोंडी?
X

दलित बहुजनांना शिक्षणासाठी हक्काचं ठिकाण असलेल्या औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दलित आणि बहुजन विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, पदाधिकारी आणि विद्यार्थी संघटनांची दमकोंडी केली जात असल्याचा प्रकार सध्या समोर येऊ लागला आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता केंद्र, राज्यात आणि देशातल्या अनेक राज्यात स्थापन झाल्यापासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शैक्षणिक संस्थांमध्ये घुसखोरी करत या संस्था ताब्यात घेऊन त्यांच्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि त्याबरोबरच भाजप आणि आरएसएस विरोधकांची गळचेपी आणि दमकोंडीही केली जात आहे. हैदराबाद युनिव्हर्सिटी, जेएनयू युनिव्हर्सिटी, बनारस हिंदू विश्व विद्यापीठ या ठिकाणी घडलेल्या काही हिंसक घटना याची ताजी उदाहरणे आहेत. पण अलीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही हा प्रकार जोरदार सुरू झाला असल्याची चर्चा विद्यापीठातील चळवळीच्या वर्तुळात सुरू आहे.

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात या दमकोंडीला सुरुवात झाली ती 2015 साली. 2014 साली भाजप सरकार सत्तेत आलं आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे त्या त्या ठिकाणचे बागलबच्चे कामाला लागले. औरंगाबादेतही भाजप व आरएसएस (RSS)च्या कार्यकर्त्यांनी हे विद्यापीठ आपल्या अमलाखाली आणायला सुरुवात केली. यासाठी तात्कालिक कारण ठरलं ते गोपीनाथ मुंडे ग्रामीण विकास संस्थेचं. याबाबत विद्यापीठातला विद्यार्थी नेता सचिन निकम सांगत होता की, "गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर औरंगाबादला गोपीनाथ मुंडे ग्रामीण विकास संस्था स्थापन करण्यात अाली. यात विद्यापीठाचा मोठा सहभाग होता. या संस्थेसाठी कारण नसताना बाबासाहेबांच्या नावाने असलेल्या विद्यापीठाची तब्बल शंभर एकर जागा संस्थेला देण्यात आली. मुळात आजही विद्यापीठाला विकासकामे करण्यासाठी जागेची चणचण भासत आहे. त्यात एवढी मोठी जागा त्या संस्थेला देण्यात अाली. ही संस्था स्थापन करणे आणि त्यासाठी विद्यापीठाने जागा देणे ही घटना म्हणावी तितकी सोपी नव्हती. तर भाजप-आरएसएस वाल्यांना विद्यापीठात सहज शिरकाव करता यावा यासाठी सरकारने केलेली ही सोय होती. याचा आम्ही त्याहीवेळी विरोध केला होता. ही संस्था स्थापन झाल्यानंतर त्या संस्थेवर संघाशी संबंधित असलेल्या सर्जेराव ठोंबरे यांची नियुक्ती करण्यात अली. ही सुद्धा एक गंभीर बाब होती."

खरंतर या संस्थेच्या स्थापनेनंतर विद्यापीठात खऱ्या अर्थाने भाजप- rss ने आपले कारनामे सुरू केले. विद्यापीठात कुठल्याही नेता किंवा पुरुषांची जयंती साजरी करता येत नाही, जयंती साजरी करण्यासाठी शासनाचे काही ठरलेले प्रोटोकॉल आहेत आणि त्यासाठी निश्चित यादी दिली आहे. त्या यादीतील महापुरुषांचीच जयंती शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये करता येत असते. भारतीय जनता पक्षाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं नाव मात्र या यादीत नाही पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजप- rss ने विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम दलित संघटनांनी हाणून पाडला. याचा राग आल्याने, भाजप-rss आणि अभाविप प्रणित काही कार्यकर्त्यांनी दलित विद्यार्थ्यांना थेट कुलगुरूंच्या केबिनमधेच मारहाण केल्याचा प्रकार घडला. हे सगळे कार्यकर्ते अतुल सावे यांचे समर्थक असल्यावरून पुन्हा दलित संघटनांनी आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयावर तोडफोड केली. दोन्ही प्रकरणात गुन्हे नोंद झाले मात्र मारहाण करण्यात अग्रेसर असलेल्या गजानन सानप या अभाविपच्या सिनियर कार्यकर्त्याचं नाव मात्र वगळण्यात आल्याचा आरोप दलित संघटना करत आहेत.

विद्यापीठात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा या मागणीवरून काही काळ विद्यापीठात वातावरण खूप चिघळले होते. मुळात बाबासाहेबांच्या नावे असलेल्या या विद्यापीठात फक्त बाबसाहेबांचाच पुतळा असला पाहिजे, बाकी कुणाचेही पुतळे नकोत अशी दलित संघटनांची भूमिका आणि 1995 सालाच्या आसपास तसा एक ठरावही झाला होता. पण मुद्दाम हिंदुत्ववादी संघटनांकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद उकरून काढण्यात आला आणि विद्यापीठात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी अतुल सावे यांची निवड करण्यात अाली. ही निवड करण्यात आल्यानंतर मात्र दलित संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी स्थिती दिसू लागतातच कुलगुरूंनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र अलीकडे पुतळा बसविण्याच्या अनुषंगाने कुठलीच संघटना चर्चा करत नाही. मात्र ज्या कालावधीत पुतळ्याचा वाद पेटवण्यात आला त्या कालावधीत विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या आणि या निवडणूकीत भाजप प्रणित आघाडीने भरपूर यश मिळवलं हे मात्र विशेष..!

आता अलीकडेच गाजत असलेला मुद्दा म्हणजे कुलगुरूंच्या दालनात अभाविपच्या काही कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं. मुळात पाण्याचा प्रश्न आहे आणि तो फक्त विद्यापीठालाच नाही तर संपूर्ण औरंगाबाद शहराला भेडसावत असतो. पण पाण्याचा प्रश्न समोर करून अभाविपच्या काही कार्यकर्त्यांनी विद्यापीठात कुलगुरूंच्या दालनात अर्धनग्न आंदोलन केलं. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी या दालनात दात घासले, दाढी केली आणि अंघोळ सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक दलित संघटना चिडल्या. विद्यापीठातील प्रकाश आंबेडकर यांच्या सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा नेता प्रकाश इंगळे सांगत होता की, "आमच्या चळवळीला आंदोलनाचा खूप मोठा इतिहास आहे. पण आजपर्यंत आम्ही असल्या घाण स्वरूपाचे आंदोलन कधीही केलं नाही. आम्ही विद्यापीठ आणि कुलगुरू या पदाचा कायम सन्मान राखत आलो आहोत. पण या rss प्रणित भाजप तथा अभाविपच्या लोकांना विद्यापीठ किंवा कुलगुरू यांच्याबद्दल आदरच नाही. ते जातीयवादी मानसिकतेचे लोक आहेत म्हणून त्यांनी कुलगुरू आणि विद्यापीठाचा अनादर करत कुलगुरूंच्या दालनात असला घाणेरडा प्रकार केला. हा प्रकार आम्हाला कळला. आम्ही आक्षेप घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना बाहेर हाकलण्यात आलं. असं घाणेरडं आंदोलन करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना नंतर कोणा संघटनेच्या विद्यार्थ्यांनी मारहाण सुद्धा केली. पण त्याने काही विद्यापीठाचा आणि कुलगुरूंचा झालेला अवमान भरून निघत नाही"

या घटनेनंतर बराच काळ विद्यापीठात तणाव सुरू होता. काही काळ आंबेडकरवादी संघटनांनी विद्यापीठ बंदही ठेवले, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ आणि कुलगुरूंची माफी मागावी आणि ही चूक करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सध्या आंबेडकरवादी संघटना करत आहेत. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. या दुर्लक्षातूनच दलित चळवळ आणि आंबेडकरवाद्यांची विद्यापीठात कशी दमकोंडी सुरू आहे. हे समोर येतं.

Updated : 8 Oct 2018 11:23 AM GMT
Next Story
Share it
Top